घरदेश-विदेशराष्ट्रीय पुरस्कार घेताना लता करेंचे टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत

राष्ट्रीय पुरस्कार घेताना लता करेंचे टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत

Subscribe

संघर्षगाथा सार्थकी लागल्याचा आनंद!

वयाच्या 65 व्या वर्षी अनवाणी पायाने धावून बारामतीतील शरद मॅरेथॉन जिंकणार्‍या लता करे त्यांच्या आयुष्यावर ‘लता भगवान करे – एक संघर्षगाथा’ हा मराठी चित्रपट बनला. स्वत:च्या जीवनावर आधारित चित्रपटातील अभिनयाबद्दल लता करे यांनाच राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. हा पुरस्कार उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते स्वीकारताना हॉलमध्ये उपस्थितांनी उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे स्वागत केले. मराठमोळ्या आजीच्या धाडसाला आणि जिद्दीला या टाळ्यांमधून राजदरबारात मानवंदनाच देण्यात आली. यावेळी लता करेंना संपूर्ण सभागृहाने उभे राहून अभिवादन केले.

2014 ची गोष्ट… महाराष्ट्रातील एक कष्टकरी महिला आपल्या पतीचे प्राण वाचवण्यासाठी अनवाणी पायाने धावली आणि तिने ती स्पर्धाच नव्हे तर संपूर्ण जग जिंकलं. शेतात मोलमजुरी करणार्‍या 65 वर्षीय लता भगवान करे अचानक आजारी पडलेल्या आपल्या पतीच्या उपचारासाठी मॅरेथॉनमध्ये धावल्या आणि त्यांनी सर्वांसमोर एक आदर्श निर्माण करून दिला. त्यांच्या या धाडसाने चहुबाजूंनी कौतुक झाले. त्यांच्या जीवनावर ‘लता भगवान करे – एक संघर्ष गाथा’ हा मराठी चित्रपटदेखील आला. विशेष म्हणजे या चित्रपटातील लता करेंच्या भूमिकेला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला. सोमवारी स्वतः लता करे यांनी राजधानी दिल्लीत जाऊन उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला. ‘मी कालही संघर्ष केला, आजही माझा संघर्ष सुरू आहे आणि पुढेही माझ्या जीवनात संघर्ष सुरू राहणार आहे. प्रयत्नांना वयाचे कोणतेही बंधन नसते यामुळे जिंकणे चिरतरुण आहे’, असे विचार असणार्‍या लता करे यांनी राष्ट्रीय पुरस्कार मिळवून संपूर्ण देशाचे लक्ष वेधले. आपल्या संघर्षाबाबात ‘एक मुंगीसुद्धा प्रचंड समुद्र पार करून जाऊ शकते आणि हे सामर्थ्य तुमच्यातही आहे. फक्त स्वःतला ओळखण्याचा अवकाश आहे’, असे लता करे सांगतात.

- Advertisement -

लता करे यांच्या पतीला आजारपणात एमआरआय स्कॅनिंग करण्यास सांगितले होते. त्यासाठी 5000 रुपये खर्च सांगितला होता. मोलमजुरी करणार्‍या लता करे चिंतेत सापडल्या. त्यांना कोणीतरी मॅरेथॉनमध्ये पळण्याचे सुचवले. त्या स्पर्धेचे पहिले बक्षीस 5000 रुपये होते. त्यांनीदेखील कोणताही विचार न करता. साडी नेसून, डोईवर पदर घेऊन, अनवाणी पायाने ही स्पर्धा पूर्ण केली. केवळ पूर्ण केली नाही तर ती जिंकलीही. त्यांच्या याच सत्य घटनेवर आधारीत हा चित्रपट बनला आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन नवीन देशबोईना यांनी केले आहे. सामान्य महिलेची ही असामान्य गोष्ट सांगणारा टिझर अंगावर रोमांच उभे करतो. वास्तव घटनेवर आधारित या चित्रपटात लता करे यांनीच मुख्य भूमिका साकारली आहे. तसेच या चित्रपटात त्यांचे पती भगवान करे, मुलगा सुनील करे यांच्याही महत्वपूर्ण भूमिका असून या दोन्ही व्यक्तिरेखा या दोघांनीच साकारल्या आहेत. तसेच चित्रपटात रेखा गायकवाड, राधा चव्हाण, अजय शिंदे, बालकलाकार साक्षी यांच्या भूमिका आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -