घरदेश-विदेशवाजपेयींचा एक फोन कॉल आणि डॉ. अब्दुल कलाम राष्ट्रपती झाले!

वाजपेयींचा एक फोन कॉल आणि डॉ. अब्दुल कलाम राष्ट्रपती झाले!

Subscribe

त्या दिवशी अटल बिहारी वाजपेयी यांनी एक फोन केला आणि त्या फोन नंतर सर्वांचे लाडके डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम देशाचे राष्ट्रपती झाले

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम हे भारतीयांचे आतापर्यंतचे सर्वात लाडके राष्ट्रपती आहेत. इतक्या वरीष्ठ पदावर राहूनदेखील ते सामान्यांप्रमाणे आयुष्य जगायचे. तमिळनाडुमधील रामेश्वर येथील एका छोट्याश्या गावात जन्मलेल्या अब्दूल कलामांचा राष्ट्रपती बनण्यापर्यंतचा प्रवास थक्क करणारा आहे. परंतु आज आम्ही तुम्हाला अब्दुल कलामांच्या राष्ट्रपती होण्यामागची एक रोचक कथा सांगणार आहोत. ही गोष्ट स्वतः अब्दुल कलाम यांनी त्यांचे पुस्तक ‘टर्निंग पॉइंट्स : अ जर्नी थ्रू चॅलेंजेस’ (Turning Points: A Journey Through Challanges) यामध्ये याचा उल्लेख केला आहे.

बघा काय म्हटलंय कलाम यांनी

आपण सगळेच जाणतो की, अब्दुल कलाम यांना नेहमीच विद्यार्थ्यांमध्ये रहायला आवडायचे, लहान मुलांसोबत वेळ घालवायला आवडायचे. १० जून २००२ च्या दिवशी दिवसभर लेक्चर्स घेऊन कलाम संध्याकाळी अण्णा विद्यापीठाच्या कार्यालयात पोहोचले. विद्यापीठाचे वाईस चान्सलर कलनिधी यांनी कलाम यांना सांगितले की, दिवसभर कार्यालयात तुमच्यासाठी खूप फोन आले आहेत. कोणाला तरी तुमच्याशी बोलायचे आहे. कलाम जेव्हा त्यांच्या रुममध्ये गेले तेव्हा त्यांच्या फोनची रिंग वाजत होती. कलाम यांनी तो फोन उचलला तेव्हा समोरची व्यक्ती म्हणाली, पंतप्रधानांना तुमच्याशी बोलायचे आहे. मी हा फोन त्यांच्यासोबत जोडतोय. तेव्हाच कलाम यांच्या मोबाईलवर आंध्रप्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांचा फोन आला. नायडू म्हणाले की, पंतप्रधानांना तुमच्याशी मह्त्वपूर्ण विषयावर बोलायचे आहे. तेवढ्यात कलाम यांचा फोन पंतप्रधानांशी जोडला गेला. पंतप्रधान वाजपेयी कलामांशी बोलत होते. वाजपेयी यांनी कलामांना विचारले की, कलामजी तुमचे शैक्षणिक जीवन कसे सुरू आहे? कलाम म्हणाले की, खूप चांगले सुरू आहे. वाजपेयी म्हणाले की, माझ्याकडे तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. मी आताच माझ्या पक्षाशी संलग्न पक्ष आणि नेत्यांशी बैठक संपवून आलोय. आम्हा सगळ्यांना असे वाटत आहे की, देशाला तुमची राष्ट्रपती म्हणून गरज आहे. याची आम्ही घोषणा केलेली नाही, त्याअगोदर मला तुमच्याशी बोलायचे होते. मला आता तुमच्याकडून यासाठी केवळ होकार हवा आहे.

- Advertisement -

काय उत्तर दिले कलामांनी

उत्तर देण्यापूर्वी कलामांनी विचार केला की, एनडीएमध्ये दोन डझन पक्ष आहेत. आणि त्यांच्यामध्ये कायमच एकी राहील अशी चिन्हं नव्हती. मला मात्र बसायलादेखील वेळ नसतो. भविष्याकडे पाहिल्यानंतर वाटतं की, मी नेहमीच विद्यार्थ्यांमध्ये असायला हवं. तरी देखील कलाम म्हणाले की मला माझा निर्णय घेण्यासाठी दोन तास हवे आहेत. यावर वाजपेयी म्हणाले की, तुमच्या होकारानंतर आपण सर्वांच्या संमतीवर बोलूया.

कलामांनी त्या दोन तासात काय केलं

पुढच्या दोन तासांत कलाम यांनी त्यांच्या जवळजवळ ३० मित्रांना फोन केले. त्यामध्ये खूप सारे सनदी अधिकारी होते तर काही राजकारणी लोक होते. या सर्व लोकांनी दोन प्रकारची मते सांगितली. काही जण म्हणाले की, तुम्ही शैक्षणिक जीवनाचा आनंद घेत आहात. तुम्हाला त्यामधून आनंद मिळतो. तुम्ही तेच सुरू ठेवा. तर दुसरा मतप्रवाह असा होता की, तुमच्याकडे तुमचे मिशन २०२० हे संसदेसमोर ठेवण्याची आणि पूर्ण करण्याची संधी चालून आली आहे. त्यानंतर २ तासांनी कलाम यांनी वाजपेयींना फोन केला आणि म्हणाले की मी या महत्त्वपूर्ण मिशनसाठी मी तयार आहे. यावर वाजपेयींनी धन्यवाद दिले.

- Advertisement -

काही क्षणात सर्व काही बदलले

यानंतर १५ मिनिटांच्या आत ही बातमी देशभर पसरली, काहीच वेळात कलामांच्या मोबाईलसह फोनवर दूरध्वनींचा पाऊस पडू लागला. कलामांचे संरक्षण वाढवले. त्यांच्या घराबाहेर कॅमेरे,माईक,पत्रकार,सामान्य लोक,विद्यार्थी जमले होते. त्यानंतर विरोधी पक्षातील सोनिया गांधी यांनी कलाम यांना फोन केला. शिवाय अब्दुल कलाम यांच्या नावाला पाठिंबा दिला. परंतु डाव्या पक्षांनी मात्र कलाम यांना विरोध दर्शवला. कलाम म्हणाले की, लोकांनी माझ्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राजकारणाशी संबधित नसलेली व्यक्ती, एक वैज्ञानिक राष्ट्रपतीपदासाठी कसा उभा राहू शकतो असे प्रश्नदेखील अनेकांनी मला विचारले. २५ जूलै २००२ रोजी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम राष्ट्रपती झाले. डॉ. कलाम यांना ९ लाख २२ हजार ८८४ मते मिळाली तर डाव्यांच्या उमेदवार कॅप्टन लक्ष्मी सेहगल यांना १ लाख ७ हजार ३६६ मतं मिळाली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -