घरमहाराष्ट्रअभिमन्यू पवार; संघाचा कार्यकर्ता, फडणवीसांचा पीए ते विधानसभेचा उमेदवार

अभिमन्यू पवार; संघाचा कार्यकर्ता, फडणवीसांचा पीए ते विधानसभेचा उमेदवार

Subscribe

भाजपने विधानसभा निवडणुकांसाठी आपल्या १२५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत ५२ विद्यमान आमदारांना पुन्हा संधी दिली आहे. तर ११ विद्यमान आमदारांच्या जागी नवीन उमेदवारांना संधी दिली आहे. या यादीतील एका नावाची प्रकर्षाने चर्चा होताना दिसत आहे. ते नाव म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक (पीए) अभिमन्यू पवार. लातूर जिल्ह्यातील औसा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी पवार यांना भाजपची उमेदवारी मिळाली. एकीकडे एकनाथ खडसे, विनोद तावडे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना पहिल्या यादीत स्थान मिळालेले नसताना मुख्यमंत्र्यांच्या पीएंना संधी मिळाल्यामुळे याची चर्चा झडत आहे.

जाणून घेऊया अभिमन्यू पवार यांच्याविषयी

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून अभिमन्यू पवार त्यांचे स्वीय सहाय्यक आहेत. पवार यांच्या पालकांनी संघाच्या वनवासी कल्याण आश्रमात १५ वर्ष पुर्ण वेळ काम केलेले आहे. पवार देखील लहानपणापासून संघाचे कार्यकर्ते आहेत. राम जन्मभूमी आंदोलन असेल किंवा संघाच्या इतर कार्यक्रमात त्यांचा सहभाग असायचा. २०१० साली त्यांनी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी पुरस्कार मिळाला. पवार हे वाणिज्य शाखेतून पदवीधर आहेत. वैयक्तिक व्यवस्थाप क्षेत्रात त्यांनी पदव्यूत्तर पदवी घेतली आहे तर कामगार कायदे विषयाचा डिप्लोमा केला आहे.

- Advertisement -

हे वाचा – असा आहे, औसा विधानसभा मतदारसंघ

लातूर जिल्ह्यात भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून पवार यांनी राजकारणात प्रवेश केला. २०१४ सालच्या निवडणूक प्रचारात त्यांनी सक्रीय सहभाग घेतला होता. सत्ता आल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम करायला सुरुवात केली. औसा येथून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या मदतीने इथे अनेक विकासकामे करायला सुरुवात केली. आतापर्यंत ११० कोटी रुपयांचा निधी आणल्याचा त्यांचा दावा आहे.

औसा मतदारसंघातील राजकीय गणित

औसा हा शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ आहे. आतापर्यंत सेनेनेच इथून निवडणूक लढवली. मात्र मागच्या दोन निवडणुकांमध्ये येथे काँग्रेसचे बसवराज पाटील निवडून येत आहेत. २०१४ च्या निवडणुकीत शिवसेनेच्या सुनील माने यांनी ५५ हजार ३७९ मते मिळवली होती. तर विद्यमान आमदार बसवराज पाटील यांना ६४ हजार २३७ मते पडली होती. युती तुटल्यामुळे भाजपने पाशा पटेल यांना उमेदवारी दिली होती. पाशा पटेल यांनी तब्बल ३७ हजार मते मिळवली होती. शिवसेना आणि भाजपच्या मतांची बेरीज केली तर हा मतदारसंघ युतीसाठी सकारात्मक असल्याचे दिसते.

- Advertisement -

 

हे देखील वाचा – मंत्र्यांच्या ‘या’ पीएंनाही लागले उमेदवारीचे वेध!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -