घरदेश-विदेशLok Sabha 2024 : महाराष्ट्रात नरेंद्र मोदी विरुद्ध उद्धव ठाकरे असा सामना,...

Lok Sabha 2024 : महाराष्ट्रात नरेंद्र मोदी विरुद्ध उद्धव ठाकरे असा सामना, संजय राऊतांचा दावा

Subscribe

मोदी महाराष्ट्रात येऊन बाळासाहेबांच्या शिवसेनेचा 'नकली शिवसेना' असा उल्लेख करतात, कारण त्यांना उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेची भीती वाटते. मोदी यांनी महाराष्ट्रात येऊन अशी भाषणे सातत्याने केली पाहिजेत, कारण ते जिथे जातील तिथे भाजपाची जागा कमी होईल, अशी उपहासात्मक टीका संजय राऊत यांनी केली

मुंबई : चंद्रपूरमधील भाजपा उमेदवार सुधीर मुनगंटीवार आणि गडचिरोली-चिमूरमधील भाजपा उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचाराच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काल, सोमवारी चंद्रपुरात जाहीर सभा पार पडली. या सभेत मोदी यांनी ही लढाई स्थिरता विरुद्ध अस्थिरतेदरम्यानची असल्याचे सांगितले. तर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी, नरेंद्र मोदी विरुद्ध माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असा सामना असल्याचा दावा केला. (Lok Sabha Election 2024: Narendra Modi Vs Uddhav Thackeray in Maharashtra)

नरेंद्र मोदी यांनी चंद्रपुरच्या सभेत काँग्रेससह ठाकरे गटावर जोरदार टीका केली. काँग्रेसला लक्ष्य करताना मोदी यांनी मराठी म्हणीचा वापर केला. कडू कारले तुपात तळले, साखरेत घोळले, तरी कडू ते कडूच. ही म्हण काँग्रेसला लागू होते. कारण ते कधीही सुधारणार नाही आणि बदलणार नाही, असे टीकास्त्र मोदींनी डागले. तर, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला ‘नकली शिवसेना’ संबोधले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना पुढे घेऊन जात असल्याचे त्यांनी सांगितले होते.

- Advertisement -

हेही वाचा – Sanjay Raut : राज्यातील राजकारणात साडेतीन शहाणे, संजय राऊतांचा कोणावर निशाणा?

यासंदर्भात खासदार संजय राऊत यांना आज, मंगळवारी विचारले असता, ते म्हणाले, मोदी महाराष्ट्रात येऊन बाळासाहेबांच्या शिवसेनेचा ‘नकली शिवसेना’ असा उल्लेख करतात, कारण त्यांना उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेची भीती वाटते. उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार हे वादळे अंगावर घेत दीपस्तंभासारखे उभे आहेत. अशा परिस्थितीत बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला बोलणे हाच एक नकली विचार असून असली काय आणि नकली काय हे या निवडणुकीत स्पष्ट होईल, असे त्यांनी सुनावले.

- Advertisement -

मोदी यांनी महाराष्ट्रात येऊन अशी भाषणे सातत्याने केली पाहिजेत, कारण ते जिथे जातील तिथे भाजपाची जागा कमी होईल, अशी उपहासात्मक टीकाही त्यांनी केली. महाराष्ट्रात नरेंद्र मोदी विरुद्ध उद्धव ठाकरे असा सामना आहे. म्हणजेच, धर्म विरुद्ध अधर्म, दडपशाही विरुद्ध प्रामाणिकपणा अशी लढत आहे. सर्व हिसकावून घेऊन सुद्धा या लढ्यात एक अर्जुन, श्रीकृष्ण उतरले आहेत, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – Thackeray group : ‘महाशक्ती’नामक असुरी शक्ती वरवर रामराज्याचे नाव घेत…, ठाकरे गटाचे टीकास्त्र

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -