घरदेश-विदेशसचिन पायलटांचे उपमुख्यमंत्रीपद काढले

सचिन पायलटांचे उपमुख्यमंत्रीपद काढले

Subscribe

प्रदेशाध्यक्षपदावरूनही हटवले , दोन समर्थक मंत्र्यांचीही हकालपट्टी

राजस्थानमध्ये सत्ता टिकवण्यासाठी संघर्ष करणार्‍या काँग्रेसने मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना बहुमत सिद्ध करण्याचे आव्हान देणार्‍या सचिन पायलट यांची उपमुख्यमंत्रीपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. याशिवाय त्यांचे समर्थक विश्वेंद्र सिंह, रमेश मीना यांची मंत्रिपदेदेखील काढून घेण्यात आली आहेत. उपमुख्यमंत्रीपदासह प्रदेशाध्यक्ष पदावरूनही पायलट यांना हटवण्यात आले आहे. त्यांच्याऐवजी गोविंद सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सरकारविरोधात बंड करणार्‍या सचिन पायलट आणि त्यांच्या समर्थक आमदारांविरोधात काँग्रेसने कठोर कारवाई केली आहे. पायलट यांना उपमुख्यमंत्रीपदासह प्रदेशाध्यक्ष पदावरूनही हटवण्यात आले आहे. तर त्यांच्या समर्थक आमदारांची मंत्रीपदे काढून घेण्यात आली आहेत. काँग्रेस आमदारांच्या बैठकीनंतर प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी याबद्दलची माहिती दिली.

पूर्ण बहुमताने निवडून आलेले सरकार पाडण्यामागे भाजपचे षड्यंत्र आहे. सत्ता आणि पैशांचा वापर करून, ईडी आणि आयकर विभागाकडून दबाव आणून सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेस आमदारांना पैसे देऊन खरेदी करण्याचा प्रयत्न होत आहे. भाजपने सरकार पाडण्यासाठी रचलेल्या कारस्थानात पायलट अडकले आणि त्यांनी जनतेने निवडून दिलेल्या सरकारला धक्का लावण्याचा प्रयत्न केला, अशा शब्दांत सुरजेवाला यांनी पायलट आणि भाजपचा समाचार घेतला. सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्रीपदावरून दूर करतानाच त्यांच्या समर्थक आमदारांवरही पक्षाने कारवाई केली आहे.

- Advertisement -

विश्वेंद्र सिंह आणि रमेश मीना यांना मंत्रीपदावरून काढून टाकण्यात आले आहे. आम्ही गेल्या ७२ तासांपासून सचिन पायलट यांच्यासोबत संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहोत. राहुल गांधी यांच्या माध्यमातून सोनिया गांधींनी पायलट यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला गेला. के. सी. वेणुगोपाल त्यांच्याशी अनेकदा बोलले. त्यांना परत आणण्याचे प्रयत्न झाले. पक्षाचे दरवाजे त्यांच्यासाठी खुले असल्याचे सांगण्यात आले. काही मतभेद असल्यास संवादाच्या माध्यमातून सोडवता येईल, असे आवाहन करण्यात आले. मात्र त्याचा कोणताही उपयोग झाला नाही, असे सुरजेवाला यांनी सांगितले. पायलट आणि त्यांचे समर्थक आमदार राजस्थानातील काँग्रेस सरकार पाडण्याच्या प्रयत्नात असल्याचा गंभीर आरोप सुरजेवाला यांनी केला. पायलट करत असलेली कृती स्वीकारार्ह नाही. त्यामुळे आम्हाला अतिशय दु:खद अंतकरणाने काही निर्णय घ्यावे लागले, असे म्हणत सुरजेवाला यांनी पायलट आणि त्यांच्या समर्थक आमदारांवर करण्यात आलेल्या कारवाईची माहिती दिली.

भाजपच्या षड्यंत्रात पायलट सामील
भाजपच्या सरकार पाडण्याच्या षड्यंत्रात पायलट सहभागी होते, असा आरोप राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केला आहे.घोडेबाजार सुरू असल्याची आम्हाला कल्पना होती. अखेर हाय कमांडने निर्णय घेतला आहे. भाजप देशभरात घोडेबाजार करत असून मध्य प्रदेशनंतर आता राजस्थानमध्ये करण्यात आला आहे, असे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

सत्य परेशान किया जा सकता है । पराजित नही.
-सचिन पायलट, नेतेे, काँग्रेस.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -