कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रोचे टनेल बोरिंग १९ महिन्यात पूर्ण होणार 

मेट्रो ३ च्या मार्गासाठी एकूण ५६ किलोमीटर इतक्या अंतराचे अप आणि डाऊन मार्गावर भुयारीकरणाचे काम पूर्ण करण्यात येणार आहे.

Mumbai
Metro 3
मेट्रो -३

मुंबई मेट्रो ३ कुलाबा – वांद्रे – सीप्झ प्रकल्पाअंतर्गत १९ महिन्यांमध्ये ५० टक्के टनेलिंगचे काम पूर्ण करण्यात आले आहे. येत्या १९ महिन्यात उर्वरीत ५० टक्के टनेलिंगचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून आज जाहीर करण्यात आली. टनेल बोरिंग मशीनच्या माध्यमातून आतापर्यंत एकूण १३ ब्रेकथ्रू झाले आहेत. संपूर्ण प्रकल्पाअंतर्गत एकूण ३२ ब्रेकथ्रू करण्यात येणार आहेत.

कारशेडच्या कामाला येणार वेग

मुंबई मेट्रो -३ प्रकल्पाअंतर्गत काही ठिकाणी झालेल्या विरोधामुळे या प्रकल्पाचे काम काही काळासाठी लांबणीवर पडले होते. त्यामध्ये आरे कारशेडसाठी बिगर शासकीय संस्थांचा विरोध, पारसी समुदायाने सुचवलेला प्रकल्पाअंतर्गतचा बदल, गिरगाव – काळबादेवीतील रहिवाशांचे पुर्नवसन तसेच रात्रीच्या वेळेत मेट्रोच्या कामासाठी करण्यात आलेला मज्जाव यामुळे या प्रकल्पाचे काम मागे पडले होते. पण न्यायालयीन परवानग्यानंतर आता प्रकल्पातील सर्व अडथळे दूर झाले आहेत. एकट्या वृक्ष प्राधिकरणाच्या परवानगीनंतर कारशेडच्या कामालाही वेग येणे अपेक्षित आहे.

मेट्रो कामामुळे मुंबईकरांची गैरसोय नाही

मेट्रो ३ च्या मार्गासाठी एकूण ५६ किलोमीटर इतक्या अंतराचे अप आणि डाऊन मार्गावर भुयारीकरणाचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. आतापर्यंत वाहतूकीच्या दृष्टीने अतिशय गर्दीच्या अशा मार्गावर वाहतूक पोलिसांच्या मदतीने मेट्रोच्या टीमने योग्य नियोजन करत मुंबईकरांना जास्त गर्दीच्या ठिकाणीही गैरसोय होऊ दिलेली नाही. तसेच दाटीवाटीच्या जुन्या मुंबईच्या वस्तीतही अतिशय नियोजनबद्ध असे मेट्रोचे काम सुरू आहे.

‘‘भौगोलिकदृष्ट्या आव्हानात्मक परिस्थितीत मुंबईतील अतिशय जुन्या इमारती, मिठी नदी आणि उन्नत मुंबई मेट्रो-१ याखालून भुयारीकरण करणे जिकिरीचे आहे. विशेष म्हणजे सुरक्षेबाबत कुठलीही तडजोड न करता सुरक्षेच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून आम्ही हे काम पूर्ण केलेले आहे. प्रकल्प सल्लागार, कंत्राटदार या सर्वांचा या यशात सहभाग आहे. भुयारीकरणाप्रमाणे खोदकाम, बेस स्लॅब, कॉनकोर्स स्लॅब, कॉलम तसेच भिंतींची बांधणी यासारखी कामे देखील युद्धपातळीवर सुरू आहेत. मुख्यमंत्री वॉर रूमद्वारे नियमितपणे घेतला जाणारा आढावा, विविध भागीदारी संस्थांचे सहकार्य आणि मुंबईकरांच्या भक्कम पाठींब्यामुळे हा प्रकल्प वेळेत पूर्ण करु”, असा विश्वास मुंबई मेट्रो ३ च्या व्यवस्थापकीय संचालिक अश्विनी भिडे यांनी व्यक्त केला आहे. 

ऑपरेशन ब्रेकथ्रू

सप्टेंबर २०१७ मध्ये नयानगर लॉचिंग शाफ्टमध्ये कृष्णा-१ हे टीबीएम उत्तरविल्यानंतर ६ नोव्हेंबर २०१७ पासून प्रत्यक्ष भुयारीकरणाला सुरुवात झाली. मुंबईच्या भूगर्भात एकूण १७ टीबीएम्स सध्या कार्यरत आहेत. भुयारीकरणाचा पहिला टप्पा सप्टेंबर २०१८ रोजी पार पडला त्यानंतर केवळ ८ महिन्यात एकूण १२ टप्पे पार पडले आहेत. आतापर्यंत सीप्झ येथे १, सीएसएमआयए-टी २ येथे २, सहार, एमआयडीसी ,वरळी आणि आंतरदेशीय विमानतळ येथे प्रत्येकी १ तर दादर, विद्यानगरी आणि विधानभवन येथे २ अशा प्रकारे भुयारीकरणाचे एकूण १३ टप्पे पार पडले आहेत. टीबीएम्स भूगर्भात उतरविण्यासाठी कफ परेड, इरॉस सिनेमा, आझाद मैदान, सायन्स म्युझियम, सिद्धिविनायक, नयानगर, बिकेसी, विद्यानगरी, पाली मैदान, सारिपुत नगर, सहार रोड आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टी २ येथे लॉचिंग शाफ्ट बांधण्यात आले आहेत.

‘‘एकूण भुयारीकरणापैकी आजवरचा सर्वात मोठा भुयारीकरणाचा टप्पा विद्यानगरी ते आंतरदेशीय विमानतळ (३.९किमी) हा असून सर्वात लहान सारिपुत नगर ते सीप्झ (५६२ मीटर) हा आहे. २८ किमी भुयारीकरणासाठी एकूण १९,४९५ सेगमेंट रिंग्सचा वापर झाला आहे. हे सेगमेंट रिंग्स मुंबईतील ६ कास्टिंग यार्डमध्ये तयार होत आहेत. ज्यापैकी ४ वडाळा, १ माहुल तर १ जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड येथे आहे. एकूण ३३.५ किमीच्या मार्गिकेवरील उर्वरित ५०% भुयारीकरण आणखी १९ टप्प्यात पूर्ण होईल” असे मुं.मे.रे.कॉचे प्रकल्प संचालक एस.के. गुप्ता म्हणाले.