घरसंपादकीयअग्रलेखताळतंत्र महत्त्वाचे...

ताळतंत्र महत्त्वाचे…

Subscribe

गेल्या रविवारी पनवेलजवळील खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याची सांगता होत असताना भयंकर दुर्घटना घडली. या सोहळ्यासाठी आलेल्या लाखो श्री सदस्यांपैकी अनेकजणांना उष्माघाताचा त्रास झाला. यापैकी १३ जणांना जीव गमवावा लागला आहे. शेकडोच्या संख्येत रुग्ण उपचार घेत आहेत. या दुर्दैवी घटनेनंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांची राळ उडणे तितकेच दुर्दैवी आहे. हवेत उष्म्याचे प्रमाण कमालीचे वाढलेले असताना असा कार्यक्रम ठेवणे सर्वथा चुकीचेच आहे. पहिले ताळतंत्र सुटले ते इथेच! महाराष्ट्र भूषण हा राज्य शासनाचा सर्वोच्च पुरस्कार असल्याने तो राजभवनासारख्या ठिकाणी किंवा अगदी एखाद्या मोठ्या बंदिस्त हॉलमध्ये घेतला असता तर त्याने पुरस्काराची प्रतिष्ठा कमी होणारी नव्हती. नानासाहेब धर्माधिकारी असोत, आप्पासाहेब धर्माधिकारी असोत किंवा धर्माधिकारी कुटुंबातील इतर कुणी असोत, ते जेव्हा जाहीर कार्यक्रमाच्या ठिकाणी जातात तेथे श्री सदस्यांची गर्दी होणे हे समीकरण ठरलेले आहे, मात्र धर्माधिकारी यांच्या बैठक सांप्रदायात शिस्तीला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

त्यामुळे रेवदंडा येथून सूचना किंवा आदेश असेल तेवढेच श्री सदस्य कार्यक्रमाच्या ठिकाणी जातात. महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा बंदिस्त ठिकाणी झाला असता तरी श्री सदस्यांनी घरी बसून किंवा बैठक होते त्या ठिकाणी एकत्र जमून तो मनोभावे दूरचित्रवाणीवर पाहिला असता. अर्थात इतका मोठा पुरस्कार आपल्या गुरुवर्यांना मिळतोय आणि तो आपल्याला ‘याची देही याची डोळा’ पाहता यावा ही प्रत्येक श्री सदस्याची इच्छा असणार आणि म्हणून खारघरचा सोहळा घेण्यात आला तर ती चूकही म्हणता येणार नाही. धर्माधिकारी यांच्या कार्यक्रमांचा ज्यांनी अनुभव घेतला अशा त्रयस्थांना तेथील शिस्त, भक्तीभाव आदी सारेच भावलेले आहे. हा सोहळा सकाळी घ्यावा किंवा सायंकाळी घ्यावा यावरून आता वेगवेगळी स्पष्टीकरणे दिली जात आहेत. अर्थात त्याला काही अर्थ नाही. सकाळची वेळ असल्याने कार्यक्रमाच्या ठिकाणी मंडप घालणे गरजेचे होते. काही कोटी या सोहळ्यासाठी खर्च होत असताना मंडपाचा खर्च वाढला असता तर त्यावर कुणी आक्षेप घेतला नसता. शेवटी श्री सदस्यांची काळजी घेणे हा भाग महत्त्वाचा होता.

- Advertisement -

एकीकडे राजकीय मंडळी, बडे सरकारी अधिकारी यांच्यासाठी वातानुकूलित आसन व्यवस्था केली गेली असताना श्री सदस्यांना रणरणत्या ऊन्हात बसवून ठेवणे ही बाब योग्य म्हणता येणार नाही. मंडप असता तर उष्माघाताचे प्रमाण नगण्य राहून अनर्थ टळण्यास मदत झाली असती. हा सोहळा सरकारी असल्याने आपल्या वरिष्ठांची काळजी घेण्याची काळजी संबंधित यंत्रणांनी घेतल्याचे दिसून येते. घडलेल्या दुर्घटनेनंतर श्री सदस्यांचा जो संताप उफाळून आलाय त्यात ते प्रशासनाला दोषी ठरवून नियोजन नसल्याचे सांगतात. श्री सदस्यांची शिस्त वाखाणण्याजोगी आहे. ते कितीही गर्दी असली तरी चेंगराचेंगरी होईल अशा पद्धतीने जा-ये करीत नाहीत. त्यामुळे चेंगराचेंगरीमुळे अनर्थ घडलाय ही काहींकडून होणारी सारवासारव तकलादू आहे. उष्माघातामुळेच हा प्रकार घडला. घडलेला प्रकार हा अत्यंत क्लेषदायी असल्याने यापुढे असे कार्यक्रम घ्यायचे की नाही याचा सरकारला दहादा विचार करावा लागेल. सर्वसामान्यांच्या कार्यक्रमावर, उत्सवावर निर्बंधांचा पाऊस पाडणारे सरकार इथे मात्र ताळतंत्र सुटल्यासारखे वागल्याचे जाणवते.

सध्या कोविडचे भय राज्यासह देशात वाढलेले असताना हेच सरकार सर्वसामान्यांना गर्दी करू नका, मास्क वापरा असा सल्ला देते. त्याचवेळी आपल्याच कार्यक्रमात या नियमांना हरताळ फासण्याचे काम सरकारकडून होते हा फरक लक्षात घेण्यासारखा आहे. मागील कोविड काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादेत घेतलेल्या ‘नमस्ते ट्रम्प’ या कार्यक्रमावर चौफेर टीका झाली होती. त्याची आठवण खारघरच्या कार्यक्रमानिमित्ताने अनेकांना झाली असेल. आपल्याला एक नियम आणि इतरांना नियम-अटींमध्ये करकचून बांधून टाकणे, वेळप्रसंगी पोलिसांकरवी दडपशाही करणे हे उद्योग सरकारने थांबविले पाहिजेत. इतरांना जो नियम तोच आपल्यालाही लागू आहे याचे ताळतंत्र सरकारी अधिकार्‍यांनी ठेवले पाहिजे. असे मोठे कार्यक्रम शहराच्या ठिकाणी घेताना आसपासचे जनजीवन प्रभावित होत असते याचा विचार सवंग लोकप्रियता मिळविण्याच्या नादात राजकारणी करत नाहीत. अगोदरच शहरातून वाहतूक व्यवस्था कोलमडलेली असताना गर्दीचे कार्यक्रम ही व्यवस्था अधिकच कोलमडवून टाकतात. त्यामुळे उद्योगांचे नुकसान होते.

- Advertisement -

खारघरच्या कार्यक्रमात दुर्घटना घडल्यानंतर विरोधी पक्षांकडून वेगवेगळे मुद्दे उपस्थित केले जात आहेत. यातील काही मुद्दे कार्यक्रमापूर्वी जाहीरपणे मांडण्याची हिंमत कुणी दाखविली नाही. कारण ते नाराजी ओढावून घेतल्यासारखे झाले असते. महाराष्ट्र भूषण सोहळ्याला लागलेले गालबोट यापुढे कायम चर्चेत राहणार आहे. काही दिवसांपूर्वी आशा भोसले यांना मुंबईत २०२१ चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला. तो कार्यक्रम कधी झाला हे अनेकांना कळलेही नसेल. यावेळी मात्र कार्यक्रमाचे पद्धतशीरपणे मार्केटिंग करण्यात येऊन आपली टिमकी वाजविण्याची संधी राज्यकर्त्यांनी वाजवून घेतली. शांत, संयमी अशी ख्याती असलेल्या आप्पासाहेब धर्माधिकारी यांना हा प्रकार नक्कीच आवडलेला नसेल. त्यामुळे दुर्घटनेनंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू होताच या घटनेचे राजकारण होऊ नये असे सांगत आप्पासाहेबांनी ताळतंत्र नसलेल्या राजकारण्यांचे वेळीच कान उपटले ते योग्य म्हणावे लागेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -