घरदेश-विदेशदिल्लीत संजय राऊतांना अश्विनीकुमार का भेटले?

दिल्लीत संजय राऊतांना अश्विनीकुमार का भेटले?

Subscribe

मनमोहन सिंगांच्या सरकारमध्ये केंद्रीय विधी व न्यायमंत्री असलेल्या अश्विनीकुमार यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतल्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

राज्यात महाशिवआघाडीचं सरकार स्थापन होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाल्याचं दिसून येत असून काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांच्या हायकमांडकडून शिवसेनेला पाठिंब्यासाठी ग्रीन सिग्नल मिळाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्या पार्श्वभूमीवर आता राज्यातले नेते चर्चा करून यासंदर्भात अंतिम ड्राफ्ट आणि सत्तावाटपाचा फॉर्म्युला ठरवण्याची शक्यता आहे. त्यासाठीच गुरुवारी दिल्लीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते स्वतंत्रपणे बैठका घेऊन चर्चा करत आहेत. शिवाय, दुपारी दोन्ही काँग्रेस एकत्र बैठक घेऊन देखील चर्चा करणार आहेत. त्यामुळे सत्तास्थापनेची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आलेली असतानाच गुरुवारी काँग्रेसचे माजी केंद्रीय विधी व न्यायमंत्री अश्विनीकुमार यांनी संजय राऊतांची थेट त्यांच्या निवासस्थानी येऊन भेट घेतली. त्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

भेटीत नक्की घडलं काय?

अश्विनीकुमार हे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये विधी व न्यायमंत्री होते. एकीकडे काँग्रेसमध्ये शिवसेनेला पाठिंबा देण्यावरून चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे काँग्रेसचे विधिमंत्री संजय राऊतांची भेट घेऊन त्यांच्याशी खलबतं करत होते. राज्यात सध्या राष्ट्रपती राजवट लागू असून ती संपुष्टात आणण्याची प्रक्रिया काय असेल? तिला किती वेळ लागेल? यासंदर्भात चर्चा करण्यासाठीच अश्विनीकुमार यांनी राऊतांची भेट घेतल्याचं सांगितलं जात असलं, तरी यावरून काही वेगळे तर्क देखील लावले जात आहेत. मात्र, ही भेट नक्की कशासाठी झाली? यावर दोन्ही नेत्यांकडून काहीही सांगितलं गेलेलं नाही.

- Advertisement -

हेही वाचा – आता दिल्लीत फार काम नाही, घडामोडी मुंबईतच-संजय राऊत

राष्ट्रवादी ५०-५०साठी आग्रही

गुरुवारी दिवसभर घडलेल्या घडामोडींनंतर संध्याकाळी उशिरा काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यात महाशिवआघाडीचच सरकार येणार असल्याचे संकेत दिले होते. त्या पार्श्वभूमीवर फॉर्म्युल्यासंदर्भात देखील चर्चा होत असून राष्ट्रवादी काँग्रेसला अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद आणि सत्तेत समान वाटा हवा आहे. त्यामुळे महाशिवआघाडीचं सरकार स्थापन होणार हे जरी निश्चित झालं असलं, तरी ते नक्की किती काळ लांबणार? यावर मात्र अद्याप उत्तर मिळालेलं नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -