टीका, ट्रोलिंग आणि रडगाणं

सवयीप्रमाणे भाजपचे नेते सोशल मीडियावर लाईव्ह येतात, पोस्ट टाकतात. मात्र त्यावर भलत्याच कमेंट करण्याचा एक सिलसिला सुरू झालाय. तो कसा झाला? कुणी सुरू केला? हे कुणालाच माहीत नाही. पण आता भाजपच्या नेत्याने कितीही सीरियस पोस्ट टाकली तरी महाविकास आघाडीचा कार्यकर्ता नसणारा देखील हसतानाची स्माईली टाकतो. त्यांच्या लाईव्हवर भलतेच प्रश्न विचारतो. यामुळे भाजपचे नेते सध्या जेरीस आल्याचं दिसतं.

Mumbai
Congress-Shiv-Sena-NCP-symbols
राजकीय पक्षांचे सोशल मीडिया वॉर

२०१४ ची गोष्ट आहे. लोकसभेच्या निकालानंतर केंद्रात बहुमताने मोदी सरकार आरूढ झालं. राज्यातही चार-सहा महिन्यांनी विधानसभा निवडणूक लागणार होती. पंधरा वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाला आता चिंता वाटू लागली. कारण भाजपला हरवू पण ते सोशल मीडियावर इलाज काय? हेच त्यांच्या अनेक नेत्यांना समजत नव्हतं. भाजपनं सोशल मीडियाचा खूप आधी आणि प्रभावी वापर करत काँग्रेस-राष्ट्रवादीला चांगलंच जेरीस आणलेलं. तेव्हाचे ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी आमच्या पत्रकारांच्या एका अनौपचारीक चर्चेत एक वाक्य बोलून दाखवलं होतं. ‘हा सोशल मीडिया भले आज भाजपच्या बाजूने वाटतोय. पण एक दिवस हे अस्त्र त्यांच्यावरच उलटेल.

लोकं कधीही कुणा एकाच्या बाजूने फार काळ राहत नाही. सोशल मीडिया तर दुधारी तलवार आहे.’ सोशल मीडिया दुधारी तलवार असल्याची चर्चा आज करण्याचे कारण म्हणजे सध्या राज्यातील विरोधी पक्षाची झालेली अडचण. राज्यावर करोना विषाणूचे महाभंयकर संकट उभे आहे. अशा परिस्थितीतदेखील विरोधी पक्ष राज्यपाल आणि आयुक्तांची भेट घेऊन आमचं ट्रोलिंग होत असल्याचं रडगाणं गात असेल तर हा दुधारी सोशल मीडिया आता नक्कीच उलटलाय, असं म्हणायला वाव आहे.

इथे रडगाणं हा शब्द अनेकांना गैरलागू वाटू शकतो कदाचित. पण तटस्थवृत्तीने पाहिल्यास ते रडगाणंच आहे. २०१४ आणि काही अंशी २०१९ पर्यंत देशभरातलं जनमत मोदींच्या बाजूनं होतं. त्यामुळे सोशल मीडियावर त्याचे आपसूकच पडसाद दिसायचे. त्यावेळी भाजप विरोधी पक्षांनी देखील सोशल मीडियाचं रडगाणं गायलं होतं. सोशल मीडियानं जादूची कांडी फिरवली आणि आमची सत्ता गेली, इथपर्यंत काही जणांनी आपली हतबलता व्यक्त केली. मात्र हतबलता आणि वास्तव वेगळं असतं. केंद्रात १० वर्षे आणि राज्यात १५ वर्षे सत्ता उपभोगल्यानंतर जी अँटी इन्कम्बसी निर्माण झाली होती. त्याचे पडसाद त्याकाळी सोशल मीडियावर उमटले. हा झाला इतिहास. जो सर्वांनाच माहितीये…

आता वर्तमानात येऊया. राज्यात सत्ता बदल होऊन केवळ पाच महिने झालेत. पाच महिन्यात असं काय झालं की विरोधी पक्षाला सोशल मीडियावर एवढं झोडलं जातंय. सध्या ट्रोल नावाचा शब्द चांगलाच प्रचलित झालाय. टीका झाली की त्याला ट्रोलचं नाव द्यायचं. मग ज्याचं ट्रोलिंग होतंय, त्याला सहानुभूती गोळा करणं सोप्प जातं. मुळात टीका आणि ट्रोलिंग यात काहीतरी फरक आहे की नाही? एखाद्याबद्दल असलेलं आपलं परखड मत व्यक्त करणं आणि त्या मताला काही जणांनी दुजोरा देणं याला काय शब्द वापरायचा? सोशल मीडिया अस्तित्वात येण्याआधी देखील समूहाने टीका केलेली आहेच की. पण त्यावेळी टीकेला चिकित्सक वृत्तीने पाहिलं जायचं. त्याला समर्पक उत्तर दिलं जायचं. सध्या लाईक, कमेंट, शेअरच्या जमान्यात एवढा वेळ नाही. त्यामुळं झाली टीका की म्हण ट्रोल, बडव उर, अशी गत झालेली दिसते.

असो, तर या ट्रोलिंगच्या जमान्यात टीकेचं स्वरुपच बदललंय. २०१४ च्या आसपास राजकीय पक्षाने ज्या पद्धतीने सोशल मीडिया वापरला त्यावर अधिक जाणून घ्यायचं असल्यास स्वाती चतुर्वेदी यांनी लिहिलेलं “I Am a Troll: Inside the Secret World Of the BJP’s Digital Army” हे पुस्तक वाचायला हवं. इथे अधिक माहिती न देता त्यावर त्रोटक प्रकाश टाकतो. सोशल मीडियातील एक्सपर्ट्सचा (एजन्सी) यथोचित वापर करून विरोधकांची प्रतिमाभंजन करण्यात आलं. टीका ही तात्पुरती असते. मात्र प्रतिमा एकदा मलिन केली तर ती कायमची राहील. ते म्हणतात ना एखाद्याचं नाव पडलं तर मग कायमचं पडतं. तसंच सोशल मीडियावरील ट्रोलिंग असतं. एखाद्याला पप्पू म्हणून म्हणून त्याची प्रतिमा त्या पद्धतीनेच लोकांसमोर आणली, की लोक पप्पूच समजतात. एखाद्या व्यक्ती किंवा संस्थेबद्दल जाणीवपूर्वक काही मजकूर बनवून त्याला सामूहिक पद्धतीने बदनाम करण्याला आपण ट्रोलिंग म्हणू शकतो. पण टीका आणि ट्रोलिंग यामध्ये फरक राहतोच. आता पुन्हा एकदा आपण राज्यातील भाजपच्या तक्रारीकडे येऊयात. भाजपने केलेली तक्रार रास्त असेलही. पण त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्ट बघून त्याला ट्रोलिंग म्हणावं का? असा प्रश्न पडतो.

राजकीय पक्षांच्या सोशल मीडिया प्रवासाबाबत थोडी माहिती देतो. २०१४ नंतर जागे झालेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीने आपल्या पक्षाचाही सोशल मीडिया विभाग बनवला. दोन्ही पक्षातील सोशल मीडिया जाणणार्‍या वरिष्ठ नेत्यांनी त्यात लक्ष घातलं. इतर राजकीय पक्षांप्रमाणे पेड एजन्सीज न नेमता कार्यकर्तेच कसे लिहीते होतील, याकडे लक्ष घातले. राष्ट्रवादीच्या बाबतीत बोलायचे झाल्यास खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे आणि नव्या दमाचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असणार्‍या कार्यकर्त्यांशी सरळ संपर्क ठेवला. त्यांच्याबरोबर सेल्फी काढून, कधी दौर्‍यानिमित्त त्यांच्या घरी चहाला जाऊन त्यांचा उत्साह वाढवला. फोटोंसाठी फार आग्रही नसणार्‍या अजित पवारांनी देखील सोशल मीडियाची ताकद ओळखून फटकून वागणं जरा सोडलं. तरुण कार्यकर्त्यांना हसतमुखाने ते सेल्फी द्यायला लागले. यामुळं काय झालं, तर राष्ट्रवादीचे हे बिनपगारी कार्यकर्ते सोशल मीडियावर सुस्साट झाले. स्वखर्चाने डेटा पॅक रिचार्ज करत विरोधकांवर तुटून पडायला लागले.

काँग्रेस आणि शिवसेनेच्या बाबतीत बोलायचं तर दोन्ही पक्षांचा एक कमिटेड कार्यकर्ता अस्तित्त्वात आहे. सत्ता असो किंवा नसो हा कमिटेड वर्ग पक्षाची साथ सोडत नाही. काँग्रेसमध्ये सत्यजीत तांबे, प्रदेशाध्यक्ष असताना अशोक चव्हाण यांनी देखील राज्यातील कार्यकर्त्यांमध्ये सोशल मीडियाची फळी मजबूत केली. तर शिवसेनेत आदित्य ठाकरेंच्या युवा सेनेनं त्यांची बाजू उचलून धरली.

याउलट परिस्थिती भाजपची आहे. भाजपचा कमिटेड कार्यकर्ता लिमिटेड आहे. २०१४ नंतर इतर पक्षातून सत्तेच्या लालसेपोटी त्यांच्याकडे अनेक नेते आले. नेत्यांसोबत कार्यकर्ते आले. आपत धर्म स्वीकारून परकीयांना स्वकीय केले खरे; पण ते सोशल मीडियावर किंवा रस्त्यावर उतरून लढाई करतीलच, असं नाही. भाजपकडे सोशल मीडियासाठी पेड वर्कर्स असल्याचा इतर पक्षांचा एक जुना आरोप आहे. अशा पेड ट्रोलर्सना मनसेप्रमुख राज ठाकरेंनी लावारीस पोरं म्हणून हिणवलं होतं.

तर आता पुन्हा आपण भाजपच्या तक्रारीकडे येऊया. केवळ पाचच महिन्यात असं काय झालं? तर याचं उत्तर आहे महाविकास आघाडी. ‘शरद पवारांनी सुगी नसताना, दाणे आणलेत कणसाला’, असा एक मेसेज महाविकास आघाडीची स्थापना झाल्यावर सोशल मीडियावर फिरत होता. भाजपला कंटाळलेल्या शिवसेनेला सोबत घेऊन पवारांनी कुणीही स्वप्नात विचार केला नाही, अशा तीन पक्षांची महाविकास आघाडी करून दाखवली. निवडणुकीच्या आधी फेसबुकवर ‘आघाडीत बिघाडी’ नावाचे पेज तयार करून काँग्रेस-राष्ट्रवादीवर चांगलीच चिखलफेक करण्यात आली होती. तसंच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंवर वैयक्तिक टीका करणारे ‘शिवसेना’ नावाचे पेज काढण्यात आलं होतं. पण विधानसभेनंतर झालेल्या महाविकास आघाडीसाठी कोणतंही उत्तर सोशल मीडिया एजन्सीजकडे नव्हतं. तसंच तीनही पक्ष एकत्र आल्यामुळे या पक्षांचे कार्यकर्ते देखील एकत्र आले. आता यांचा शत्रू एकच होता.

बघायला गेलं तर सोशल मीडियावर भाजप पक्ष किंवा त्यांच्या नेत्यांच्या विरोधात सोशल मीडियावर कोणतेही पेज बनलेलं नाही. किंवा प्रोफेशनल पद्धतीने कोणतंही ट्रोलिंग होताना दिसत नाही. तरी भाजपचे नेते का वैतागले असतील? त्याचं कारण म्हणजे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी वापरलेले स्माईलीज आणि मुद्दा सोडून विचारलेले प्रश्न. सवयीप्रमाणे भाजपचे नेते सोशल मीडियावर लाईव्ह येतात, पोस्ट टाकतात. मात्र त्यावर भलत्याच कमेंट करण्याचा एक सिलसिला सुरू झालाय. तो कसा झाला? कुणी सुरू केला? हे कुणालाच माहीत नाही. पण आता भाजपच्या नेत्याने कितीही सीरियस पोस्ट टाकली तरी महाविकास आघाडीचा कार्यकर्ता नसणारा देखील हसतानाची स्माईली टाकतो. त्यांच्या लाईव्हवर भलतेच प्रश्न विचारतो. यामुळे भाजपचे नेते सध्या जेरीस आल्याचं दिसतं. पण तरीही अजून निवडणुकीला साडेचार वर्षे बाकी आहेत आणि सोशल मीडिया दुधारी तलवार आहेच.