घरमहाराष्ट्रखडसेंना सर्वात मोठा धक्का; रोहिणी खडसे यांचा पराभव

खडसेंना सर्वात मोठा धक्का; रोहिणी खडसे यांचा पराभव

Subscribe

भाजपचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांचा पराभव झाला आहे. राष्ट्रवादी पुरस्कृत आणि शिवसेनेतून बंडखोरी करुन अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणारे चंद्रकांत पाटील यांचा जवळपास १९८७ मतांनी विजय झाला आहे. रोहिणी खडसे यांचा पराभव हा भाजपसाठी खुप मोठा धक्का आहे. सुमारे तीस वर्षांपासून एकनाथ खडसे या मतदारसंघातून निवडून येत होते. त्यामुळे मुक्ताईनगर हा खडसेंचा बालेकिल्ला मानला जात होता. मात्र, याच बालेकिल्ल्यात रोहिणी खडसे यांचा पराभव झाला आहे.

भाजप पक्षाचा पाया महाराष्ट्रात भक्कम करण्यासाठी कंबर कसणाऱ्या बड्या नेत्यांमध्ये एकनाथ खडसे यांचे नाव घेतले जाते. मात्र, त्यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचारांच्या आरोपामुळे विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाने त्यांच्या ऐवजी त्यांच्या मुलीला म्हणजे रोहिणी खडसे यांना उमेदवारी दिली. गेल्या तीस वर्षांपासून खडसे या मुक्ताईनगर मतदारसंघातून जिंकून येत आहेत. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार रोहिणी खडसे यांचा १९८७ मतांनी पराभव झाला आहे. त्यामुळे खडसे यांच्यावर मोठी नाचक्की ओढवली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

- Advertisement -

खडसे आता उपेक्षितच राहणार?

गेल्या तीस वर्षांपासून मुक्ताईनगर मतदारसंघातून एकनाथ खडसे निवडून येत होते. मुक्ताईनगर मतदरासंघातील जनतेशी खडसे यांचे भावनिक संबंध आहेत. त्यांनी मतदारसंघात विकास कामे केल्यामुळे त्यांना लोकांनी सहा वेळा निवडून दिले आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर खडसे यांना पक्षाकडून महसूलमंत्री पदाची जबाबदारी दिली होती. मात्र, खडसे यांच्यावर भूखंड घोटाळ्याचे आणि भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यामुळे त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तेव्हापासून खडसे उपेक्षित आहेत. आता मुलीच्या पराभवामुळे खडसे पक्षात उपेक्षितच राहणार का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -