घरसंपादकीयअग्रलेखसत्य काय आणि जीत कोणाची?

सत्य काय आणि जीत कोणाची?

Subscribe

‘बाळासाहेब थोरात तुमच्याकडे एक तक्रार आहे. सत्यजितसारखे नेते, तुम्ही किती दिवस बाहेर ठेवणार आहात. सत्यजितला जास्त दिवस बाहेर ठेऊ नका, नाहीतर आमची नजर त्यांच्यावर आहे. कारण, चांगली माणसं जमाच करायची असतात’, असे सांगत काही दिवसांपूर्वीच देवेंद्र फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे सत्यजित तांबेंना भाजपात येण्याची एकप्रकारे ऑफरच दिली होती.

‘बाळासाहेब थोरात तुमच्याकडे एक तक्रार आहे. सत्यजितसारखे नेते, तुम्ही किती दिवस बाहेर ठेवणार आहात. सत्यजितला जास्त दिवस बाहेर ठेऊ नका, नाहीतर आमची नजर त्यांच्यावर आहे. कारण, चांगली माणसं जमाच करायची असतात’, असे सांगत काही दिवसांपूर्वीच देवेंद्र फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे सत्यजित तांबेंना भाजपात येण्याची एकप्रकारे ऑफरच दिली होती. सत्यजित तांबे यांनी मराठीत अनुवाद केलेल्या ‘सिटीझनविल’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. तरीही परंपरेप्रमाणे काँग्रेसच्या एकाही नेत्याने या विधानाकडे गांभीर्याने बघितले नाही आणि तिथेच घात झाला. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला.

काँग्रेसने अधिकृतपणे ज्यांची उमेदवारी जाहीर केली होती आणि जे गेल्या ३ पंचवार्षिकपासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत त्या आमदार सुधीर तांबे यांनी अर्ज दाखल न करता नाट्यमयरित्या माघार घेतल्याने आश्चर्य व्यक्त झाले. सत्यजित तांबे हे डॉ. सुधीर तांबे यांचे पुत्र आहेत आणि डॉ. सुधीर तांबे हे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे मेहुणे आहेत. काँग्रेसचा इतका मोठा वारसा असतानाही सत्यजित यांनी आपल्या पुस्तक प्रकाशनाला भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांना बोलावणे यातच सारे काही येते. या मतदारसंघासाठी काँग्रेसने डॉ. तांबे यांना एकीकडे उमेदवारी जाहीर केली होती, तर भाजपने शेवटच्या क्षणापर्यंत एकाचीही उमेदवारी जाहीर न करता सस्पेन्स कायम ठेवला.

- Advertisement -

भाजपकडे चांगल्या उमेदवारांची कमतरता होती असेही नाही. राधाकृष्ण विखे-पाटील यांचे बंधू राजेंद्र विखे-पाटील, क्रां. व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेचे सरचिटणीस हेमंत धात्रक, धनंजय जाधव, धुळ्याचे धनराज विसपुते या सर्वांची नावे उमेदवारीसाठी चर्चेत होती. असे असतानाही उमेदवारीच न देण्याची खेळी भाजपच्या पथ्यावर पडेल असे दिसते. असे बोलले जाते की, सत्यजित यांचा ओढा अनेक महिन्यांपासून भाजपकडे होता, परंतु नगरमधील त्यांचे राजकीय स्पर्धक त्यांना पुढचे पाऊल उचलू देत नव्हते. याला निमित्त ठरला २०१८ चा एक व्हायरल व्हिडीओ. यात सत्यजित हे एका आंदोलनादरम्यान, नरेंद्र मोदी यांच्या छायाचित्राला काळे फासताना दिसत आहेत. या व्हिडीओचे भांडवल करीत त्यांचा भाजप प्रवेश रोखण्यात आला होता, परंतु विधान परिषदेच्या निमित्ताने आता त्यांनी भाजपमध्ये चंचुप्रवेश करण्याचा मनसुबा रचल्याचे एकूणच हालचालींवरून दिसते. सत्यजित तांबे यांनी अर्ज दाखल करण्यापूर्वी ‘वारसाने संधी मिळते परंतु कर्तृत्व हे सिद्ध करावंच लागतं’ असे ट्विट करून आपण कर्तृत्व सिद्ध करायला तयार आहोत हे स्पष्ट केले होते.

हे सर्व उघडपणे ट्विटरवर टाकले जात असताना काँग्रेसला ‘डॅमेज कंट्रोल’ करता आला नाही याचेही आश्चर्य वाटते. त्यामुळे आता नाना पटोले यांनी कितीही ऊर बडवला तरी त्याचा फारसा उपयोग होणार नाही. वरकरणी ही घटना एका मतदारसंघापुरती मर्यादित वाटत असली तरी काँग्रेसच्या राजकारणावर तिचा दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे. सत्यजित तांबे यांच्या पुस्तक प्रकाशनाला भाजप नेत्याने येणे, त्यानंतर आमदार डॉ. तांबे यांनी उमेदवारी जाहीर होऊनही अर्ज दाखल न करणे आणि अचानक सत्यजित यांचा अर्ज दाखल होणे या बाबी एकाएकी घडलेल्या मुळीच नाहीत. त्यामागे व्यवस्थित नियोजन झालेले दिसते. आज तांबे भाजपच्या गळाला लागले, उद्या याच कडीतील बाळासाहेब थोरात गळाला लागल्यास नवल वाटू नये. कारण काँग्रेसचा प्रदीर्घ वारसा असलेले राधाकृष्ण विखे-पाटील यांनी ज्यावेळी भाजपमध्ये प्रवेश केला त्याचवेळी राजकारणात काहीही होऊ शकते या उक्तीला दुजोरा मिळाला. अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणात थोरात, कोल्हे, काळे, पिचड आणि विखे घराण्याचे प्रभुत्व आहे. यापैकी कोल्हे, पिचड आणि विखेंनी यापूर्वीच भाजपशी घरोबा केला आहे.

- Advertisement -

थोरातही जर भाजपमध्ये आले, तर मात्र नगर जिल्ह्यातून काँग्रेसचा सुपडा साफ होऊ शकतो. भाजपची एकूणच रणनीती पाहिली, तर त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या मोठ्या राजकीय घराण्यांना टार्गेट केलेले दिसते. याच मालिकेचा एक भाग म्हणून भाजपची नजर आता तांबे यांच्या आडून थोरातांवर पडलेली दिसते. आज विधान परिषदेत भाजपच्या सदस्यांची संख्या महाविकास आघाडीच्या तुलनेने कमी आहे. ही संख्या वाढवण्यासाठी भाजपकडून येनकेन प्रकारे प्रयत्न होत आहेत. त्याचाच भाग म्हणून सत्यजित तांबे यांच्या गळ्यात अपक्ष उमेदवारीची माळ घालून भविष्यात त्यांना आपल्या गोटात समाविष्ट करून घ्यायचे अशीच रणनीती भाजपची दिसते.

शिक्षक मतदारसंघाच्या माध्यमातूनही भाजप चमत्कार घडवण्याचा प्रयत्न करेल. नागपूरमधून भाजप पुरस्कृत शिक्षक परिषदेचे शिक्षक उमेदवार नागो गाणार यांची लढत महाविकास आघाडीचा घटक असलेल्या शिक्षक भारतीच्या राजेंद्र झाडे यांच्याशी होणार आहे. अमरावतीत भाजपच्या डॉ. रणजित पाटील यांचा सामना महाविकास आघाडीचे धिरज लिंगाडे यांच्याशी, तर औरंगाबादमध्ये राष्ट्रवादीचे विक्रम काळे आणि भाजपचे किरण पाटील अशी लढत होईल. कोकण शिक्षक मतदारसंघात शेकापचे बाळाराम पाटील यांना महाविकास आघाडीने पाठिंबा दिला आहे. भाजपकडून ज्ञानेश्वर म्हात्रे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने ही लढतदेखील रंगतदार होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -