‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहीम दहिसरमध्ये मंगळवारपासून सुरू होणार

new campaign will start from Tuesday in Dahisar
'माझे कुटुंब माझी जबाबदारी' मोहीम दहिसरमध्ये मंगळवारपासून सुरू होणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांच्या सुरक्षेसाठी केलेल्या आवाहनानुसार ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अभियानास दहिसर प्रभाग १ मध्ये मंगळवारपासून सुरूवात केली जाणार आहे. यासाठी शिवसेनेच्या वतीने खास टी-शर्ट बनवण्यात आले असून सोमवारी पालिका आर/उत्तर कार्यालयात या मोहिमेतील सहभागी स्वयंसेवकासाठी टी-शर्टचे अनावरण करण्यात आले. या अंतर्गत प्रत्येक घरातील सर्व सदस्यांची तपासणी केली जाणार असल्याचे सहाय्यक आयुक्त संध्या नांदेडकर यांनी सांगितले. तसेच या मोहिमेत नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानुसार या मोहिमेत येत्या महिन्याभरात प्रभागातील किमान दोन वेळा लोकांच्या आरोग्याची तपासणी केली जाणार असल्याचे घोसाळकर यांनी सांगितले. या अभियानात पालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत शिवसैनिक सहभागी होणार आहेत. ही टीम प्रत्येक घरामधील व्यक्तींची चौकशी करतील. या चौकशीमध्ये घरात पन्नाशीच्या पुढील किती सदस्य आहेत? त्यांची ऑक्सिजन लेव्हल काय आहे? यासोबतच इतर व्यक्तींना व्याधी किंवा आजाराची कोणती लक्षणं आहेत का? जर काही लक्षणं असतील तर ती शासनाच्या यंत्रणेच्या लक्षात आणून देणार आहेत. त्यानंतर यावर पुढील उपचार काय करायचे? हे उपचार कुठे केले जातील? या सर्वांच मार्गदर्शन केले जाईल. ज्याप्रकारे मुंबईत ‘चेस द व्हायरस’ ही योजना राबवली जात आहे त्याचप्रमाणे ही योजना राज्यभरात राबवली जाणार आहे.

यासाठी शिवसेना नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी या मोहिमेतील सहभागी स्वयंसेवकासाठी टी-शर्ट तयार केली आहेत. याचे अनावरण करण्यात आले. यावेळी सहाय्यक आयुक्त संध्या नांदेडकर, आरोग्य अधिकारी अविनाश वायदंडे, माजी नगरसेवक आणि मुंबै बँक संचालक अभिषेक घोसाळकर, उपविभागप्रमुख भालचंद्र म्हात्रे, शाखाप्रमुख राजू इंदुलकर, महिला संघटक ज्यूडी मेंडोसा, युवा सेनेचे जितेन परमार उपस्थित होते.

दरम्यान गर्दीच्या ठिकाणी नेहमी मास्क लावून फिरावे. आवश्यक नसेल तर घराबाहेर पडू नका. पण आवश्यक असल्यास गर्दीच्या ठिकाणी मास्क लावा. अंतर ठेवून उभे राहा. वारंवार हात धुवा, असे आवाहन अभिषेक घोसाळकर यांनी केले आहे.