घरमुंबईठाणे, कल्याणमधील जागांवरून शिवसेना-भाजपामध्ये धूसफूस

ठाणे, कल्याणमधील जागांवरून शिवसेना-भाजपामध्ये धूसफूस

Subscribe

शिवसेनेच्या इच्छूकांनी शिवसेनेचे नेते व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना साकडं घातलं आहे. मात्र भाजपा या जागा सोडण्यास तयार नाही. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील अनेक जागांवरून शिवसेना व भाजपामध्ये धूसफूस निर्माण झाली आहे

विधानसभेला शिवसेना-भाजपाच्या युतीबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याने, दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. ठाणे, कल्याण हे शिवसेनेचे बालेकिल्ले असल्याने ज्या ठिकाणी भाजपाचे आमदार निवडून आले आहेत, त्या जागांवरही शिवसेनेने दावा केला आहे. त्यासाठी शिवसेनेच्या इच्छूकांनी शिवसेनेचे नेते व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना साकडं घातलं आहे. मात्र भाजपा या जागा सोडण्यास तयार नाही. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील अनेक जागांवरून शिवसेना व भाजपामध्ये धूसफूस निर्माण झाली आहे.

या जागा भाजपाच्या वाट्याला

ठाणे जिल्ह्यात एकूण १८ आमदार आहेत. त्यापैकी शिवसेना ६, भाजपा ८, राष्ट्रवादी काँग्रेस ३ अपक्ष १ असे निवडून आले होते. कल्याण पूर्वेतील अपक्ष आमदार गणपत गायकवाड यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या शिवसेनेचा भ्रमनिरास झाला आहे. मागील निवडणुकीत भाजपाचा उमेदवार हा तिसऱ्या क्रमांकावर होता. त्यामुळे या जागेवर शिवसेनेने दावा केला आहे. तसेच ठाणे शहर मतदार संघ हा सेनेचा बालेकिल्ला आहे. मात्र मागील वेळेस भाजपाचे संजय केळकर निवडून आले. या जागेवरही शिवसेनेचा डोळा आहे. कल्याण पश्चिम हा सुद्धा शिवसेनेचा असून मागील निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार अवघ्या २ हजार २००च्या फरकाने पराभूत झाला. त्यामुळे या जागेवरही सेनेने दावा केला आहे. राष्ट्रवादीचे ऐरोलीचे आमदार संदीप नाईक आणि शहापूरचे पांडूरंग बरोरा यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे या जागा भाजपाच्या वाट्याला येणार आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – दूरदर्शन, आकाशवाणीवर राजकीय पक्षांना प्रचारासाठी मिळणार १३ तास ५० मिनिटे!

युती बाबतच्या निर्णयाकडे लक्ष

ठाणे महापालिका, ठाणे जिल्हा परिषद आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. त्यामुळे ठाणे आणि कल्याणमधील या जागा शिवसेनेला मिळाव्यात यासाठी शिवसेनेच्या इच्छूकांनी पालकमंत्र्यांच्या माध्यमातून जोरदार फिल्डींग लावली आहे. मात्र भाजपाचे आमदार असलेल्या जागा सोडण्यास भाजपा तयार नाही. काही जागांमध्ये अदलाबदल होणार असल्याचेही समजते. मागील विधानसभा निवडणूक शिवसेना-भाजपाने स्वतंत्रपणे लढविल्या होत्या. लोकसभेत युती झाल्याने शिवसेना-भाजपाला चांगलं यश मिळालं होत. विधानसभेसाठी युती करण्याची बोलणी सुरू आहे. मात्र जागा वाटपांचा तिढा अजूनही सुटलेला नाही. त्यामुळे युती बाबत काय निर्णय होतो? याकडे दोन्ही पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते डोळे लावून बसले आहेत.

हे आहेत आमदार 

  • ठाणे शहर – संजय केळकर (भाजपा)
  • कोपरी-पाचपाखडी – एकनाथ शिंदे (सेना)
  • ओवळा माजीवडा – प्रताप सरनाईक (सेना)
  • मुंब्रा कळवा – जितेंद्र आव्हाड (राष्ट्रवादी काँग्रेस)
  • डोंबिवली – रविंद्र चव्हाण (भाजपा)
  • कल्याण ग्रामीण – सुभाष भोईर (शिवसेना)
  • कल्याण पूर्व – गणपत गायकवाड (भाजपा)
  • कल्याण पश्चिम – नरेंद्र पवार (भाजपा)
  • ऐरोली – संदीप नाईक (भाजपा)
  • बेलापूर – मंदा म्हात्रे (भाजपा)
  • मीरा भाईंदर – नरेंद्र मेहता (भाजपा)
  • उल्हासनगर – ज्येाती कलानी (राष्ट्रवादी काँग्रेस)
  • अंबरनाथ – बालाजी किणीकर (शिवसेना)
  • भिवंडी ग्रामीण – शांताराम मोरे (शिवसेना)
  • भिवंडी पश्चिम – महेश चौघुले (भाजपा)
  • भिवंडी पूर्व – लक्ष्मण म्हात्रे (शिवसेना)
  • शहापूर – पांडूरंग बरोरा (राष्ट्रवादी काँग्रेस)
  • मुरबाड – किसन कथोरे (भाजपा)
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -