घरदेश-विदेशTwitter कडून कोरोना महामारीदरम्यान सेवा देणाऱ्या महिलांचा गौरव, 'कोविड शीरोज’ नावाने कौतुक

Twitter कडून कोरोना महामारीदरम्यान सेवा देणाऱ्या महिलांचा गौरव, ‘कोविड शीरोज’ नावाने कौतुक

Subscribe

कोरोना महामारी सुरु झाल्यापासून लोकांना जोडून ठेवण्यात ट्विटरने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. भारतात कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर ट्विटरने सेवेसाठी एकमेकांना मदत करण्याच्या दृष्टीने उभारलेल्या लोक चळवळीत रिअल टाइम हेल्पलाइनची भूमिका बजावली. यात भारताच्या विविध भागांमधील, विविध पार्श्वभूमी, संस्कृती आणि भाषांमधील अनेक स्त्रिया होत्या. ट्विटरच्या माध्यमातून या महिलांनी विश्वासू माहिती, मदत तसेच गरजू लोकांना मानसिक आधार देण्याचे काम केले.

या महिलांनी ट्विटर या ऑनलाइन माध्यमातून कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी केलेल्या कार्याचे कौतुक करण्यासाठी ट्विटर इंडिया आणि विमेन्स राइट्स ऑर्गनायझेशनच्या ब्रेकथ्रूद्वारे त्यांचा ‘कोविड शीरोज’ या नावाने गौरव केला जाणार आहे.

- Advertisement -

या वर्षाच्या सुरूवातीला, ट्विटर इंडियाने ब्रेकथ्रूच्या माध्यमातून महामारीदरम्यान अशक्य कोटीतील प्रयत्न करणाऱ्या महिलांची नावे जाहीर करण्यासाठी आवाहन केले. यात अशा महिला होत्या, ज्या ट्विटरच्या माध्यमातून कोरोना संबंधित मदत कार्य करण्यासाठी व्हर्चुअल आघाडीवर उभ्या राहिल्या, त्यांनी लोकांना विविध माध्यमांतून जोडले, एसओएस कॉल्स दिले आणि आवश्यक असेल तिथे प्रत्यक्ष स्वरूपातही मदत केली.

- Advertisement -


प्रेक्षकांनी जाहीर केलेल्या १०० प्रोफाइल्सची तपासणी केल्यानंतर ट्विटर आणि ब्रेकथ्रू इंडियाने (@INBreakthrough) खालील महिलांना ‘कोविड शीरोज’ (COVID Sheroes) म्हणून घोषित केले आहे.

१) अर्पिता चौधरी

दिल्लीतील २० वर्षीय अर्पिता चौधरी या दिल्ली विद्यापीठाच्या पदवी विद्यार्थिनी असून जजबात फाऊंडेशन या दिल्लीस्थित प्रकल्पाच्या संस्थापक आहेत. या प्रकल्पातून वंचित विद्यार्थ्यांच्या उत्थानासाठी काम केले जाते. भारतात दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाविरोधात लढण्यासाठी २१ एप्रिल रोजी त्यांनी #LetsFightCovidTogether हा उपक्रम सुरू केला. या उपक्रमाचा भाग म्हणून रूग्णालयातील खाटा, ऑक्सिजन पुरवठा, वैद्यकीय मदत आणि इतर अनेक गोष्टींसह इतर माहितीचा लाइव्ह डेटाबेस (live database) तयार केला. अवघ्या ६० दिवसांत अर्पिता आणि तिला माहिती/ सूचनांची पडताळणी करण्यासाठी मदत करणाऱ्या तिच्या मैत्रिणी आरूषी राज (कमला नेहरू कॉलेज) आणि शिवानी सिंघल (कालिंदी कॉलेज) यांना हजारपेक्षा जास्त लोकांना मदत करण्यात यश आले.

२) फथाहीन मिसबा

मैसुरूच्या ३५ वर्षीय फथाहीन मिसबा आयटीच्या क्षेत्रात काम करतात. परंतु समाजाच्या सेवेसाठी आणि सकारात्मक बदलांसाठी त्यांना मदत करणे आवडते. त्यांच्या या विचारांमुळेच त्या कोविडदरम्यान मदतीसाठी पुढे आल्या. त्यांनी ट्विटरवरील आपला समाज आणि पोहोच यांचा वापर मदतीच्या विनंत्या पुढे पाठवण्यासाठी आणि गरजू लोकांशी संपर्क साधण्यासाठी केला. ब्लड प्लाझा आणण्यापासून ते बेड्स, औषधे आणि इंजेक्शनच्या उपलब्धतेबाबत माहिती देण्यापर्यंत फथाहीन यांना लोकांच्या मनात आशा जागवणे शक्य झाले.

३) मॅगी इन्बामुतिया

बंगळुरूच्या ४५ वर्षीय मॅगी इन्बामुतिया सामाजिक कल्याण, वैविध्यपूर्णता आणि समावेश या क्षेत्रात मोठे काम करतात. त्या भारतीय कथा प्रत्यक्षात उतरवण्यासाठी पपेटिका इंडियासोबत काम करतात आणि भारतात प्रादेशिक भाषांमध्ये कथांना प्रोत्साहन देण्यासाठी मंद्रम या नावाची ना-नफा तत्त्वावरील संस्था चालवतात. तसेच लोकांना निसर्गाशी जोडण्यासाठी हॅपीफीट नावाचा आऊटडोअर उपक्रमही त्या चालवतात. कोरोनादरम्यान त्यांनी दक्षिण बंगळुरूमध्ये स्वयंसेवकांच्या टीमचे नेतृत्व केले. त्यांनी दररोज ४० पेक्षा जास्त एसओएस विनंत्या हाताळल्या.

४) मिथिला नाइक-सतनाम

२५ वर्षीय मिथिला या मुंबईतील कम्युनिकेशन्स कन्सल्टंट आहेत आणि त्या युनिसेफ इंडिया प्रोजेक्टवर चरखा डेव्हलपमेंट कम्युनिकेशन नेटवर्क, दिल्लीमध्ये काम करतात. त्या खाना चाहिये फाऊंडेशनमध्ये स्वयंसेवक आहेत. त्यात त्या भागीदारी आणि डिजिटल आऊटरीचचे काम पाहतात. ट्विटरच्या माध्यमातून मिथिला यांना संस्थेचे काम वाढवणे आणि जास्तीत-जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे शक्य झाले. जागतिक साथीदरम्यान त्यांनी आपल्या डिजिटल ज्ञानाचा तसेच खाना चाहिये कम्युनिटीचा वापर करत लोकांना बेड्स, वैद्यकीय पुरवठा आणि ऑक्सिजन मिळवून देण्यासाठी मदत केली.

५) सबिता चंदा 

दिल्लीच्या ४० वर्षीय सबिता या करियर कोच आणि एचआर सल्लागार आहेत आणि त्या मानवतावादी आहेत. त्या गरजू लोकांना मदत करण्यासाठी आपला वेळ देतात. त्यांनी मायग्रंट वर्कर्स मूव्हमेंट सुरू केली. त्याद्वारे जागतिक साथीमुळे निर्वासित झालेल्या आणि उपाशी असलेल्या सुमारे ८००० पेक्षा जास्त स्थलांतरितांना त्यांनी अन्न आणि रेशनची मदत केली. त्यांनी संकटातील कुटुंबांमधील वंचित मुलांना स्मार्टफोन्स आणि लॅपटॉप्सद्वारे ऑनलाइन वर्गात बसण्यासाठी मदतही केली. लोकांना वैद्यकीय मदत पुरवण्यासाठी त्यांनी केलेली मदत, विशेषतः ब्लड प्लाझ्मासाठी पूर्ण केलेल्या १२०० विनंत्या यांच्यामुळे त्यांना प्लाझ्मा क्वीनचा किताब देण्यात आला. त्यांनी ईशान्य आणि हिमाचल प्रदेशातील राज्य सरकारांसोबत लोकांना वैद्यकीय मदत देण्यासाठीही काम केले. सामाजिक कल्याणासाठी वचनबद्ध असलेल्या सबिता लोकांना रेशन मिळवून देण्यासाठी आणि मुलांना शाळेत प्रवेश मिळवून देण्यासाठी निधी उभारण्यासही मदत करतात.

६) सीमा मिश्रा

आयसीआर इलम समूहातील निबंधक आणि शैक्षणिक प्रमुख असलेल्या गाझियाबादच्या ४७ वर्षीय सीमा या विविध स्टार्टअप्सच्या पॅनल सल्लागार आणि मार्गदर्शकही आहेत. एक मानवतावादी म्हणून सीमा यांनी डेव्हलप इंडिया एनजीओची स्थापना केली आणि त्या शिक्षणाचा दर्जा, सबलीकरण आणि पर्यावरण समस्यांसाठी काम करतात. कोरोना महामारीदरम्यान सीमा यांनी आपल्या कुटुंब तसेच मित्रांसाठी स्त्रोतांचा शोध घेत असलेल्यांसाठी वैद्यकीय मदत पुरवण्याच्या दृष्टीने स्वयंसेवकाच्या एका समूहासोबत काम करण्यास सुरूवात केली. आपल्या टीमसोबत त्यांनी लोकांना अन्न, ब्लड प्लाझ्मा आणि रूग्णालयातील बेड्सशी जोडले व त्यासाठी त्यांनी आपल्या ट्विटरवरील नेटवर्कचा वापर केला. त्यांनी राष्ट्रीय स्तरावरील लॉकडाऊनदरम्यान भरकटलेल्या स्थलांतरित लोकांना आपल्या घरी पोहोचवण्यासाठीही मदत केली. सध्या त्या लसीकरणाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि लोकांच्या मनातील लसीची भीती कमी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

या वर्षाच्या सुरूवातीला आंतरराष्ट्रीय महिला दिनापूर्वी ट्विटरने सुरू केलेल्या एका संशोधनातून असे दिसून आले होते की, भारतातील ट्विटरवरील २०.८ टक्के महिला चालू घडामोडींवरील संवादात सहभागी होतात आणि ८.७ टक्के महिला सामाजिक बदलांबाबत बोलण्यास उत्सुक असतात. या निष्कर्षांचा पुरावा म्हणून समोर आलेल्या या ‘कोविड शीरोज’ हजारो लोकांसाठीच्या कठीण काळात आशेचा किरण ठरल्या आणि त्यांनी आपल्या उद्योजकतेच्या कौशल्यांद्वारे बदलाला प्रोत्साहन दिले.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -