घरदेश-विदेश'माफ करा सर, मी आत्ताच माझ्या मित्राला भोसकलंय'!

‘माफ करा सर, मी आत्ताच माझ्या मित्राला भोसकलंय’!

Subscribe

एखाद्या व्यक्तीला चाकूने भोसकल्यानंतर ती व्यक्ती किती शांत राहू शकते? कर्नाटकमधल्या एका ट्रॅफिक पोलिसाला नुकताच याचा प्रत्यय आला. ते पाहून पोलिसही चक्रावले!

एखाद्या व्यक्तीची हत्या करताना हत्या करणाऱ्या व्यक्तीची मानसिकता काय असते? किंवा तिच्या मनात नक्की काय सुरू असतं? याचा माग कुणीही घेऊ शकत नाही. अशा मानसिकतेचा अंदाज कुणीही लावू शकत नाही. कधी या व्यक्ती खूप रागात असतात किंवा कधी त्या खूपच शांत असतात. असाच एक धक्कादायक प्रकार कर्नाटकच्या चिक्कबल्लापुरममध्ये घडला आहे. त्यामुळे समोरचे पोलिसही हादरून गेले. एका तरुणाने आपल्या मित्राला भोसकलं होतं. वाचायला गेलं तर ही आपल्या कानांवर येणाऱ्या इतर गुन्हेगारी घटनांसारखीच एक घटना वाटेल. पण ज्या पद्धतीने हा गुन्हेगार मित्राला भोसकल्यानंतर वागत होता, ते पोलिसांच्याही कपाळावर आठ्या आणणारं होतं.

आणि शांतपणे त्याने खिशातून चाकू काढला…

चिक्कबल्लापुरममध्ये ट्रॅफिक पोलिस वेणू नेहमीप्रमाणे दिवसभराचं काम संपवून संध्याकाळी पाचच्या सुमारास एक तरुण विना हेल्मेट बाईकवरून येताना त्यांना दिसला. त्यामुळे वेणूंनी त्याला हटकलं. त्यावर कोणताही विरोध किंवा गडबड न करता तो तरुण जागेवरच थांबला. त्याच्याकडे लायसन्स नव्हतं. त्यामुळे वेणूंनी त्याची १०० रुपये दंडाची पावती फाडली. अजिबात वाद न घालता शांतपणे त्या तरुणाने १०० रुपये दंड भरला. आणि जितक्या शांतपणे त्याने पैसे खिशातून काढले, तितक्याच शांतपणे एक रक्तबंबाळ चाकू त्यानं खिशातून काढला. वेणूंना काही कळायच्या आत त्यानं तोंड उघडलं आणि शांतपणे सांगायला सुरुवात केली.

आय एम सॉरी सर. पण मी आत्ताच माझ्या मित्राला या चाकूने भोसकलं आहे. त्या गोंधळात मी तसाच बाईकवर बसलो. आत्ता मी गुन्हा कबुल करण्यासाठी पोलीस स्टेशनलाच जात होतो. हेलमेट न घातल्याबद्दल मला माफ करा.

- Advertisement -

ट्रॅफिक पोलीस वेणूंना या प्रकारानंतर काय करावं तेच सुचेना. थोडा वेळ तेही स्तब्ध झाले. मग त्यांनी भानावर येत तरुणाच्या हातून चाकू काढून घेतला आणि त्याला ताब्यात घेतलं. त्याची चौकशी केल्यानंतर सगळा प्रकार उघड झाला. आणि त्याच्या असं करण्याचं कारणही पोलिसांना समजलं!

तरुणाने पोलिसांना सांगितल्याप्रमाणे….

या तरुणाचं नाव संदीप शेट्टी होतं. तो मूळचा कर्नाटकातल्या उडुपीचा आहे. पण कामधंद्यासाठी काही वर्षांपूर्वी तो चिक्कबल्लापुरममध्ये आला होता. आणि त्याने भोसकलेल्या व्यक्तीचं नाव देवराज असं आहे. देवराज त्याचा बिझनेस पार्टनर आहे. देवराजने संदीप शेट्टीकडून वर्षभरापूर्वी १ लाख रुपये उधार घेतले होते. एका जमिनीत ते पैसे गुंतवून नंतर जमिनींच्या किंमती वाढल्यानंतर तीच जमीन विकून जास्त नफा कमावण्याची त्याची योजना होती. संदीपने त्याला पैसे दिले. मात्र वर्षभरानंतरही देवराजने पैसे परत केले नाहीत. त्यामुळे वैतागलेल्या संदीपने अखेर देवराजला त्याच्या घरी गाठलं. तिथे देवराजनं त्याला पैसे देणार नाही असं सांगितलं. त्यामुळे संतापलेल्या संदीपने देवराजला सोबत आणलेल्या चाकूने भोसकलं.

- Advertisement -

पोलिसांनी केलेल्या तपासानुसार....

देवराज आणि संदीपचा वाद सुरू असताना अचानक आसपासच्या लोकांनी आणि बाजूच्याच दुकानदाराने देवराजचा ओरडण्याचा आवाज ऐकला. ते त्याच्या मदतीसाठी धावले. मात्र, तोपर्यंत संदीप बाईकवरून पसार झाला होता. त्यानंतर संदीपनं थेट पोलीस स्टेशनचा रस्ता धरला अशी माहिती चिक्कबल्लापुरमचे पोलीस अधिक्षक प्रभूशंकर यांनी दिली.


तुम्ही हे वाचलंत का? – प्रेमप्रकरणातून तरुणाची चाकू भोसकून हत्या, ४८ तासात लावला छडा

दरम्यान, देवराजच्या शेजाऱ्यांनी त्याला लागलीच जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केलं आहे. या ठिकाणी देवराजवर उपचार सुरू असून सध्या त्याची स्थिती स्थिर असल्याची माहिती देखील पोलिसांनी दिली. याप्रकरणी जिवे मारण्याचा प्रयत्न करण्याचा गुन्हा संदीप शेट्टीवर दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -