घरदेश-विदेश'कॅब सोड नाहीतर तुझे कपडे फाडीन'; उबर चालकाची तरुणीला धमकी!

‘कॅब सोड नाहीतर तुझे कपडे फाडीन’; उबर चालकाची तरुणीला धमकी!

Subscribe

उबर चालकानं महिला प्रवाशाशी गैरवर्तणूक केल्याचा पुन्हा एक प्रकार समोर आला आहे.

ओला, उबरसारख्या कॅबच्या बाबतीत गेल्या काही महिन्यांमध्ये महिलांशी गैरवर्तणूक होत असल्याच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे या सेवांवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असतानाच आता आणखीन एका प्रकरणामुळे उबर सेवेच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. बंगलोरमध्ये एका महिलेने उबरचालकाविरोधात सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टमध्ये गंभीर आरोप केले आहेत. ‘रात्री उशिरा संबंधित उबर चालकानं आपल्याला गाडीतून उतरण्याची धमकी दिली आणि खाली उतरली नाहीस तर तुझे कपडे फाडीन’, असं म्हटल्याचं या पोस्टमध्ये संबंधित महिलेनं नमूद केलं आहे. सदर महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार उबरनं या प्रकरणात अंतर्गत चौकशी सुरू केली आहे.

काय लिहिलंय या पोस्टमध्ये?

रविवारी रात्री हा प्रकार घडल्याचं या महिलेच्या पोस्टवरून दिसत आहे. ‘द न्यूज मिनट’ने दिलेल्या वृत्तानुसार, सदर महिला आपल्या मित्रमंडळी आणि ऑफिसमधील सहकाऱ्यांसोबत रात्रीचं जेवण झाल्यानंतर घरी निघाली होती. यावेळी तिने उबरवर कॅब बुक केली. कॅबमध्ये बसल्यापासून संबंधित उबरचालक फोनवर समोरच्या व्यक्तीशी ग्राहकांच्या तक्रारी करत होता. अचानक या चालकाने मागे वळून सदर महिलेला ‘रात्रीच्या वेळी दारू पिऊन उशिरा घराबाहेर पडणं ठीक नाही. ७ वाजेच्या आत घरी जायला हवं’, असं सांगितलं. मात्र, त्यावर ‘मी दारू प्यायलेले नाही आणि तुम्ही तुमचं काम करा’, असं या महिलेनं सांगितलं. मात्र, त्यावर रागात या चालकानं उलट समोरच्या व्यक्तीकडे माझीच तक्रार करून माझ्याबाबत आक्षेपार्ह शब्दांत टिप्पणी केली. मी जेव्हा उबरच्या मोबाईल अॅप्लिकेशनवर सेफ्टी बटण दाबलं, तेव्हा त्यांनी मला फोन करण्याऐवजी उलट त्या चालकालाच फोन केला. त्याने कस्टमर केअरला मी नशेत असल्याचं खोटंच सांगितलं. मी आरडाओरडा केल्यानंतर कस्टमर केअरच्या महिलेने माझ्याशी बोलून तातडीनं दुसरी कॅब बुक करून देण्याबाबत सांगितलं. रात्रीची वेळ असल्यामुळे मी कॅबमध्ये थांबल्यानंतर सदर उबर चालकानं थेट मला गाडीतून उतरायला सांगितलं. ‘गाडीतून खाली उतर नाहीतर तुझे कपडे फाडीन’, अशी धमकीच त्याने दिली. रात्री ११ वाजून १५ मिनिटांनी मला निर्जन अशा रस्त्यावर उतरवून तो निघून गेला. त्यानंतरही बराच वेळ उबरची दुसरी कॅब आली नाही. त्यामुळे नाईलाजास्तव मला माझ्या मित्रांनाच मदतीला बोलवावं लागलं.

- Advertisement -

दरम्यान, या प्रकरणानंतर सोशल मीजियावर उबरच्या सेवेवर मोठ्या प्रमाणावर टीका झाल्यानंतर उबरकडून पावलं उचलण्यात आली. ‘जे घडलं ते निषेधार्ह असून आमच्या नियमांचं उल्लंघन करणारं आहे. आम्ही चालकाच्या संपर्कात असून उबर अॅप्लिकेशनचा संबंधित चालकाचा अॅक्सेस देखील काढून घेण्यात आला आहे’, असं कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.


तुम्ही हे वाचलंत का? – उबर टॅक्सीत ‘मुका’ घेणारे प्रवासी पुढील प्रवासाला मुकणार
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -