दिवाळी खरेदीच्या वेळी चोर्‍या रोखण्यासाठी कुरेशींची जागृती

भुलेश्वरला सतर्कतेसाठी घोेषणा,पोलिसांचाही पाठिंबा

Mumbai
मोहमद फारुख कुरेशी नागरिकांना सतर्क करताना

‘इन्सान के सिने मे एक दिल है और हाथ में भी एक दिल है, तो मेरे भाई और बहनो बाजार में आये हो तो होशियार रहो, आपका मोबाईल, पर्स और बच्चोपर ध्यान दो,’ अशी घोषणा कॉफर्ड मार्केट, भुलेश्वर, नळ बाजार, महमद अली रोडवर खरेदीसाठी गेलेल्यांच्या कानावर पडल्यास हबकून जाऊ नका. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर या परिसरात खरेदीसाठी वाढणार्‍या गर्दीचा फायदा घेऊन होणार्‍या चोर्‍या रोखण्यासाठी पायधुनी येथे राहणारे मोहमद फारुख कुरेशी यांनी नागरिकांना सतर्क करण्यासाठी जागृती सुरू केली आहे. कुरेशी मेगाफोनवरून दिवसभर या परिसरात घोषणा देत नागरिकांना सतर्क राहण्याचा संदेश देत असतात.

महमद अली रोड, कॉफर्ड मार्केट, नळ बाजार, भुलेश्वर, झवेरी बाजार या परिसरात उत्सवाच्या काळात खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. कपड, भांड्यांपासून ते महागड्या दागिन्यांपर्यंत सर्वच येथे मिळत असल्याने नागरिक येथे येतात. दोन दिवसांवर दिवाळी आल्याने सध्या या परिसरात मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. गर्दीचा फायदा घेऊन दरवर्षी या परिसरात नागरिकांचे पाकिट, मोबाईल चोरी होण्याचे प्रमाण वाढले आहे. दिवाळी, रमजानच्या काळात पायधुनी व भायखळा पोलीस ठाण्यांमध्ये मोबाईल व पाकिट चोरीच्या तक्रारीही वाढत असतात. दिवाळीची खरेदी करताना नागरिकांचे लक्ष विकत घ्यावयाच्या वस्तूंकडे असते.

अशावेळी त्यांचे खिशातील पाकिट व मोबाईलकडे थोडेसे दुर्लक्ष होते. याचा चोरांकडून फायदा घेण्यात येतो. हीच बाब लक्षात घेऊन पायधुधी येथे राहणारे मोहमद फारुख कुरेशी यांनी नागरिकांना सतर्क करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. तीन चार दिवसांपासून ते या परिसरामध्ये मेगाफोनवरून सकाळी 10 ते रात्री 10 पर्यंत घोषणा देत फिरत असतात. विशेष म्हणजे हे काम ते स्वेच्छेने करत असून, यासाठी त्यांना कोणताही मोबदला मिळत नाही. नागरिकांच्या सतर्कतेसाठी कोणीतरी पुढे यावे यासाठी मी हे काम करत असल्याचे कुरेशी यांनी सांगितले. दिवाळीनंतरही काही दिवस ते घोषणा देत संपूर्ण परिसरात फिरणार आहेत, असेही ते म्हणाले.

‘मेरे भाई और बहनो अपना पर्स, मोबाईल और बच्चो को मजबुतीसे पकडे. चोर, पाकिटमारो से होशियार रहो. आप आये हो बाजार में तो अपने मोबाईल, पाकिट और बच्चों पर ध्यान दे. आजकी तारीख मे मोबाईल नंबर एक हे. दिलसे भी भारी है. इन्सान का भी एक दिल है और हाथमे भी एक दिल है, तो जागते रहो, मोबाईल निचे के जेब मे रखो. अशा प्रकारे ते पायी चालत कॉफर्ड मार्केट ते भायखळ्यापर्यंत खरेदीसाठी येणार्‍या नागरिकांना सतर्क करत आहेत. आपल्या या घोषणेमुळे अनेक नागरिक सतर्क होऊन आपले मोबाईल व पाकिटाची काळजी घेत असल्याचे कुरेशी यांनी सांगितले. त्यांच्या या कार्याची दखल घेत पायधुनी व भायखळा पोलिसांनीही त्यांना पाठिंबा दिला आहे.

मोहमद फारुख कुरेशी यांनी दिवाळीच्या वेळी परिसरात होत असलेल्या चोर्‍या रोखण्यासाठी अशा प्रकारे घोषणा दिल्यास त्याचा फायदा होऊ शकतो असे आम्हाला सांगितले. त्यांची ही कल्पना आम्हाला आवडल्याने आम्ही त्यांना पाठिंबा दिला आहे. पोलिसांमार्फतही अशाप्रकारे मेगाफोनद्वारे घोषणा करण्यात येते. परंतु कुरेशी यांची घोेषणा पटकन नागरिकांचे लक्ष वेधून घेते.
– अविनाश कानडे, वरिष्ठ पोलीस निरिक्षक, पायधुनी.

प्रवीण काजरोळकर / विनायक डिगे । मुंबई

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here