घरदेश-विदेशकुलभूषण जाधव केस:पाक ICJमध्ये आज सादर करणार प्रतिज्ञापत्र

कुलभूषण जाधव केस:पाक ICJमध्ये आज सादर करणार प्रतिज्ञापत्र

Subscribe

कुलभूषण जाधव प्रकरणामध्ये पाकिस्तान आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये आज प्रतिज्ञापत्र सादर करणार आहे. जाधव यांना हेरगिरीच्या नावाखाली पाकिस्तानातील लष्करी न्यायालयाने १० एप्रिल २०१७ रोजी फाशीची शिक्षा ठोठावली. पाक लष्कराच्या निर्णयाविरोधात भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये दाद मागितली. त्यानंतर न्यायालयाने जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे.

निवृत्त भारतीय नौदल अधिकारी कुलभूषण जाधव प्रकरणामध्ये पाकिस्तान आज आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्र सादर करणार आहे. हेरगिरी आणि दहशदवादी कारवायांच्या आरोपाखाली पाकिस्तानातील लष्करी न्यायालयाने कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा ठोठावली आहे. त्यानंतर भारताने पाकिस्तानच्या या निर्णयाविरोधात आंतरराष्ट्रीय कोर्टामध्ये दाद मागितली होती. यावर निर्णय देताना आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिली होती. कुलभूषण जाधव प्रकरणी पाकिस्तान हेगमधील आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये ४०० पानांचे प्रतिज्ञापत्र सादर करणार आहे. प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकिस्तानला १७ जुलै पर्यंत मुदत दिली होती. त्यानुसार आज पाकिस्तान आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्र सादर करणार आहे.

हेरगिरीच्या आरोपाखाली कुलभूषण जाधव यांना अटक

पाकिस्तानच्या गुप्तचर विभागाने निवृत्त भारतीय नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना ३ मार्च २०१६ रोजी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली बलुचिस्तान येथून अटक केली होती. जाधव हे भारतीय गुप्तचर संस्था ‘रॉ’साठी काम करत असल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. इराणमार्गे जाधव यांनी पाकिस्तानमध्ये प्रवेश केल्याचे पाकिस्तानचे म्हणणे आहे. जाधव यांच्या अटकेनंतर पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांचा एक व्हिडीओ जारी केला. ज्यामध्ये त्यांनी ‘रॉ’साठी काम करत असल्याची कबुली दिली आहे. तसेच कराची आणि बलुचिस्तानसाठी दहशतवादी कारवायांसाठी जाळे तयार केल्याची कबुली जाधव यांनी दिल्याचा दावा देखील पाकने केला आहे. दरम्यान, पाकमध्ये अटक केलेले जाधव यांचा ‘रॉ’शी कोणताही संबंध नसल्याचे भारताने म्हटले आहे. शिवाय, पाकिस्तानने जाधव यांचा पाकिस्तानमधील वास्तव्याचा कोणताही पुरावा दिला नसल्याकडे भारताने पाकचे लक्ष वेधले. अटकेनंतर जाधव यांच्याविरोधात पाकिस्तानमधील लष्करी न्यायालयामध्ये खटला चालवण्यात आला. यानंतर पाकिस्तानातील लष्करी न्यायालयाने हेरगिरी आणि घातपाती कारवायांच्या आरोपाखाली १० एप्रिल २०१७ रोजी कुलभूषण जाधव यांना दोषी ठरवत फाशीची शिक्षा ठोठावली. पाकिस्तानी लष्करी न्यायालयाच्या निर्णयाविरोधात भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये दाद मागितली. तीन दिवस चाललेल्या युक्तीवादानंतर १८ मे २०१७ रोजी न्यायालयाने पाकिस्तानला फटकारले आणि जाधव यांच्या फाशीली स्थगिती दिली होती. शिवाय, अंतिम निकाल येत नाही तोवर फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी होता कामा नये असे देखील न्यायालयाने पाकिस्तानला बजावले होते. ज्येष्ठ वकील हरिश साळवे यांनी भारताची बाजु मांडली होती. कुलभूषण जाधव हे मुंबईतील माजी सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर जाधव यांचे पुत्र आहेत. ज्यावेळी कुलभूषण जाधव यांना भेटण्यासाठी त्यांची आई आणि पत्नी पाकिस्तानमध्ये गेल्या होत्या. त्यावेळी त्यांना अपमानास्पद वागणूक दिली गेली होती. दरम्यान, आज पाकिस्तान आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्र सादर करणार आहे. यावेळी न्यायालय काय भूमिका घेते याकडे आता साऱ्या जगाचे लक्ष लागून राहिले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -