घरदेश-विदेशनरेंद्र मोदींनी शरद पवारांनाच का केले टार्गेट?

नरेंद्र मोदींनी शरद पवारांनाच का केले टार्गेट?

Subscribe

वर्धा येथील प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकीय गुरू मानलेल्या शरद पवारांना आणि राष्ट्रवादीला लक्ष्य केले.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीची भाजपाचे नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रतील पहिली प्रचारसभा आज वर्धा येथे झाली. या प्रचारसभेत भाषण करताना नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांना प्रामुख्याने ‘टार्गेट’ केले. पंतप्रधान झाल्यानंतर शरद पवारांना राजकीय गुरू मानत बारामतीला जाणाऱ्या पंतप्रधान मोदी यांनी टिका केल्यानेे राज्यात भाजपा युतीतर्फे निवडणुकीत राष्ट्रवादीला पुन्हा लक्ष्य केले जाणार हे स्पष्ट झाले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की जाणते नेते शरद पवार यांनी निवडणुकीतून ऐनवेळी माघार घेतली याचा अर्थ यंदा मतदारांचा कल कोणत्या दिशेला आहे हे त्यांच्यासारख्या अभ्यासू नेत्याने ओळखले आहे. आपल्या संभाषणात त्यांनी पुन्हा एकदा 2014च्या वेळचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ‘धरणातील पाण्याच्या’ वक्तव्याचा संदर्भ दिला, तसेच राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी केलेल्या सिंचन घोटाळ्याचाही उल्लेख केला. राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष कौंटुंबिक कलहातून शरद पवारांच्या हातातून निसटत असल्याचेही त्यांनी सांगितले. या संपूर्ण भाषणात श्री मोदी यांना जास्तीत जास्त रोख कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतील केवळ राष्ट्रवादी कॉँग्रेसवरच असल्याचे दिसून आले.

- Advertisement -

निवडणूक प्रचाराचे धोरण ठरविताना भाजपाने महाराष्ट्रात राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि शरद पवार यांच्या कुटुंबियांना लक्ष्य करण्याचे पद्धतशीरपणे ठरविलेले दिसते. याचे मुख्य कारण म्हणजे सध्या राज्यात कॉँग्रेसपेक्षाही राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष अधिक सक्रिय आणि बळकट विरोधक म्हणून कार्यरत आहे. गेल्या पाच वर्षांत राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नेत्यांनी भाजपाप्रमाणेच ज्या पद्धतीने सोशल मीडियासह विविध प्रचारतंत्रांचा प्रभावी वापर केला आहे, त्यातून विरोधी पक्ष म्हणून त्यांचे उपद्रवमूल्य वाढलेच आहे, शिवाय भाजपा सरकारच्या विरोधातील मुद्दे अगदी पद्धतशीरपणे मांडण्यात यशस्वी झाले. विशेषत: मागच्या 3 वर्षात सोशल माध्यमांमध्येे राष्ट्रवादी कॉग्रेसने भाजपाविरोधात चांगली आघाडी घेतल्याचे दिसून आले.

सोशल मीडियासोबतच मध्यंतरी काढलेल्या संघर्ष यात्रेदरम्यान राष्ट्रवादीचे नेते थेट जनतेपर्यंत पोहोचले होते. त्यादरम्यान त्यांनी शेती आणि ग्रामीण विकासाबद्दल सरकारची फसलेली धोरणे, नोटबंदी, जीएसटी नंतर झालेली शेतकऱ्यांची अवस्था, कर्जमाफीतील त्रुटी यासह आता राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळी स्थितीवर चांगलेच रान उठविले. त्यामुळेही भाजपापुढे आव्हाने निर्माण झाली होती.

- Advertisement -

#Live :पंतप्रधान मोदी यांची वर्ध्यात सभा

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಭಾನುವಾರ, ಮಾರ್ಚ್ 31, 2019

विशेष म्हणजे मागील निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेसे नेते आणि मंत्र्यांवर सिंचन घोटाळ्याचे आरोप केलेल्या भाजपाला महाराष्ट्रात सत्तेत येण्यासाठी त्यांचाच आधार घ्यावा लागला. त्यानंतर असे काही घोटाळे झालेच नव्हते अशी मखलाशीही भाजपाच्या धुरिणांनी करायला सुरवात केली. परिणामी सिंचन घोटाळ्याच्या आरोपांचे पुढे काय झाले याबाबत जनता अनभिज्ञच राहिली. दरम्यान शिवसेनेशी युती झाल्यानंतर आता निवडणुक प्रचारात टिका करण्यासाठी किंवा लक्ष्य करण्यासाठी समोर दुसरा ताकदीचा विरोधक म्हणजे राष्ट्रवादी कॉँग्रेसच असल्यानेही भाजपाने या पक्षावर लक्ष्य करायला सुरवात केली आहे. याशिवाय मधल्या काळात विरोधक म्हणून कॉँग्रेस पक्ष राज्यात बऱ्यापकी दुबळा झालेला आहे. अनेक दिग्गज घराणी अलिकडेच कॉँग्रेसमधून भाजपात गेली आहे. त्यामुळे सध्या वजनदार विरोधक केवळ राष्ट्रवादीतच असल्याचे वास्तव आहे.


वाचा काय म्हणाले मोदी – शरद पवार पुतण्याच्या हातून हिट विकेट!

पवारांचे राजकारण भल्याभल्यांनही समजले नाही?
अभ्यासू आणि जाणत्या राजकारण्यांमध्ये राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची गणना होते. पुरोगामी आणि सुसंस्कृत राजकारणी म्हणूनही त्यांची ओळख आहे. महाराष्ट्रात तर एका वर्गात ‘जाणता राजा’ अशी त्यांची प्रतिमा आहे. पुलोद सरकारचा प्रयोग करून शरद पवार यांनी आपल्या कसलेल्या राजकारणाची ओळख देशाला घडविली होेती. त्यानंतर कुठलाही राजकीय भूकंप झाला की ‘या मागे शरद पवार असू शकतात ‘ अशी चर्चा राज्यात होत आली आहे. पवार कुणाला कुठल्या वेळेस राजकीय धोबीपछाड देतील हे त्यांच्या निकटवर्तीयांनाही सांगता येत नाही, अशी प्रतिमाही त्यांची राजकारणात प्रसिद्ध आहे. त्यातच भाजपा सरकारविरोधात महाआघाडी उघडण्यासाठी शरद पवार यांनी पुढाकार घेतला आणि अनेक पक्षांची मोटही बांधली. त्यामुळेही ते भाजपाच्या रडावर आले होते. निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच्या काळात शरद पवार यांनी केलेली भाजपा विरोधी मुद्देसूद वक्तव्ये आणि त्यातून लोकांच्या मनात निर्माण झालेला सरकारबद्दल संभ्रम यामुळेही राज्यातील भाजपाला यंदा लोकसभेच्या वेळेस राष्ट्रवादीचा पेपर अवघड जाणार अशी चिन्हे दिसत आहेत.

या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून राज्यातील पहिल्याच प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपाच्या वतीने यंदाच्या निवडणुकीत राज्यात राष्ट्रवादी कॉँग्रेसला ‘लक्ष्य’ केल्याचे दिसत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -