घरCORONA UPDATELockdown Crisis: श्रमिक विशेष रेल्वेमध्ये ९७ मजुरांचा मृत्यू झाला

Lockdown Crisis: श्रमिक विशेष रेल्वेमध्ये ९७ मजुरांचा मृत्यू झाला

Subscribe

कोरोना आणि त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी घोषित केलेले लॉकडाऊन हे देशभरातील मजुरांसाठी प्राणघातक ठरलेले आहे. लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात देशभरातील मोठ्या शहरांमधून उत्तरेतील राज्यात जाण्यासाठी मजुरांनी पायी चालत गाव गाठले होते. टीका झाल्यानंतर केंद्राने श्रमिक रेल्वे चालविण्यासाठी परवानगी दिली. मात्र या रेल्वे प्रवासातही अनेक मजुरांना प्राण गमवावे लागले होते. मात्र नेमक्या किती मजुरांचा मृत्यू झाला? याची आकडेवारी मिळत नव्हती. शेवटी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी सरकारला धारेवर धरल्यानंतर केंद्र सरकारने याचे उत्तर दिले आहे. राज्यसभेत दिलेल्या माहितीनुसार ९ सप्टेंबरपर्यंत देशभरात एकूण ९७ मजुरांनी आपले प्राण गमावले आहेत.

खरंतर पावसाळी अधिवेशन सुरु झाल्यापासूनच विरोधी पक्षांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. मात्र सरकारने आमच्याकडे आकडेवारी उपलब्ध नसल्याचे उत्तर दिल्यामुळे विरोधक चांगलेच खवळले होते. तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी राज्यसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी ९७ मजुर मरण पावल्याची माहिती दिली. ९७ पैकी ८७ मृतदेहांना त्या त्या राज्यांनी शवविच्छेदनासाठी पाठविले असल्याचे सांगितले. ८७ पैकी ५१ लोकांचे शवविच्छेदनाचे अहवाल राज्य पोलिसांना मिळाले आहेत. यातील बहुतेक मृत्यू हे कार्डिएक अरेस्ट, हृदयविकार, ब्रेन हेमरेज, फुफ्फुस आणि यकृताच्या आजारामुळे झाले असल्याचे सांगण्यात आले.

- Advertisement -

याआधी मे महिन्याच्या सुमारास ८० मजुरांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले होते. रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ९ ते २७ मे दरम्यान श्रमिक विशेष रेल्वेमध्ये ८० लोकांचा मृत्यू झाला होता.

कोरोना व्हायरसचा प्रभाव वाढू लागल्यानंतर देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. पहिला टप्पा २५ मार्च ते १४ एप्रिल पर्यंतचा होता. १४ एप्रिल नंतर परत लॉकडाऊन घोषित झाल्यानंतर प्रवासी मजुरांमध्ये चलबिचल व्हायला सुरुवात झाली होती. रोजगार बंद झाल्यामुळे आणि जवळचे पैसे संपल्यामुळे मजुर पायीच आपल्या गावी चालत निघाले होते. यावेळी रस्ते अपघातात देखील अनेक मजुरांना आला जीव गमवावा लागला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -