घरदेश-विदेशकर्नाटकात मान्सूनपूर्व पावसाचा कहर

कर्नाटकात मान्सूनपूर्व पावसाचा कहर

Subscribe

कर्नाटकात मान्सूनपूर्व पावसाने हाहाकार माजलाय. मान्सूनपूर्व पावसामुळे कर्नाटकातील अनेक भागांमध्ये जनजीवन विस्कळीत झालंय. या पावसाचा सर्वात जास्त फटका मंगळुरु शहराला बसलाय. या भागामध्ये घरांचे, झाडांचे मोठं नुकसान झालंय. पूरामध्ये अनेक नागरिक अडकले असून बचावकार्य सुरु आहे.

मंगळुरुमध्ये जनजीवन विस्कळीत

मंगळुरुमध्ये मंगळवारी संध्याकाळी मुसळधार पावसाला सुरुवात झाली. वादळी वाऱ्यासह पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मंगळुरुमध्ये वीजेचे खांब पडले आणि घरांचं मोठं नुकसान झालं. तर अनेक भागामध्ये झाडं जमीनदोस्त झाली आहेत. पावसाचा जोर जास्त असल्याने अनेक ठिकाणी पाणी साचले असून नागरिकांच्या घरात आणि दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. पूरामध्ये अडकलेल्या लोकांना बोट आणि अन्य साधनांच्या साहाय्याने सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे. मंगळुरुसोबतच हुबळी शहरामध्ये देखील पावसामुळे हीच परिस्थिती आहे.

- Advertisement -

प्रशासनाकडून बचावकार्य सुरु

या पावसामुळे कर्नाटकातील अनेक शाळा, कॉलेज आणि दुकानं बंद ठेवण्यात आलेत. गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी गृहमंत्रालयाला फोन करुन ताबडतोब मदत कार्य करण्याचे आदेश दिलेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी देखील जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ मदत कार्य करण्याचे आदेश दिले. सध्या स्थानिक नागरिक आणि एनडीआरएफच्या टीमकडून बचावकार्य सुरु आहे. पूरात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. सध्या बचावकार्य सुरु असून संपूर्ण शहराला सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. तसंच प्रशासनाकडून नागरिकांना आणि मच्छिमारांना समुद्रकिनाऱ्यावर जाऊ नये, असं आवाहन करण्यात आलं आहे.

मान्सून तीन दिवस आधीच केरळमध्ये दाखल

हवामान खात्याने हा मान्सूनपूर्व पाऊस असल्याचं स्पष्ट केलंय. मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडेल आणि पूर परिस्थिती निर्माण होईल, असं वाटलं नसल्याचं हवामान खात्यानं सांगितलं. गेल्या २५ वर्षात ऐवढा मोठा मान्सून पूर्व पाऊस पडला नसल्याचे नागरिकांनी सांगितलं आहे. दरवर्षी मान्सून केरळमध्ये १ जूनला दाखल होतो. मात्र यावर्षी मान्सून ३ दिवस आधीच केरळमध्ये दाखल झाला.

Priya Morehttps://www.mymahanagar.com/author/priya/
गेल्या ६ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत आहे. मला लिहायला, वाचायला आवडतेच पण त्यासोबतच मला नविन ठिकाणी फिरायला खूप आवडते. सध्या नविन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -