घरताज्या घडामोडीBooster Dose India: भारतात कॉकटेल बूस्टर डोस शक्य नाही; कोव्हॅक्सिनचा पुरवठा कमी...

Booster Dose India: भारतात कॉकटेल बूस्टर डोस शक्य नाही; कोव्हॅक्सिनचा पुरवठा कमी – ICMR प्रमुख

Subscribe

देशात नवा कोरोनाचा व्हेरिएंट ओमिक्रॉनचा प्रसार वेगाने वाढत आहे. डिसेंबरमध्ये भारतात प्रवेश केलेल्या ओमिक्रॉनची रुग्णसंख्या आता ३ हजार पार झाली आहे. जगात ओमिक्रॉन पसरल्यापासून बूस्टर डोसवर अधिक भर दिला जात आहे. त्यामुळे देशात देखील येत्या १० जानेवारीपासून बूस्टर डोस दिला जाणार आहे. पण त्यापूर्वी इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR)च्या एपिडेमियोलॉजी आणि कम्युनिकेबल डिसीजचे माजी अध्यक्ष डॉ. रमन गंगाखेडकर यांनी भारतात कॉकटेल बूस्टर डोस शक्य नाही, कारण कोव्हॅक्सिनचा पुरवठा कमी असल्याचे हिंदी वृत्तवाहिनी टीव्ही ९च्या मुलाखतीमध्ये सांगितले आहे.

डॉ. रमन गंगाखेडकर म्हणाले की, ‘जे देश बूस्टर डोस किंवा तिसऱ्या डोसच्या रुपात लसींच्या कॉकटेलबद्दल बोलत आहेत, त्या देशांकडे यासाठी लसीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ, ब्रिटनमध्ये लोकांना बूस्टर डोसमध्ये मॅसेंजर राइबो न्यूक्लिक अॅसिड (mRNA) आणि कोविशिल्ड लस देत आहेत. दोन्ही लसीचे डोस पुरेशा प्रमाणात ब्रिटनमध्ये उपलब्ध आहेत. पण भारतामध्ये कोव्हॅक्सिनचे डोस कमी असल्यामुळे बूस्टर डोस देणे परवडणारे नाही. सीरम इन्स्टिट्यूड ऑफ इंडिया (SII) प्रत्येक महिन्याला बारा कोटी पन्नास हजार ते पंधरा कोटी लसीचे डोस तयार करते. तर कोव्हॅक्सिनचे डोस तयार करणारी भारत बायोटेक कंपनी या कालवधीत फक्त पाच ते सहा कोटी डोस तयार करू शकते. अदार पुनावाल यांनी पूर्वीच सांगितले आहे की, जर सरकार बूस्टर डोसची मोहिम सुरू करते तर कंपनीकडे ५० कोटी डोसचा साठा आहे. परंतु भारत बायोटेकने बूस्टर डोस म्हणून कोव्हॅक्सिनच्या उपलब्धतेबाबत कोणतेही आश्वासन दिलेले नाही.

- Advertisement -

पुढे डॉ. गंगाखेडकर म्हणाले की, आमच्याकडे लसींचे संयोजन अधिक प्रभावी असल्याचे अनेक पुरावे आहेत, पण सरकारकडे बूस्टर किंवा सावधगिरीची डोस म्हणून तीच लस निवडण्याशिवाय पर्याय नव्हता. आम्ही सध्याच्या कोव्हॅक्सिन डोसने ८ कोटी तरुणांचे लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करू शकलो तर मला आनंद होईल.

पण लसीचा पुरवठा नसल्यामुळे घाबरुन जाण्याची गरज नाही. बूस्टर डोस म्हणून अद्याप आवश्यक असल्यास कोव्हॅक्सिन उपलब्ध नाही. परंतु त्याचे उत्पादन करणारी टीम ओव्हरटाईम काम करत आहे. काही महिन्यांत आपल्याकडे पुरेशा लसीचे डोस उपलब्ध होतील आणि निवड करण्याचा पर्याय देखील उपलब्ध होईल, असे डॉ. गंगाखेडकर म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – Delhi Weekend Curfew: राजधानी दिल्लीत आज रात्रीपासून वीकेंड कर्फ्यू; काय सुरू, काय बंद?


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -