घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रब्रँच मॅनेजरसह बँक अधिकाऱ्यांनीच केला ५६ लाखांचा घोटाळा

ब्रँच मॅनेजरसह बँक अधिकाऱ्यांनीच केला ५६ लाखांचा घोटाळा

Subscribe

युनियन बँकेच्या तत्कालीन अधिकार्‍यांसह एकाविरुद्ध संगमनेर शहर पोलिसांत गुन्हा

संगमनेर : युनियन बँकेच्या तत्कालीन शाखा व्यवस्थापकासह दोघा अधिकार्‍यांनी अन्य एका त्रयस्थ मध्यस्थाशी संगनमत करुन आपल्या आर्थिक फायद्यासाठी खोटी आणि बनावट कागदपत्रे तयार करून ती खरी असल्याचे भासवून बोगस कर्ज प्रकरणांच्या आधारे युनियन बँकेत तब्बल ५६ लाख रुपयांचा घोटाळा केल्याचे उघड झाले आहे. या प्रकारामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, कॉर्पोरेशन बँकेचा तत्कालीन शाखा व्यवस्थापक असलेला नितीन कुमार व बँकेच्या एक खिडकी सुविधा केंद्राचा संचालक रुपेश आर.धारवाड या दोघांनी खासगी मध्यस्थ विलास एल.कुटेरा, गणपती मळा, सुकेवाडी यांच्याशी संगनमत करून २०११-१३ या कालावधीत शेतीच्या लागवडीसाठी अथवा शेतीसंबंधी अन्य कारणांसाठी विलास कुटे यांच्यामार्फत पंधरा जणांनी बँकेकडे कर्ज मागणी अर्ज केला होता.कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर या सर्वांना कर्ज रकमेचे वितरण केले होते. नंतरच्या कालावधीत कॉर्पोरेशन बँकेचे वरिष्ठ अधिकारी सदर कर्ज प्रकरणाच्या नियमित चौकशीसाठी बँकेत आले असता ‘त्या’ कर्ज प्रकरणांबाबतच्या चौकशीमध्ये वरील दोन्ही अधिकार्‍यांनी उडावाउडवीची उत्तरे दिली. त्यावरुन संबंधित चौकशी पथकाचा संशय बळावला, त्यांनी याबाबत पुण्याच्या विभागीय कार्यालयाला या कर्ज प्रकरणातील अनियमिततेबाबत अहवाल सादर करुन सखोल चौकशी करणं गरजेचं असल्याचं कळवलं.

- Advertisement -

दरम्यान, चौकशी पथकाने केलेल्या तपासणीत या १५ कर्ज प्रकरणांसाठी बँकेत जमा करण्यात आलेली कागदपत्रे आणि दस्त खोटे व बनावट असल्याचा निष्कर्ष काढला आणि संगनमत करुन वरी अधिकार्‍यांनी बँकेच्या रकमेचा अपहार केल्याचंही त्यातून समोर आलं. १५ कर्ज प्रकरणं तत्कालीन शाखा व्यवस्थापक नितीन कुमार, तत्कालीन एक खिडकी योजनाचा संचालक रुपेश आर. धारवाड व खासगी मध्यस्थ विलास एल. कुटे यांनी संगनमताने, गैरकायदेशीर मार्गाने मंजूर करुन रकमेचा अपहार केला असल्याचं तपासात उघड झालं. तसेच, विलास एल. कुटे याने १५ कर्ज प्रकरणांत केलेली मध्यस्थी आणि त्याचा सक्रीय सहभागसुद्धा उघड झालाय.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -