युद्ध येता दारी

‘फोर डेज ऑफ नेपल्स’

Mumbai
Four days of Naples

युद्धाची भाषा कोण करतात? ज्यांना युद्धस्य कथा रम्या, म्हणून केवळ करमणुकीसाठी त्या हव्याहव्याशा वाटतात आणि रहस्यकथा वाचताना आपणच त्यातील नायक असल्याचे त्यांना भासते, तसेच युद्धातील पराक्रमी वीर आपणच असल्यासारखे वाटते. त्यामुळे आपण जे वाचतो तसे सहजपणे करू शकू, अशी धुंदी त्यांना चढते. पण प्रत्यक्षात मात्र त्यांच्याच शहरात बॉम्बस्फोट होतो तेव्हा हे शूरवीर दोनचार दिवस घरात कोंडून घेऊन बसतात.

पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेला आत्मघातकी हल्ला आणि त्यात सीमा सुरक्षा दलाच्या चाळीस जवानांचा झालेला अंत यानंतर देशात स्वाभाविकपणेच संतापाचा लाव्हाच जणू उसळला. प्रत्येकाच्या तोंडी आता याचा बदला घ्यायला हवा. युद्ध पेटले तरी चालेल, अशी भाषा आली. एकवेळ जनसामान्यांचे ते भावनेच्या भरातील बोलणे साहजिक होते, असे म्हणता येईल. पण साक्षात राज्यपाल, सत्ताधारी पक्षनेते म्हणून वावरणार्‍या कित्येकांनी त्याहूनही वाईट म्हणावी अशी भाषा केली. आपले वैर पाकिस्तानशी आहे, याचा जणू काही त्यांना विसरच पडला आणि या अतिज्ञानी जनांनी पर्यटनासाठी काश्मीरला जाऊ नका, तेथील वस्तू खरेदी करू नका, त्यांना एकटे पाडण्यासाठी आणि आर्थिक द़ृष्टीने विपन्नावस्था यावी म्हणून हे उपाय करा, असा उपदेश केला. पण ते हे विसरले की जम्मू-काश्मीर हे भारतातीलच एक राज्य आहे, काश्मीर हा भारताचाच अविभाज्य भाग आहे, आणि त्याचा काही भाग पाकिस्तानने बळकावला आहे. या अतिज्ञानींच्या अशा वागण्यानेच काही ठिकाणी काश्मिरी विद्यार्थ्यांना मारहाण झाली. अशा प्रकारांमुळेच काश्मिरी लोकांना देशातील अन्य राज्यांबाबत दुरावा वाटू लागतो. सगळ्यांना आपण सारे भारतीय याचाच विसर पडतो.

गेल्या चार वर्षांत तर त्यांना ठराविक धर्माचेच समजण्याची चूक जाणूनबुजून करण्यात येते आणि भक्तमंडळी त्याला बळी पडतात. म्हणजे या लोकांना नक्की काय हवे आहे, असाच प्रश्न पडावा. त्यांना काश्मीर वेगळे व्हायला हवे आहे, का संपूर्ण देशातच दुफळी माजवायची आहे, असा सवाल केल्यास मात्र ते पिसाळतील, चूक आपलीच आहे हे विसरतील. प्रत्यक्षात मात्र त्यांची वर्तणूक तशीच असते. काहीजण मात्र काश्मिरींना आपले भाऊबंद मानून तशी वागणूक देतात. हे प्रमाण वाढले तर त्याचा फायदा देश एकजिनसी व्हायला होईल, फुटीरतेची किंवा युद्धाची भाषा करून नाही, यावर त्यांचा भर असतो.

युद्धाची भाषा कोण करतात? ज्यांना युद्धस्य कथा रम्या, म्हणून केवळ करमणुकीसाठी त्या हव्याहव्याशा वाटतात आणि रहस्यकथा वाचताना आपणच त्यातील नायक असल्याचे त्यांना भासते, तसेच युद्धातील पराक्रमी वीर आपणच असल्यासारखे वाटते. त्यामुळे आपण जे वाचतो तसे सहजपणे करू शकू, अशी धुंदी त्यांना चढते. पण प्रत्यक्षात मात्र त्यांच्याच शहरात बॉम्बस्फोट होतो तेव्हा हे शूरवीर दोनचार दिवस घरात कोंडून घेऊन बसतात. कधी शहरावर हल्ला होण्याची शक्यता वर्तवली गेली, तर ते सांगितल्यापेक्षाही अधिक काळजी घेतात. म्हणजे काय तर घराच्या बाहेरच पडले नाही, तर मग भीती कसली, अशी त्यांची समजूत असते. खरे युद्ध म्हणजे काय असते याचा त्यांना अनुभव नसतो, तर या सार्‍यामुळेच ‘युद्ध येता दारी’ हा अनुभव त्यांना कल्पनेतही आणता येत नाही. अशा या शूर वीरांसाठी एका चित्रपटाची मुद्दाम आठवण करून देत आहे. म्हणजे काय की, बोलणे वेगळे आणि प्रत्यक्ष कृती करणे यात महदंतर आहे, हे त्यांच्या ध्यानात यावे. आणि सुदैवाने तसे झालेच, तर मग आपोआपच त्यांना लष्करी अधिकारी, तज्ज्ञ, जवान आणि वीरपत्नी- माता हे सारेजण, युद्ध नको असे सतत का बजावत असतात याचा, इच्छा असलीच तर, उलगडा होईल.

साधारण 1962 साली एक वेगळ्याच प्रकारचा युद्धपट आला होता. त्याचे नाव होते, ‘फोर डेज ऑफ नेपल्स’. वेगळ्याच प्रकारचा म्हणण्याचे कारण म्हणजे सर्वसाधारण युद्धपटात असते त्याप्रकारचे दोन सैन्यांचे हे युद्ध नव्हते. ते अगदी वेगळ्या प्रकारचे आणि घराघरातून लढवलेले गेलेले युद्ध होते. जर्मन सैनिकांबरोबर इटलीच्या नागरिकांनी आपले स्वातंत्र्य परत मिळवण्यासाठी दिलेली ही लढाई होती. सारे शहर एकजूट झाले. अर्थात त्यातही काही गणंग होतेच, पण त्यांना खड्यासारखे वगळण्यात आले होते, त्यामुळेच या लोकलढ्याला यश मिळाले. जॉफ्रे लोम्बार्डिनीने हा आगळावेगळा चित्रपट तयार केला होता. त्याचा दिग्दर्शक होता नॅन्नी लॉय. त्याची पटकथा फास्कल फेटा, कॅम्पाना हल आणि वास्को प्रॅटोलिने यांनी लिहिली. छायाचित्रण मार्सेलो गत्तीचे आणि संगीत फार्लो रस्टिचेलीचे होते.

चित्रपटाची सुरुवात एका धार्मिक मिरवणुकीने होते. अचानक बॉम्बहल्ल्याची सूचना देणारा भोंगा सुरू होतो. लोकांची आश्रयासाठी धावपळ होते. तेथेहीे त्यांची चर्चा, इथं बॉम्ब कशाला, रोमवर टाका म्हणावं, त्यावर एक बाई म्हणते, रोम नको तिथं माझा मुलगा आहे. आपण बुढ्ढे मेलो तरी चालेल. यातून लोकांच्या मनोवृत्तीवर सहज प्रकाश पडतो. तेवढ्यात कुणीतरी बातमी आणते की इटलीच्या जनरलने युद्धबंदीला मान्यता देऊन केलेल्या तहानंतर आता युद्ध संपले. नेपल्समध्ये जल्लोष सुरू होतो. युद्ध संपले! असा नारा देत सर्वजण रस्त्यांवर गर्दी करतात. दुकाने उघडतात. लपलेले लोक बाहेर पडतात. आपण जिंकलो सर्व जिनसा मोफत, असे दुकानदार सांगतात. जर्मन परत जाणार म्हणून सारे खूश. एक म्हणते ते परत गेले की माझा नवरा परत येईल.

पण तेथील जर्मन अधिकार्‍याला हे मानवत नाही. तो इटलीने आमचा विश्वासघात केला म्हणून आता आम्ही शहराचा ताबा घेणार असे जाहीर करतो. विरोधी जाणार्‍यांना मारण्यात येईल असे सांगतो. एका आदेश न पाळणार्‍या खलाशाला गोळ्या घालून मारण्याची शिक्षा फर्मावली जाते. ती पाहण्यासाठी सर्वांना हजर रहा, गुडघे टेकून बसा, त्याला मारल्यावर टाळ्या वाजवा, असेही बजावतात. नाइलाजाने त्याचे पालन होते. पण लोकांमधील विरोध तीव्र होत जातो. चार दिवसात जर्मन नेपल्सवर कब्जा करतात. नेपल्सवासी एकत्र येऊन विचार विनिमय करत असतात. शेवटी सर्वानुमते आपण लढायचे असा निर्णय होतो. पण लढणार कसे? उत्तर येते, मिळेल त्या साधनांनी. लपवलेली शस्त्रे एक परत आलेला सैनिक त्यांना दाखवतो आणि सर्वजण ती ताब्यात घेतात. उद्रेक वाढतच असतो. समुद्रकाठच्या इमारती मोकळ्या करण्याचा हुकूम होतो. लोकांना ते मानावे लागते. हाल होतात त्यांचे. तोच पुरुषांना पकडून कामासाठी घेण्यात येणार अशी पत्रके लागतात. पुरुषांना बाहेर पडू नका, लपून बसा असे सांगतात.

काही दिवस जातात, मग घराघरात घुसून पुरुषांना बाहेर काढून नेण्यात येते. आता संयम संपत आलेला असतो. पुरुषांना धरून नेणारी मोटार बायका वाटेत अडवतात आणि पुरुष ती संधी घेऊन निसटतात. बायका सैनिकांना विरोध करतात. काहीजण होडीतून निसण्याचा प्रयत्न करतात, पण एक होडी गोळीबार करून नष्ट करण्यात आल्याने त्यांच्यापुढे पर्याय उरतो तो लढायचा. आता ते मानसिकरीत्याही सज्ज असतात. मग कुणी थोडा जाणकार पुढाकार घेतो. पकडलेल्यांना स्टेडियममध्ये आणले जाते. त्यांच्यातील काहींची निवड गोळ्या घालून मारण्यासाठी केली जाते. त्याची अंमलबजावणी करण्याचा हुकूम होतो … तोच शेजारच्या इमारतीच्या छपरावरून गोळीबार होतो. मारणारेच मरतात, सारे पडकलेले निसटून जातात. जाता जाता मिळेल ती शस्त्रेही सैनिकांकडून हिसकावून घेतात. युद्धाला तोंड फुटते.

मृतांची शवे बघण्यासाठी नेपल्सवासीयांना सांगतात, ते तुमच्यासाठी मेले. आता तरी जागे व्हा, जर्मनांविरुद्ध उठा, असे आवाहन करतात. जर्मनांची वाहने गल्लीगल्लीतून फिरू लागतात. लोक घरातील मिळेल ते सामान रस्त्यावर टाकून रस्तेच बंद करतात. मग रणगाडे आणले जातात. त्यांनाही थोपवण्याचा प्रयत्न होतो. पण यश नाही. शेवटी एक तोफगाडा ताब्यात घेण्यात यश मिळते. आता मुलेही सहभागी होतात. आम्हालाही काम द्या असे सांगतात. सुचेल ते करतात. त्यांचीही मदत होते. त्यातच एका छोट्या मुलाचा अंत होतो. तेव्हा आता सर्वांना जाळूनच टाकायचं असं म्हणून ते निकराने तुटून पडतात. शेवटी जर्मन सैनिक पांढरा झेंडा दाखवतात. पण त्यांच्यावर विश्वास नाही म्हणून त्यांच्या जनरलला ओलीस ठेवले जाते. ते परततात. त्यांना निरोप देताना जा जर्मनीला, परत येऊ नका अशा शब्दांत निरोप दिला जातो. जर्मन जनरललाही प्रेमाने एक तरुणी तुला बायकोची आठवण येते का? असे विचारते त्यावर तो हो आणि मला दोन मुलेही आहेत, एक बारा आणि एक आठ वर्षांचा असे सांगतो. तिला वाटते ती त्यांची नावे आहेत. तिचा मित्र ती त्यांची वये असल्याचे सांगतो. युद्ध संपताच वैरभावही संपल्याचं कोणतीही शेरेबाजी न करता दाखवले आहे. त्यामुळे परिणामकारकता आणखीच वाढते.

साधारण 124 मिनिटांच्या या चित्रपटात काही प्रसंग अविस्मरणीय आहेत. बरेच दिवस अन्न नसल्याने लोक कातावलेले. एक आई तिच्या मुलाला रस्त्यात थांबवते. आजूबाजूला कुणी नाही हे बघून एक उकडलेला बटाटा काढते आणि त्याला खायला सांगते. ती स्वतःशी पुटपुटते, मी तो कसा मिळवला हे त्याला कळलं तर? तो खाताना एकदम तिच्यापुढे तो करतो, तुही खाना, थोडी चव तरी घे. असे सांगतो. ती कसाबसा एक घास घशाखाली उतरवते. एक जण आपल्याला पकडू नये म्हणून आपण फॅसिस्ट असल्याचे सांगतो आणि एकदम दुसर्‍याला विचारतो, हे जर्मनमधून कसं सांगायचं? सुधारगृहातील मुले खात बसलेल्या रेक्टरला डिवचतात. बाहेर आम्ही लढतोय. आम्हाला खायला हवे. तो कसाबसा त्यांना उकडलेला एकएक बटाटा देतो आणि हे शेवटचेच असे सांगतो. नंतर तोही युद्धात सामील होतो. जखमी होतो. तेव्हा तीच मुले त्याला इस्पितळात नेतात, त्याची काळजी घेतात. एक वयस्कर पिता गाडी नाही म्हणून मुलाचे शव उचलूनच घरी नेतो. एक तरुण त्याची काळजी घेणार्‍या तरुणीला म्हणतो, मी तुझा एकेकाळचा प्रियकर होतो. आता तुझे लग्न झालेय. तू माझी काळजी का करतेस? ती नुसते त्याच्याकडे पाहते. बस्स. काही बोलायची आवश्यकताच नसते.खरं तर सांगण्यासारखे खूप आहे, पण जागेच्या मर्यादेत ते शक्य नाही, आणि तुम्हाला तरी पाहण्यासाठी काही शिल्लक राहू दे ना!

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here