घरताज्या घडामोडीआठ महिन्यात प्रथमच जीएसटी १ लाख कोटींवर

आठ महिन्यात प्रथमच जीएसटी १ लाख कोटींवर

Subscribe

राज्याचा वाटा मोठा

लॉकडाऊनमुळे सर्वच उद्योगधंदे ठप्प असल्यामुळे वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटीची गंगाजळी अल्पप्रमाणात केंद्राच्या तिजोरीत जमा होत होती. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आली असताना आता आशेचा किरण दिसू लागला आहे. ऑक्टोबर महिन्यात १ लाख ५ हजार १५५ रुपयांचा जीएसटी जमा झाला आहे. त्यात महाराष्ट्राचा वाटा सर्वाधिक म्हणजे १५ हजार ७९९ कोटी रुपयांचा आहे. मागील फेब्रुवारी महिन्यापासून प्रथमच जीएसटीचे कलेक्शन एक लाख कोटींच्या पुढे गेले आहे.

अर्थ मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर २०२० मध्ये १,०५,१५५ कोटी रुपये सकल जीएसटी (वस्तू आणि सेवा कर) महसूल संकलन झाले आहे. ज्यात सीजीएसटी १९,१९३ कोटी रुपये, एसजीएसटी २५,४११ कोटी रुपये, आयजीएसटी ५२,५४० कोटी रुपये (मालाच्या आयातीवर संकलित २३,३७५ कोटी रुपयांसह ) आणि उपकर (सेस) ८,०११ कोटी रुपये (मालाच्या आयातीवर संकलित ९३२ कोटी रुपयांसह ) समावेश आहे. ऑक्टोबर महिन्यासाठी ३१ ऑक्टोबर, २०२० पर्यंत दाखल करण्यात आलेल्या जीएसटीआर-३ बी विवरणपत्रांची एकूण संख्या ८० लाख आहे. जीएसटी संकलनामध्ये महाराष्ट्राचा वाटा सर्वाधिक आहे. महाराष्ट्रातून ऑक्टोबर २०२० मध्ये १५ हजार ७९९ कोटींचे जीएसटी संकलन झाले आहे. ऑक्टोबर २०१९ मध्ये १५ हजार १०९ कोटींचे जीएसटी संकलन झाले होते.

- Advertisement -

सरकारने नियमित निपटारा स्वरूपात आयजीएसटीमधून सीजीएसटीसाठी २५,०९१ कोटी रुपये आणि एसजीएसटीसाठी १९,४२७ कोटी रुपये दिले आहेत. ऑक्टोबर २०२० मध्ये नियमित निपटारा केल्यानंतर केंद्र सरकार आणि राज्य सरकारे यांनी मिळवलेला एकूण महसूल सीजीएसटीसाठी ४४,२८५ कोटी रुपये आणि एसजीएसटीसाठी ४४,८३९ कोटी रुपये आहे.

मे – ६२ हजार १५१ कोटी
जून – ९० हजार ९१७ कोटी
जुलै – ८७ हजार ४२२ कोटी
ऑगस्ट- ८६ हजार ४४९ कोटी
सप्टेबर- ९५ हजार ४८० कोटी
ऑक्टोबर- १ लाख ५ हजार १५५ कोटी

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -