घरदेश-विदेशदीप सिद्धूची हत्या की अपघात, कुटुंबियांनी सांगितली वेगळीच कहाणी

दीप सिद्धूची हत्या की अपघात, कुटुंबियांनी सांगितली वेगळीच कहाणी

Subscribe

पंजाब चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आणि लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकवल्यानंतर प्रसिद्धी झोतात आलेला दीप सिद्धू याचा मंगळवारी रात्री अपघाती मृत्यू झाला. दीप सिद्धूचा मृतदेह पोस्टमार्टम करुन नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला आहे. लुधियाना येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. दरम्यान सोनीपत सिव्हिल हॉस्पीटलमधील तीन डॉक्टरांच्या समितीने शवविच्छेदन केले आहे. पोस्टमॉर्टमचे व्हिडीओ रेकॉर्डिंगही करण्यात आले आहे. त्याचवेळी डीएसपी विपिन कादियान म्हणाले की, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. दरम्यान दीपच्या मृत्यूवरून आता अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. पंजाबमध्ये निवडणुकांची धामधुम सुरु आहे. अशातच दीपचा मृत्यू अपघात नसून सुनियोजित कट असल्याचे त्याच्या कुटुंबियांनी सांगितले आहे.

दीप सिद्धूच्या कारमधून पोलिसांना मिळाल्या ‘या’ वस्तू

सोनीपतचे एसपी राहुल शर्मा यांनी सांगितले की, दीप सिद्धूच्या कारमधून दारूच्या बाट्ल्स सापडल्या आहेत. त्यांच्या रक्ताचे नमुनेही घेण्यात आले आहेत, जेणेकरून दीप सिद्धू अपघाताच्या वेळी मद्यधुंद अवस्थेत होता की नाही हे तपासता येईल. बेजबाबदारपणे कार चालवल्यामुळे हा अपघात झाल्याचे म्हटले जात आहे. सध्या पोलिसांनी दीपचा भाऊ मनदीप सिंग सिद्धू याच्या तक्रारीवरून अज्ञात ट्रक चालक आणि मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मात्र चालक अद्याप फरार असून, त्याचा शोध सुरु आहे.

- Advertisement -

दीपच्या भावाने सांगितला हत्येचा कट कसा रचला गेला?

दीप सिद्धूच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबियांनी हा अपघात नाही तर सुनियोजित हत्येचा कट असल्याचे आरोप केले आहेत. ट्रॉली चालकाने अचानक कारसमोर येत ब्रेक मारल्याने दीपचा त्याच्या कारवरील ताबा सुटला आणि अपघात घडला असल्याचे कुटुंबियांचे म्हणणे आहे. तसेच घटनास्थळी पाणी टाकून सर्व रस्ता साप करण्यात आला याशिवाय अपघातग्रस्त कार घटनास्थळावरून हटवण्यात आल्याचा आरोपही त्याच्या कुटुंबियांनी व्हिडीओ जारी करत केला आहे. त्यामुळे दीप सिद्धूच्या अपघाताची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी पंजाबसह अनेक ठिकाणाहून केली जात आहे.

हत्या की अपघात अशी पंजाबमध्ये चर्चा?

दीप सिद्धूचा भाऊ मनदीपने सांगितले की, ज्या पद्धतीने हा अपघात झाला त्यावरून कट असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मोठ्या ट्रॉली चालकाने अचानक ब्रेक का लावला? अशा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. या दिवसांत दीप सिद्धू अमरगढमधून शिरोमणी अकाली दल अमृतसरचे प्रमुख सिमरनजीत सिंग मान यांच्यासाठीही प्रचार करत होता. दीप किसान चळवळीतही सक्रिय आहे. निवडणुकीचे वातावरण पाहता दीप सिद्धूचा मृत्यू हा मोठा मुद्दा बनला आहे,

- Advertisement -

ट्रॉली चालकाने अचानक ब्रेक लावल्याने दीपचा कारवरील ताबा सुटला

अपघातावेळी दीपसोबत त्याची एक मैत्रिण रीना देखील होती. तिने सांगितले की, स्कॉर्पिओ ट्रॉलीच्या मागे घुसली, दीप बेशुद्ध आहे आणि त्याला खूप दुखापत झाली आहे. त्याला रुग्णालयात नेण्यात आले आहे. एक ट्रॉली आमच्या कारच्या पुढे जात होती, पण ट्रॉली चालकाने अचानक ब्रेक लावला. अचानक ब्रेक लागल्याने दीपनेही ब्रेक लावला, मात्र इतक्या वेळात स्कॉर्पिओ ट्रॉलीमध्ये घुसली. रीनाने सांगितले की, तिला आणि दीप यांना सोनीपतच्या खारखोंडा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर दीपला डॉक्टरांनी मृत घोषित केल्याचे समोर आले. तर रीनावर उपचार सुरू आहेत. रुग्णालयात पोहोचल्यानंतर पोलिसांनी रीनाचा जबाबही नोंदवला.


PUBG Mobile : संपूर्ण जगभरात सर्वात जास्त कमाई करणारा मोबाईल गेम ठरला पब्जी, जाणून घ्या


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -