श्रीगोंदा: कोळगाव येथे चोरीचा प्रयत्न करणार्या एका गुन्हेगाराला गावकर्यांनी धाडस करत पकडून बेलवंडी पोलिसांच्या ताब्यात विश्वासाने दिले. मात्र, गुन्हेगाराने पोलिसांनाच गुंगारा देत वाहनातून उडी मारुन पलायन केले.
कोळगाव येथील अहमदनगर-दौंड महामार्गाजवळील एका वस्तीवर मंगळवारी चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. मात्र, चोरट्यांचा सुगावा लागल्याने गावकर्यांनी त्यातील एकाला पकडले. त्यात धरुन ठेवत बेलवंडी पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोलिसांच्या गस्ती पथकातील वाहन आले. पोलीस गुन्हेगाराला हाताला बांधून वाहनातून घेऊन गेले. दरम्यान, पोलिसांच्या वाहनात एक चालक व एक कर्मचारी होता. ही संधी साधत गुन्हेगाराने धावत्या वाहनातून उडी मारुन पलायन केले. गावकर्यांनी पकडलेला गुन्हेगार पळून गेल्याने जिल्ह्यात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.