घरदेश-विदेश...तर १९८४ची दंगल रोखता आली असती; डॉ. मनमोहन सिंह यांचे विधान

…तर १९८४ची दंगल रोखता आली असती; डॉ. मनमोहन सिंह यांचे विधान

Subscribe

माजी पंतप्रधान इंदरकुमार गुजराल यांच्या १००व्या जयंती कार्यक्रमानिमित्त दिल्लीत आयोजित कार्यक्रमात डॉ. मनमोहन सिंह यांनी हे विधान केले.

देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी १९८४च्या दंगलीबाबत एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे. डॉ. मनमोहन सिंह म्हणाले की, “१९८४ मध्ये जर तत्कालीन गृहमंत्री नरसिंह राव यांनी इंद्रकुमार गुजराल यांच्या सल्ल्याप्रमाणे कारवाई केली असती तर दिल्लीतील शिखांचे हत्याकांड रोखता आले असते.” माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांच्या १००व्या जयंती निमित्त दिल्लीत आयोजित कार्यक्रमात डॉ. मनमोहन सिंह यांनी हे विधान केले.

काय म्हणाले मनमोहन सिंह?

डॉ. मनमोहन सिंह म्हणाले की, “ज्यावेळी १९८४ मध्ये दंगल झाली होती तेव्हा गुजराल हे तत्कालीन गृहमंत्री नरसिंह राव यांच्याकडे गेले होते. परिस्थिती खूप नाजूक असल्याचे गुजराल यांनी नरसिंह राव यांना सांगितले होते. अशावेळी सरकारने लवकरात लवकर सेनेला पाचारण करुन परिस्थिती नियंत्रणात आणणे योग्य होईल, असा सल्ला गुजराल यांनी दिला होता. जर त्यावेळी गुजराल यांचा तो सल्ला ऐकला असता तर १९८४ची दंगल रोखता आली असती.” मनमोहन सिंह पुढे म्हणाले की, “गुजराल यांनी आणीबाणीच्या काळात अनेक समस्यांचा सामना केला. त्यांना योजना आयोगातून काढून टाकण्यात आले होते. त्यावेळी मी अर्थमंत्रालयात आर्थिक सल्लागार होतो. त्यानंतर आम्हा दोघांमध्ये मैत्री झाली होती.”

- Advertisement -

दरम्यान १९८० च्या दशकात गुजराल काँग्रेस सोडून जनता दलमध्ये गेले होते. तर १९८४च्या दंगली दरम्यान गुजराल यांनी नरसिंह राव यांना मित्रत्वाच्या नात्याने सल्ला दिला होता.

इंद्रकुमार गुजराल देशाचे १२वे पंतप्रधान

एप्रिल १९९७ ते मार्च १९९८ या कालावधीत इंद्रकुमार गुजराल यांनी पंतप्रधानपदाची धुरा सांभाळली. ते देशाचे १२वे पंतप्रधान होते. तर इंदिरा गांधी आणि एचडी देवेगौडा यांच्यानंतर राज्यसभेतून पंतप्रधान बनलेले ते तिसरे व्यक्ती होते. इंदिरा गांधी यांच्या सरकारात १९७५च्या आणीबाणीच्या काळात ते माहिती व प्रसारण मंत्री सुद्धा होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -