नाशिक : सावरकरनगर, निळकंठेश्वरनगर, अशोकनगर परिसरात रविवारी (दि. १७) रात्री १ ते पहाटे ३ वाजेदरम्यान १२ ठिकाणी घरफोडीचा प्रयत्न करण्यात आला. यात रेडिमेड कपड्याचे गोडावून फोडत २५ हजारांचे रेडिमेड कपडे, पल्सर दुचाकी चोरीला गेल्याची घटना घडली.
एकाच रात्री १२ ठिकाणी चोरट्यांनी घरफोडीचा प्रयत्न केल्याने नागरिक व व्यावसायिक यांच्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. निळकंठेश्वरनगर येथे असलेल्या अवधूत रेसिडेंसीत बंद असलेल्या फ्लॅटचा पहाटे ३ च्या दरम्यान कडी-कोयंडा तोडत चोरट्यांनी साई कलेक्शन या रेडिमेड कपड्याच्या दुकानातील २५ हजार किंमतीचे रेडिमेड कपडे चोरून नेले.
सीसीटीव्हीत तीन तरुण दिसत आहेत. यानंतर चोरट्याने बाजूच्या चामुंडा विहार ए विंग इमारतीत, रामेश्वर संकुल थोरात पार्क येथेही चोरीचा प्रयत्न केला. तर अशोक नगर येथील ५ इमारतीत चोरीचा प्रयत्न करताना चोरट्याने शुभम रो हाऊस परिसरातील पल्सर चोरून नेली. दरम्यान, सावरकर नगर परिसरातील काही इमारतींच्या पार्किंग परिसरातील दुचाकीचे पेट्रोलही चोरट्यांनी काढून नेले. दिवाळी सणाच्या दिवसात चोरट्यांनी सावरकरनगर, निळकंठेश्वरनगर, अशोकनगर भागात अशी घटना घडल्याने नागरिक तसेच व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वरीष्ठ पोलीस निरीक्षक किशोर मोरे यांनी घटनास्थळी भेट देत सीसीटीव्ही फुटेज पाहिले. यात तीन तरुण दिसत असून त्यादृष्टीने तपासकार्य सुरू आहे.