पी. सावळाराम,भावनेचा ओलावा!

Mumbai
पी. सावळाराम

‘आई रिटायर होतेय’ या नाटकानंतर पी. सावळाराम ‘गंगाजमुना डोळ्यांत उभ्या का?’ या गाण्याची जन्मकथा मला सांगत होते तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येत होती. कविमनाचे पी. सावळाराम आपला भावनावेग किंचितही लपवून ठेवत नव्हते. आपला हुंदका किंचितही गिळण्याचा प्रयत्न करत नव्हते. जिथे आपल्या ओलेत्या भावना व्यक्त करायच्या तिथे ते स्वत:ला जराही रोखत नव्हते.

सुमारे पस्तिस वर्षांपूर्वीची गोष्ट. ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये ‘आई रिटायर होतेय’ या नाटकाचा प्रयोग सुरू होता. नाटकाला कविवर्य पी. सावळाराम आले होते. पहिल्या रांगेत बसले होते. नाटकात आईची भूमिका करणार्‍या भक्ती बर्वेंंचं, लोक ज्याच्यासाठी डोळ्यात प्राण आणून बसलेले असत ते दृश्य सुरू झालं होतं. त्या दृश्यात आई झालेल्या भक्ती बर्वे आपल्या कुटुंबाला एका ठिकाणी जमा करून जाहीर करतात की आजपासून आई म्हणून तुमच्यासाठी करत असलेल्या कर्तव्यातून मी आता रिटायर होतेय!…नाटककार अशोक पाटोळेंनी लिहिलेले अतिशय भावपूर्ण संवाद तितक्याच हळवेपणाने भक्ती बर्वे बोलत होत्या. प्रेक्षागृहात मन कातरून टाकणारी अफाट शांतता पसरली होती. काहींचे डोळे पाणावले होते. काही मुसमुसून रडत होते.

पहिल्या रांगेत बसलेले पी. सावळारामसुध्दा त्याला अपवाद नव्हते. तेसुध्दा अगदी लहान मुलासारखे हमसाहमशी रडत होते. माझं त्यांच्याकडे लक्ष गेलं, त्याच वेळी त्यांचंही माझ्याकडे लक्ष गेलं. त्यांनी कसेबसे डोळे पुसले. नंतर नाटक संपल्यानंतर ते बाहेर पडले तेही डबडबलेल्या डोळ्यांनी. खरं तर थिएटरबाहेर पडताना आपल्यासोबत पी. सावळाराम नावाचे मराठी सिनेमासृष्टीतले, भावगीतांच्या क्षेत्रातले गीतकार बाहेर पडताहेत याची प्रेक्षकांना जाणीव होती. ठाण्यातलं हे गडकरी रंगायतन नावाचं नाट्यगृह उभारल्यापासून पी. सावळारामांचा तिथे जवळजवळ नेहमी एक फेरफटका असायचा, त्यामुळे गडकरी रंगायतनमध्ये नाटकांसाठी नियमितपणे येणार्‍या लोकांना पी. सावळाराम हे एक ओळखीचं नाव होतं…आणि असं एक कविमनाचं हळवं व्यक्तिमत्व नाटक पाहून आपल्यासारखंच आतून कुठेतरी झिरपलं आहे, चिंब ओलं झालं आहे याचं प्रत्येकाला एक प्रकारचं कुतुहल होतं.

नाटक संपल्यानंतर मी मुद्दाम त्यांना भेटलो. डोळे पुसत पुसतच ते म्हणाले, भक्तीने काय भूमिका केली आहे हो या नाटकात, अक्षरश: आई जगली आहे ती या नाटकात, पार माझ्या अंत:करणापर्यंत पोहोचली तिची आई! मी फक्त मान हलवली. ते पुन्हा म्हणाले, माझं ‘गंगाजमुना डोळ्यांत उभ्या का?’ हे गाणं मला ज्या प्रसंगावरून सुचलं तो अख्खा प्रसंग हे नाटक बघताना माझ्या डोळ्यांसमोर उभा राहिला.

मला आधीच माहीत असलेला तो प्रसंग त्यांनी मला सांगायला सुरूवात केली. नाटक संपल्यानंतरच्या त्यांच्या मनातल्या भावनांचा ओघ मी पाहिला होता. त्यामुळे मी तो प्रसंग माहीत आहे असं सांगून त्यांना अजिबात रोखलं नाही. त्यांना त्या भावनावेगात बोलू दिलं. झालं असं होतं की 1948 च्या मे महिन्याचा तो सुमार होता. पुणे स्टेशनवर एका टळटळीत दुपारी पी. सावळाराम रेल्वेच्या डब्यात बसले होते. त्याच वेळी त्यांना बाहेर एक दृश्य दिसलं.

नऊवारी साडी नेसलेली, गळा भरून दागिने घातलेली एक मराठमोळी खेडवळ बाई नुकतंच लग्नसोहळा आटपलेल्या आपल्या मुलीला सोडायला पुणे स्टेशनवर आली होती. त्या मुलीचे दीर-नणंदा, सासूसासरे पी. सावळाराम ज्या डब्यात होते त्या डब्यात बसले होते आणि ती मुलगी बाहेर स्टेशनात होती. मध्येच ती मुलगी खिडकीतल्या दीर-नणंदा, सासूसासर्‍याशी हसतखेळत बोलायची आणि मध्येच आई अशी हाक मारत आईच्या गळ्यात पडायची. शेवटी गाडी सुटण्याची वेळ आली तशी ती मुलगी डब्यात चढली. खिडकीतून तिची नजर तिच्या आईकडे गेली तर तिच्या आईला तिचे डोळे पाणावलेले दिसले. गाडी हलली तशी तिची आई तिला म्हणाली, तुला इतकं छान आम्ही वाढवलं, तळहाताच्या फोडासारखं जपलं, आता छान लग्न करून दिलं, जाताना आनंदात जा…अशा वेळी गंगाजमुना डोळ्यांत उभ्या का? जा मुली जा, दिल्या घरी तू सुखी राहा!…

पी. सावळाराम बसलेल्या डब्यात त्यांच्या डोळ्यांसमोर हा प्रसंग साकार झाला होता. त्या आईचे ते ‘गंगाजमुना डोळ्यांत उभ्या का? जा मुली जा, दिल्या घरी तू सुखी राहा’ हे उद्गार पी. सावळारामांच्या मनावर करूण ओरखडा ओढून गेले. आईचे सासरी निघालेल्या तिच्या मुलीसाठीचे ते बोल ऐकून पी. सावळारामांच्या डोळ्यांतूनही आसवांची धार लागली. त्या मुलीचा चुडा भरलेला हात खिडकीतून तिच्या आईसाठी हलला..आणि ‘गंगाजमुना डोळ्यांत उभ्या का? जा मुली जा, दिल्या घरी तू सुखी राहा’ हे तिच्या आईचे निरोपाचे शब्दच पी. सावळारामांच्या भावगीताचा मुखडा झाले. यथावकाश वसंत प्रभूंनी त्यांच्या त्या शब्दांना संगीत दिलं. त्यांनी ती चाल लावण्यासाठी दोन दिवस घेतले. त्यासाठी दादरच्या लिंबू मार्केटमध्ये ते दोन दिवस पी. सावळाराम वसंत प्रभूंसोबत बसले. पुढे हे गाणं लता मंगेशकरांनी त्यांच्या वयाच्या एकोणीसाव्या वर्षी गायलं. तेव्हा लता मंगेशकर हे नाव नुकतंच हिंदी सिनेमासृष्टीत उदयाला आलं होतं. लता मंगेशकरांनी गायलेली या गाण्याची ध्वनीमुद्रिका बाजारात आली आणि त्या काळात ती प्रचंड लोकप्रिय झाली. त्या गाण्यासोबतच पी. सावळाराम हे नावही नावारूपाला आलं.

‘आई रिटायर होतेय’ या नाटकानंतर पी. सावळाराम ‘गंगाजमुना डोळ्यांत उभ्या का?’ या गाण्याची जन्मकथा मला सांगत होते तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येत होती. कविमनाचे पी. सावळाराम आपला भावनावेग किंचितही लपवून ठेवत नव्हते. आपला हुंदका किंचितही गिळण्याचा प्रयत्न करत नव्हते. जिथे आपल्या ओलेत्या भावना व्यक्त करायच्या तिथे ते स्वत:ला जराही रोखत नव्हते.

‘आई रिटायर होतेय’ या नाटकाची कथा आणि पी. सावळारामांनी पुणे स्टेशनवर पाहिलेलं त्या नववधूला तिच्या आईकडून निरोप देण्याचा तो प्रसंग यातली भावनिकता सोडली तर तसा एकमेकांचा एकमेकांशी फार काही संबंध नव्हता. पण कविमनाच्या एका भावनाप्रधान माणसाला नाटक संपल्यावर त्याच्या आयुष्यातला तो करूण प्रसंग आठवला आणि त्या प्रसंगाचा नाटकातल्या प्रसंगाशी त्याने धागा जुळवला हे काहीतरी निश्चितच वेगळं होतं.

मी त्यांना गंमतीने नाही, पण खरोखरच गंभीरपणे विचारलं, मग हे नाटक पाहिल्यावर कवितेच्या रूपात काहीतरी तुमच्या मनात आलं असेलच? ते म्हणाले, एक लक्षात ठेव, तुमच्या आयुष्यात तुम्ही मेलोड्रामा कितीही नाकारलात तरी तो तशाच एखाद्या क्षणी तुम्हाला गाठतोच आणि गंगाजमुना उभ्या राहाव्यात तशी तुमच्या डोळ्यात आसवं उभी राहतातच, तीच तुम्हाला कोणता तरी शब्द, कोणती तरी ओळ देऊन जातात! त्यांचा निरोप घेतल्यानंतर मनात आलं की त्या दिवशी पी. सावळारामांच्या मनात तशी कोणती तरी ओळ, तसे कोणते तरी शब्द रेखाटले गेले असतील का?

-सुशील सुर्वे

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here