सध्या सगळीकडेच राजकीय वारे वाहू लागले आहेत. कोणी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर करताना दिसत आहेत, तर कुठे नव्याने राजकारणात प्रवेश करताना दिसत आहेत. यात सेलिब्रिटीही मागे नाहीत. नुकताच अभिनेत्री आसावरी जोशी हिने राजकारणात प्रवेश घेतला आहे. मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांच्या उपस्थितीत आसावरी जोशी यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काही दिवसांपूर्वी बिग बॉस हिंदीच्या दहाव्या पर्वाची विजेती अभिनेत्री शिल्पा शिंदेने कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
काँगेसमध्ये प्रवेश केल्यानंतर आसावरी जोशी म्हणाल्या, ‘मला सामाजिक काम करायचं होतं, परंतु करियर करताना मला ते करता आलं नाही. आता मी काँग्रेसमध्ये आल्याने मला ती संधी मिळणार आहे. मी लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे, पक्षाने संधी दिल्यास मी लढवेन. काँग्रेस हा पक्ष लोकशाहीवादी पक्ष आहे, यामुळे मी या पक्षात आले आहे. माझे इथे चांगलं स्वागत झालं आहे.
आजपर्यंत अनेक मराठी तसेच हिंदी मालिकां, चित्रपटांमधून आसावरी यांचा चेहरा दिसला. झी मराठीवरील एका लग्नाची दुसरी गोष्ट या मालिकेत आत्याची भुमिका असावरी यांची विशेष गाजली होती. कॉंग्रेसमध्ये प्रवेशकरून असावरी आपली दुसरी इनिंग सुरू करत आहेत. आता शिल्पा शिंदे आणि आसावरी जोशी निवडणूकीच्या रिंगणातही उतरणार की स्टार प्रचारक म्हणून काम करणार हे लवकरच कळेल.