घरक्राइमKarnataka High Court : हे दुर्योधन आणि दु:शासनाचे जग आहे, कर्नाटक हायकोर्टाची...

Karnataka High Court : हे दुर्योधन आणि दु:शासनाचे जग आहे, कर्नाटक हायकोर्टाची टिप्पणी

Subscribe

बंगळुरू : बेळगावमध्ये 42 वर्षीय महिलेशी करण्यात आलेल्या अमानुष व्यवहाराबद्दल कर्नाटक उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. सुदैवाने, द्रौपदीला मदत करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण होते. या आधुनिक युगात गरीब द्रौपदीला कोण मदत करणार? मदतीला कृष्ण येणार नाही! द्रौपदीने रडत मदतीसाठी धावा केला, तेव्हा भगवान श्रीकृष्णाने तिला मदत केली. दुर्दैवाने हे दुर्योधन आणि दु:शासनाचे जग आहे. एकही भगवान कृष्ण मदतीला येणार नाही, अशी टिप्पणी न्यायालयाने या घटनेवरून केली आहे. आपण 21व्या शतकात आहोत की, 17व्या शतकात परतत आहोत, असा सवालही न्यायालयाने केला.

हेही वाचा – Central Railway: भंगार विक्रीतून मध्य रेल्वे मालामाल, कोट्यवधी रुपये तिजोरीत जमा

- Advertisement -

बेळगावमध्ये एका महिलेचा मुलगा आपल्या प्रेयसीला सोबत घेऊन पळून गेला. त्या मुलीचे लग्न ठरले होते आणि 11 डिसेंबरला साखरपुडा होणार होता. पण आदल्या दिवशीच ती पळून गेल्याने तिचे कुटुंबीय संतप्त झाले आणि त्यांनी त्या मुलाच्या घरावर हल्ला केला. त्यांनी घरातील सर्वांना मारहाण केली. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर, मुलाच्या आईला फरफटत घराबाहेर घेऊन आले. तिला विवस्त्र करून आधी धिंड काढली आणि नंतर एका खांबाला बांधून तिला मारहाण केली. या घटनेचे सर्वत्र तीव्र पडसाद उमटले.

- Advertisement -

कर्नाटक उच्च न्यायालयाने या घटनेची स्वत:हून दखल घेतली. मुख्य न्यायमूर्ती पी बी वराळे आणि न्यायमूर्ती कृष्णा एस दीक्षित यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. आरोपींच्या मनात कायद्याचे भय नाही, ही चिंतित करणारी गोष्ट आहे. पीडित महिलेला मदत करण्यास पोलीस का तत्पर नव्हते? अशी घटना कशी होऊ दिली जाते? असे प्रश्न विचारून खंडपीठाने पोलिसांची कानउघाडणी केली. पोलिसांचे काम केवळ तपास करणे नाही तर लोकांचे रक्षण करणे देखील आहे. अशा घटनांबाबत पोलिसांनी सतर्क राहिले पाहिजे. एका जोडप्याच्या पळून गेल्याची बातमी छोट्याशा गावात वणव्यासारखी पसरली असेल, असे न्यायालायने नमूद केले.

हेही वाचा – Maratha Reservation : मराठा आरक्षणासंदर्भात महाराष्ट्रातील खासदारांची नवी दिल्लीत एकत्रित बैठक

माझ्याकडे शब्द नाहीत! किती आघात झाला असेल त्या महिलेच्या मनावर. तिला घरातून ओढून बाहेर नेण्यात आले, तिचे कपडे उतरवले गेले आणि जनावराप्रमाणे मारहाण केली. जवळपास दोन तास हे सुरू होते. ते हल्लेखोर माणसे आहेत का? प्राण्यांनाही काही समज असते. पण माणसे अशीच वागतात का? त्या जनावरांनी तिला दोन तास मारहाण केली. त्या हल्लेखोरांना माणूस म्हणायला देखील मला लाज वाटते. कोणी इतका क्रूर, इतका अमानुष कसा असू शकतो? असे मुख्य न्यायाधीशांनी सांगितले.

गावामध्ये 11 डिसेंबरला घडलेली ही घटना खोलवर रुजलेला पुरुषी अहंकार दर्शवते. केवळ पुरुष आहेत म्हणून ते महिलेशी क्रूर वागू शकतात? पुरुष आहेत म्हणून त्यांना असे काही करण्याचा परवाना मिळाला का?, असे सांगून न्यायमूर्ती म्हणाले, या घटनेमुळे गावातील इतर महिलांना काय वाटले असेल? कोणत्याही समंजस महिलेला भीती तर वाटेलच. ती या देशाचा तिरस्कार करू शकते. द्रौपदीचे वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा महाभारतातही असे घडले नाही. ही घटना अत्यंत निंदनीय आहे.

हेही वाचा – Narayana Murthy : नारायण मूर्ती यांचा डीपफेक व्हिडिओ व्हायरल, लोकांना सतर्क राहण्याचा इशारा

ही घटना भावी पिढीवर परिणाम करेल, असे सांगून न्यायालयाने सांगितले की, जिथे आपल्याला चांगल्या भविष्याची स्वप्ने पाहण्याची संधी मिळेल, असा समाज आपण घडवत आहोत की, जिथे जगण्यापेक्षा मरणे चांगले आहे, जिथे महिलेचा आदर नाही, असा समाज आपण निर्माण करत आहोत का? असा उद्विग्न सवालही न्यायालयाने केला. पोलीस आयुक्तांसह सहाय्यक पोलिस आयुक्तांनी (एसीपी) 18 डिसेंबर रोजी प्रत्यक्ष न्यायालयात हजर राहावे, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा अतिरिक्त अहवालही हायकोर्टाने पोलिसांना सादर करण्यास सांगतानाच, हल्लेखोरांना तातडीने अटक करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.

हेही वाचा – Loksabha MP Suspension : 14 खासदारांचे निलंबन, पण…; संजय राऊत यांची मोदी सरकारवर टीका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -