घरदेश-विदेशमनमोहन सिंग मोदींवर नाराज, पत्र लिहून राष्ट्रपतींकडे तक्रार

मनमोहन सिंग मोदींवर नाराज, पत्र लिहून राष्ट्रपतींकडे तक्रार

Subscribe

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग मोदींवर नाराज झाले असून, त्यांनी थेट राष्ट्रपतींकडेच नरेंद्र मोदींची तक्रार केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काँग्रेस नेत्यांबद्दल धमकीची भाषा वापरली होती. त्यासंदर्भात मनमोहन सिंग आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अन्य नेत्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहून मोदींच्या भाषेबद्दल आक्षेप नोंदवला. मोदींना जबाबदारीने बोलण्यास सांगा, अशी सूचना त्यांनी पत्रात केली.

मोदींच्या धमकावणाऱ्या भाषेचा निषेध नोंदवत, लोकशाही देशातील पंतप्रधानाच्या तोंडी ही भाषा शोभत नाही. सार्वजनिक किंवा खासगी कार्यक्रमात अशा प्रकारचे भाषण योग्य नाही, असे या पत्रात नमूद केले. या पत्रात मल्लिकार्जुन खर्गे, पी. चिंदबरम, अंबिका सोनी, आनंद शर्मा, मोतीलाल व्होरा, करण सिंह, अहमद पटेल आणि कमलनाथ या काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनीही आपल्या स्वाक्षऱ्या केल्या. पत्राच्या सुरुवातीलाच मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेताना जे म्हटले होते, त्याचा उल्लेख केला आहे.

- Advertisement -

कर्नाटकातील हुबळी येथे ६ मे रोजी झालेल्या सभेचा उल्लेख या पत्रामध्ये करण्यात आला असून, त्यावेळी मोदी म्हणाले होते की, ‘काँग्रेस नेत्यांनी कान खोलून ऐकावे, जर तुम्ही तुमची मर्यादा ओलांडणार असाल तर हा मोदी आहे, तुम्हाला किंमत चुकवावी लागेल.’ मोदींनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांचे नाव न घेता गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला होता. सार्वजनिक ठिकाणी बोलताना काँग्रेस नेत्यांनी मर्यादा ओलांडू नये अन्यथा त्यांना किंमत मोजावी लागेल, असेही मोदी म्हणाले.

मोदींनी इतकी आक्रमक भाषा वापरताना कोणाचेही नाव घेतले नाही. पण काँग्रेस माँ आणि त्यांचा मुलगा असा उल्लेख केला. गेल्या आठवड्यातही मनमोहनसिंग यांनी पत्रकार परिषदेतून मोदींवर निशाणा साधला होता. ‘नोटाबंदी आणि जीएसटीने ग्रामीण अर्थव्यवस्था आणि सामान्य व्यक्तींचे मोठे नुकसान केले असून, पेट्रोलच्या वाढत्या दरांनी तर परिस्थिती आणखी बिकट केली आहे. नरेंद्र मोदी विरोधकांबद्दल ज्या पद्धतीने बोलतात. त्यासाठी ते आपल्या पदाचा ज्यापद्धतीने वापर करतात. तसा या पदाचा दुरुपयोग आजपर्यंत कोणी केला नव्हता. एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन बोलणे पंतप्रधानांना शोभत नाही. पंतप्रधानपदाची ते अप्रतिष्ठा करत आहेत. हे देशासाठी ठीक नाही’, अशी टीका त्यांनी मोदींवर केली.

Rashmi Manehttps://www.mymahanagar.com/author/rashmi/
गेल्या ११ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय. प्रिंट, डिजीटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. मनोरंजन, सामाजिक, सांस्कृतिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -