घरदेश-विदेशविद्यापीठाच्या मानवशास्त्र विभागातील संग्रहालय शनिवारी सर्वांसाठी खुले

विद्यापीठाच्या मानवशास्त्र विभागातील संग्रहालय शनिवारी सर्वांसाठी खुले

Subscribe

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मानवशास्त्र विभागातील डॉ. इरावती कर्वे मानवशास्त्र संग्रहालय शनिवार, १५ डिसेंबर रोजी सकाळी११ ते दुपारी ४ या वेळात सर्वांना पाहण्यासाठी खुले राहणार आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मानवशास्त्र विभागातील डॉ. इरावती कर्वे मानवशास्त्र संग्रहालय शनिवार, १५ डिसेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळात सर्वांना पाहण्यासाठी खुले राहणार आहे. इरावती कर्वे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून हा निर्णय घेण्यात आला आहे. इरावती कर्वे यांच्या प्रयत्नाने मानवशास्त्राचा स्वतंत्र विषय १९६३ साली पुणे विद्यापीठात सुरू झाला. त्याचबरोबर १९७७ मध्ये मानवशास्त्र विभागात संग्रहालयाची स्थापना करण्यात आली. १५ डिंसेबर १९९३ रोजी डॉ. इरावती कर्वे यांच्या जन्मदिनी मानवशास्त्र संग्रहालयास इरावती कर्वे यांचे नाव देण्यात आले.

या संग्रहालयात एकूण तीन दालने आहेत. त्यात फूट प्रिन्ट्स गॅलरी – मानवी उत्क्रांतिविषयक प्रवासाचे प्रदर्शन, होम आणि हर्थ गॅलरी – भारतातील विविध जमातींच्या समृध्द भौतिक संस्कृतीचे प्रदर्शन आणि उत्सव गॅलरी – धार्मिक उत्सव आणि उत्सवांशी संबंधित भौतिक सांस्कृतिक कलाकृती, तसेच भारताच्या विविध भागातून आणलेल्या अनेक समकालीन हस्तकलेच्या वस्तूंचे दर्शन यामध्ये घडते.

- Advertisement -

माकडांच्या कवट्या, तसेच आदिमानवाच्या विविध टप्प्यातील कवट्या, भारतात मिळालेल्या एकमेव प्रागैतिहासिक नर्मदा मानवाच्या कवटीचा भाग प्रदर्शित केलेला आहे. प्रागैतिहासिक मानवाने उपयोगात आणलेली दगडी हत्यारे, विविध आदिवासी जमातीत वापरल्या जाणाऱ्या वस्तूं ज्यामध्ये मासेमारी संबंधित उपकरणे, शेतिविषयक उपकरणे, शिकारीचे धनुष्य आणि बाण आदिवासी जमातींशी संबंधित उपकरणे प्रदर्शित आहेत. छत्तीसगढमधील बस्तर प्रदेशातील अगारिया जमातींच्या लोह धातू शुध्द करण्यासाठीची भट्टी प्रदर्शित करण्यात आलेली आहे.

मातीची भांडी, तेल काढण्याचे लाकडी यंत्र इत्यादी प्रदर्शित आहे.तसेच ठाकुर आणि वारली जमातींच्या पारंपरिक झोपडीचे नमुने प्रदर्शित केले आहे. उत्सव गॅलरीमध्ये विविध उत्सव, आनंद साजरा करतानाची वापरली जाणारी बोहाडा मुखवटा, आभूषणे, संगीतवाद्यामध्ये झांडी, ढपाती, पावा (बांसुरी), तारपा, रानदा, डमरू, किंगरी, एकतारी वाद्य प्रदर्शित केली आहेत. संग्रहालयाच्या भिंती वारली, गोंड आणि मधुबनी चित्रकलांनी सजविलेल्या आहेत. याशिवाय शनिवारी आदिवासीविषयक लघुफिल्मसुध्दा दाखविण्यात येतील, अशी माहिती विभागप्रमुख प्रा. शौनक कुलकर्णी आणि संग्रहालय प्रभारी उमेश मेंढे यांनी कळविली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -