घरCORONA UPDATEआंध्र प्रदेशात शाळा उघडल्या आणि २७ विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह झाले!

आंध्र प्रदेशात शाळा उघडल्या आणि २७ विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह झाले!

Subscribe

गेल्या काही दिवसांपासून अनलॉकच्या पार्श्वभूमीवर इतर अनेक गोष्टींसोबतच शाळा देखील सुरू करण्याची मागणी वारंवार समोर येऊ लागली आहे. केंद्र सरकारने देखील अनलॉकचे अनेक टप्पे जाहीर केले आहेत. मात्र, एकीकडे Unlock मध्ये वेगवेगळ्या गोष्टी सुरू होत असतानाच दुसरीकडे रुग्णवाढीचा दर देखील वाढू लागला आहे. मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण वाढू लागले असून गंभीर बाब म्हणजे भारतात आता कोरोना मृतांचा आकडा १ लाखांच्या वर गेला आहे. त्यामुळे अनलॉक करणं योग्य की अयोग्य ही चर्चा एकीकडे सुरू असतानाच आता आंध्र प्रदेशमध्ये या अनलॉकचे परिणाम दिसी लागले आहेत. नुकत्याच आंध्र प्रदेशमधल्या काही शाळा पार्शियली म्हणजेच ठराविक वर्गांसाठीच उघडल्यानंतर तब्बल २७ विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) आढळल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे उघडलेल्या शाळा पुन्हा बंद करायच्या का? असा प्रश्न आंध्र प्रदेश सरकारसमोर उभा राहिला आहे.

शिक्षकांना भेटण्यासाठी विद्यार्थी शाळेत!

अवघ्या २ आठवड्याभरापूर्वी आंध्र प्रदेशमध्ये शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, सर्व वर्गांसाठी शाळा न उघडता फक्त ९वी आणि १०वीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा उघडण्याचा निर्णय घेण्यात आला. केंद्र सरकारने Unlock 4.0 च्या माध्यमातून शाळा काही प्रमाणात सुरू करण्याची मुभा दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला होता. ९वी आणि १०वीच्या विद्यार्थ्यांना शाळेत शिक्षकांना भेटण्याची मुभा देण्यात आली होती. मात्र, विजयनगर जिल्ह्यातले विद्यार्थी शाळेत यायला लागल्यानंतर अवघ्या २ आठवड्यांत जिल्हा परिषदेच्या शाळेतले २७ विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत.

- Advertisement -

दरम्यान, विद्यार्थी पॉझिटिव्ह सापडल्यानंतर आता या विद्यार्थ्यांच्या पालकांची देखील कोरोना चाचणी (Corona Test) केली जाणार आहे. हे विद्यार्थी ज्या भागात राहतात, त्या भागात देखील कोरोना पॉझिटिव्ह क्लस्टर सापडलं असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. हे विद्यार्थी एका खासदी क्लासला देखील जात होते. त्यामुळे तिथे देखील चाचणी केली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत पाठवावं की नाही, असा प्रश्न इथल्या पालकांसमोर उभा राहिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -