घरदेश-विदेश९० वर्षाचे आजोबा हाकतात नांगर, कुळव आणि पेरणीसुद्धा करतात

९० वर्षाचे आजोबा हाकतात नांगर, कुळव आणि पेरणीसुद्धा करतात

Subscribe

वार्ताहर:-आयुष्यात एखादे संकट पचवू न शकल्याने अनेकजण आयुष्याची दोर कापून आपली जीवनयात्रा संपवतात. मात्र मागील ७० वर्षे प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आपला नांगर आणि बैलजोडीची दोर हाती पकडून उभी हयात स्वाभिमानाने जगणार्‍या ९० वर्षाच्या तरुणाची ही प्रेरणादायी कहाणी ऐकल्यानन्तर निश्चितच सर्वजण अवाक झाल्याशिवाय राहणार नाही. यादवराव तगारे असे त्या ९० वर्षीय तरुण शेतकर्‍याचे नाव आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील रानमसले या गावातील हे आजोबा आहेत. ‘आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे, मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे’, गझलकार आप्पा ठाकूर यांच्या गझलमधील ओळी या बळीराजाला लागू पडतात.

खांद्यावर नांगर घेऊन फिरणारे ९० वर्षीय यादवराव यांचा दिनक्रम म्हणजे पहाटे चार वाजता उठणे, थंड पाण्याने अंघोळ करणे, मिळेल तो भाकर तुकडा खाणे आणि दिवस उगवला की निघाले शेताची नांगरणी, कुळवणी, पेरणी करायला. मागील सत्तर वर्षांपासून तगारे आजोबा लोकाचे शेत नांगरायला घेतात. दोन बैलजोड्या सोबतीला घेऊन नव्वद वर्षीय तगारे आजोबा दिवस -रात्र अशा दोन शिफ्टमध्ये आपले काम करतात.स्वाभिमानी वृत्ती आणि कणखर निग्रह याच्या बळावर ते आपल्या रोजीरोटीचा प्रश्न स्वतः मिटवतात. कोणापुढेही त्यांना हात पसरावा लागत नाही….

- Advertisement -

तगारे आजोबांनी आजपर्यंत सात ते आठ बैलजोड सांभाळलीत..वयोमानाने त्या बैलांचे निधन झाले.मात्र तगारे आजही आपल्या पाखर्‍या आणि सर्जा या नव्या बैलजोडीसोबत जोमाने काम करत आहेत.आजोबांचा उत्साह, कामाचा वेग हा आजच्या तरुणालाही लाजवेल असाच आहे. डोक्याला फेटा, अंगावर बंडी आणि धोतर खोचले की आजोबांचे काम सुरु होते. आजोबा कधीही आजारी पडल्याचे कोणालाच आठवत नाहीत. आजोबांना आजारी पडलेले बघणारा पंचक्रोशीत असा माणूस सापडणे विरळाच आहे, असे ग्रामस्थ दयानंद कुंभार आणि बालाजी गरड यांनी सांगितले.

कष्टकरी कसा असतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे यादवराव तगारे आजोबा आहेत. आजही ते नांगर या रानातून त्या रानात सहजपणे नेतात. दुष्काळ असो वा सुकाळ तगारे आजोबा आपले बैल कायम तंदुरुस्त ठेवतात. एकवेळ स्वतःच्या पोटाला खाणार नाहीत पण बैल मात्र हत्तीसारखे टुमदार ठेवतात.

- Advertisement -

जगण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती आणि ठासून भरलेला स्वाभिमान हेच तगारे आजोबांचे बलस्थान आहे..आयुष्याच्या संध्याकाळीही ते सकारात्मकतेने आपले जीवन व्यथीत करत आहेत. त्यामुळे अपयशाने खचून गेलेल्या व्यक्तींसाठी तगारे आजोबा म्हणजे बूस्टर डोसच ठरतील यात तिळमात्र शंखा नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -