घरदेश-विदेशकेंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांच्या इफ्तारच्या ट्विटमुळे बिहारमध्ये खळबळ

केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांच्या इफ्तारच्या ट्विटमुळे बिहारमध्ये खळबळ

Subscribe

गिरीराज सिंह यांच्या ट्विटमुळे बिहारच्या राजकारणात खळबळ

बिहारच्या राजकारणात सध्या भाजपचे मंत्री गिरीराज सिंह यांनी केलेल्या एका ट्विटमुळे चांगलीच खळबळ माजली आहे. बिहारमध्ये भाजपची नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड सोबत युती आहे. दोन्ही पक्ष राज्यातील सत्तेत भागीदार आहेत. मात्र केंद्रात जेडीयूला एकच मंत्रीपद देऊ केल्यामुळे नितीश कुमारांनी ते स्वीकारले नाही. तेव्हापासूनच नितीश कुमार आणि भाजप यांच्यात बेबनाव निर्माण झाल्याचे चित्र दिसले होते. आता तर गिरीराज सिंह यांनी जेडीयूच्या इफ्तार पार्टीवर उपरोधिक असे ट्विट केले आहे. या ट्विटचा विरोध आता जेडीयूचे नेते करत आहेत. जेडीयूच्या इफ्तार पार्टीचे फोटो ट्विट करत गिरीराज सिंह म्हणाले की, “इफ्तार प्रमाणेच जर नवरात्रीला सुद्धा फलाहार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले तर ते चित्र देखील सुंदर असेल.” या ट्विटवरून अमित शाह यांनी आता गिरीराज सिंह यांची खरडपट्टी काढली आहे. मित्रपक्षांबद्दल आदर व्यक्त करावा, अशा कानपिचक्याच शाह यांनी गिरीराज यांना दिल्या आहेत.

बिहारच्या बेगूसराय या मतदारसंघातून डाव्या पक्षाचे उमेदवार कन्हैया कुमारला पराभूत करून गिरीराज पुन्हा एकदा खासदार झाले आहेत. मोदी सरकारमध्ये त्यांचा यावेळी देखील मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. बिहार राज्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते म्हणून त्यांच्याकडे पाहीले जाते. मात्र आज त्यांनी आपल्याच मित्रपक्षाला शहाणपण शिकवणारे ट्विट केल्यामुळे वाद ओढवून घेतला आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार, केंद्रीय मंत्री रामविलास पासवान, भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री सुशील मोदी, माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांचे इफ्तार पार्टीतील फोटो ट्विट करून गिरीराज यांनी नवरात्रोत्सवात फलाहार कार्यक्रमाचे आयोजन करण्याचा सल्ला दिला आहे.

- Advertisement -

गिरीराज सिंह यांच्या ट्विटवर जेडीयेचे प्रवक्ते संजय सिंह यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. “भारत जगातील सर्वात सुंदर देश आहे कारण येथे सर्व धर्म आणि संप्रदायांना मानले जाते. तसा संविधानाने अधिकारच दिलेला आहे. आम्ही दुर्गामातेची आराधना करून फलाहार करतो आणि रमजानच्या महिन्यात इफ्तार देखील करतो. हेच तर सर्व धर्म समभावचे सुंदर चित्र आहे.”

- Advertisement -

संजय सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आपल्या जुन्या वक्तव्यांची आठवण करून दिली. गिरीराज सिंह यांच्या वक्तव्याला गंभीरतेने घेऊन कारवाई करावी, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

गिरीराज सिंह यांच्या ट्विटवर गदारोळ माजल्यानंतर लगेचच माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांनी नितीश कुमार यांना पुन्हा एकदा महाआघाडीत येण्याचे निमंत्रण दिले. राबडी देवी म्हणाल्या की, जर नितीश कुमार यांनी महाआघाडीत येण्यास पुढाकार घेतला तर आम्ही याचा सकारात्मक विचार करू.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -