घरताज्या घडामोडीजादूटोणा विरोधी कायदा रद्द तर सोडा उलट प्रभावी अंमलबजावणी करा; अंनिसने सांगितले...

जादूटोणा विरोधी कायदा रद्द तर सोडा उलट प्रभावी अंमलबजावणी करा; अंनिसने सांगितले महत्व

Subscribe

नाशिक : शहरामध्ये काही हिंदुत्ववादी संतांनी रामकुंड परिसरात एकत्र येत जादूटोणा विरोधी कायदा रद्द करावा, अशी मागणी केली आहे. परंतु, दुसर्‍या बाजुने ह्या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी, कायदा आणखी कडक व्हावा,अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे.

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खूनानंतर महाराष्ट्रात जादूटोणा विरोधी कायदा लागू झाला. असा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. या कायद्याला नऊ वर्ष पूर्ण झाले असून, दीड हजाराहून अधिक गुन्हे या कायद्याअंतर्गत दाखल झाले आहेत. हा कायदा केवळ हिंदु धर्मातील लोकांना लागू पडेल, अशा आरोप काही लोकांनी केला आहे. पण हा कायदा सर्व धर्मासाठी लागू आहे. पहिला गुन्हा मुस्लीम भोंदूबाबा विरोधात नांदेडमध्ये दाखल झाला तर दुसरा गुन्हा नाशिकरोड पोलीस ठाण्यात नवबौद्ध समाजातील आरोपीच्या विरोधात दाखल झालेला आहे. त्यानंतर हिंदु आरोपीच्या विरोधात दाखल झाला आहे. राज्यभरात पोलीस ठाणे निहाय १०४ गुन्ह्यांची यादी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जाहीर केली आहे. त्यात शंभरपैकी २० घटनांमध्ये मुस्लीम व्यक्तींच्या विरोधात गुन्हे दाखल झाले आहे.

- Advertisement -

लोकसंख्येचा विचार करता हे प्रमाण लक्षणीय आहे. त्यामुळे या कायद्याबाबत गैरसमज पसरविण्यांना कृतिशील उत्तर मिळाले आहे.नरबळी देणे अथवा देण्याचा प्रयत्न करणे,करणी भानामती,जादूटोणा अथवा भुत उतरवण्याच्या बहाण्याने अंगाला चटके देणे, त्यासाठी जबरदस्तीने मानवी विष्ठा खाऊ घालणे, तोंडात कोंबणे, मारहाण करणे, चमत्काराचा दावा करून महिलांचे लैंगिक शोषण करणे, गुप्तधन काढण्याच्या हेतूने अघोरी प्रथांचा अवलंब करणे, दैवी शक्तींचा दावा करून महिलांना नग्नपूजा करण्यास जबरदस्ती करणे, डाकीण समजून त्रास देणे, पैशाचा पाऊस पाडण्याच्या बहाण्याने फसवणूक करणे आदी अमानुष घटनांमुळे गुन्हे नोंद झाल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती या कायद्याचा प्रचार प्रसार करत आहे. मात्र मर्यादा व क्षमता याचा विचार केल्यास हे प्रयत्न अपुरे आहे. तरी या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा, या कायद्याचे नियम बनवावेत व कायदा अधिक कडक करावा, अशी मागणी महाराष्ट्र अंनिसचे पदाधिकारी डॉ. टी. आर. गोराणे, कृष्णा चांदगुडे व अ‍ॅड. समीर शिंदे, महेंद्र दातरंगे यांनी केली आहे.

जादूटोणा विरोधी कायद्या अंतर्गत दाखल झालेले गुन्हे

नाशिकरोड पोलीस ठाण्यात नरबळी देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. मालेगावमध्ये चमत्काराने पैशांचा पाऊस पाडण्यासाठी तीन लाखांची फसवणूक व महिलेसह तिच्या मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. वाडगाव (ता. नाशिक) मध्ये गुप्तधन काढून देण्याच्या नावाखाली अघोरी पूजा व आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. इंदिरानगर पोलीस ठाण्यात भविष्य सांगून भिती निर्माण करत शारीरिक व आर्थिक शोषण केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. सटाण्यात महिला करणी करते म्हणून तिला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. सटाण्यात एक महिला चेटकीन असून, तिच्यामुळे गावांत संकटे येत असल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. वावी (ता.सिन्नर, जि. नाशिक) येथे वयोवृद्ध महिलेच्या करणीमुळे गावात मृत्यू होत असून तिला सामाजिक बहिष्कृत केल्याने गुन्हा दाखल झाला आहे. लासलगावमध्ये भूत काढण्याच्या बहाण्याने मात्रिकाने महिलेस अमानुष मारहाण केली. इगतपुरीमध्ये मांत्रिकाने अघोरी विद्येसाठी मृतदेहाची कवटी जमिनीतून बाहेर काढून दहशत निर्माण केली. सुरगाण्यामध्ये एका युवकास भुताळा असल्याचे सांगत बेदम मारहाण केल्याने गुन्हा दाखल झाला आहे. कांबी (ता.शेवगाव, जि. नगर) येथे गुप्तधनासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. भानसहिवरा (ता. नेवासा, जि. नगर) येथे दैवी शक्तीच्या जोरावर असाध्य रोग बरे करण्याचा दावा करुन भोंदूगिरी करणे, दैवी सामर्थ्याने लुप्त होईल, असा बनाव करुन दहशत निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. पुण्यात डेक्कन परिसरात भावावर असलेली करणी काढण्याच्या बहाण्याने महाविद्यालीयन तरुणीवर बलात्कार करुन १८ तोळे सोने व ८० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. पुण्यात पैशांचा पाऊस पाडण्यासाठी नग्न पूजा करुन नरबळीचा फसलेला प्रयत्न केल्याचा खून दाखल झाला आहे. अतिद्रीय शक्ती असल्याचे भासवून असाध्य रोगावर अघोरी उपचार केल्याप्रकरणी नांदेडमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -