घरसंपादकीयअग्रलेखअहवालांवर अनास्थेची दरड!

अहवालांवर अनास्थेची दरड!

Subscribe

रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीवर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेची कारणमीमांसा आणि अशी घटना या भागात पुन्हा घडू नये म्हणून उपाययोजना सुचविण्याचे काम आता भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागा (जीएसआय) मार्फत होईल. पश्चिम घाट जैवविविधता तज्ज्ञ समितीचा अहवाल सरकारला सादर करून बराच काळ लोटला आहे, पण योग्य वेळेत मंजुरी आणि त्याची अंमलबजावणी झाली असती, तर निश्चित काही घटना टाळता आल्या असत्या. लोकांचेही प्राण वाचले असते, असे निरीक्षण ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ यांनी नोंदवले आहे. गाडगीळांनी शासनाला धारेवर धरलेले असताना अन्य अहवालांकडेही आजवर शासनाचे दुर्लक्षच झालेले दिसते. दरड कोसळण्याच्या घटना जितक्या घडल्या तितकेच वेगवेगळ्या तज्ज्ञांचे अहवालही समोर आले. ३० जुलै २०१४ ला माळीण गावावर दरड कोसळून तब्बल १५१ लोकांचा जीव गेला होता. २२ जुलै २०२१ ला तळीये गावात झालेल्या दुर्घटनेत सुमारे ६५ जण मृत्यूमुखी पडले, ११ जुलै २००५ रोजी मुंबईतील अ‍ॅण्टॉप हिल येथे दरडीखाली ५ जण ठार झाले, रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील ५ गावांमध्ये २५ जुलै २००५ रोजी डोंगरकडा कोसळून १९४ जण ठार झाले, तर ५ सप्टेंबर २००९ रोजी मुंबईतील साकीनाका येथे दरड कोसळून १२ जण ठार झाले होते. सातत्याने अशा घटना घडत असल्याने वन विभागाचे तत्कालीन सहसचिव श्रीनिवास राव यांच्या नेतृत्वाखाली ‘दरड कोसळणे’ या विषयावर माहिती घेऊन एक अभ्यासपूर्ण ‘आदर्श संहिता’ तयार करण्यात आली होती. त्यानुसार महाराष्ट्र राज्याचा १५ टक्के भूभाग दरडप्रवण आहे. यात नाशिक, ठाणे, रायगड, मुंबई, पुणे, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्ह्यांत दरडी कोसळण्याचा धोका सर्वाधिक आहे. या जिल्ह्यांच्या घाट परिसरात विशेष काळजी घेण्याची गरज आहे. एकट्या मुंबईत दरडीखाली राहणार्‍यांची संख्या एक लाखाहून अधिक आहे. बहुतांश दुर्घटनांचा अभ्यास भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने वेळोवेळी केला आहे. सुमारे १७ वर्षांपूर्वी शासनाच्या पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाच्या प्रधान सचिवांनी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे संचालक सू. प. बागड यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली होती. या समितीने सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, पाटण व जावळी तालुक्यात मोठ्या प्रमाणात दरडी कोसळण्याचे व जमीन खचण्याच्या घटनांचा अभ्यास केला होता. बहुतांश घटना अतिवृष्टीमुळे घडत असल्याचे या अभ्यासातून पुढे आले होते.

भूस्खलन होणे ही नैसर्गिक प्रक्रिया जरी असली तरी मानवनिर्मित कारणांमुळे भूस्खलन वेगाने होत असल्याचेही समितीने म्हटले होते. कठीण पाषाणात नैसर्गिकरित्या अस्तित्वात असलेल्या संधी, भेगा व फटी मोठ्या खडकांचे तुकडे होण्यास कारणीभूत ठरतात. विशेषत: अतिवृष्टीच्या कालावधीमध्ये, खडकातील संधी-भेगा-फटीमध्ये पाणी शिरून खडकाची झीज होत राहते. त्यामुळे खडकाचे वजन वाढते आणि अशाप्रकारच्या संधी-भेगा-फटी रुंदावत जाऊन खडकांचे तुकडे वेगळे होऊ लागतात. अशाप्रकारचे खडक उतारी प्रदेशात घसरत जाऊन खालील बाजूस स्थिरावतात. यालाच दरड कोसळणे असे म्हणतात. भूशास्त्रीय दृष्टिकोनातून खडकांची झीज होऊन तसेच विघटन प्रक्रियेमुळे खडकाची माती होते. अशाप्रकारची माती निसरडी असल्याने, उतारावरील घरांच्या बांधकामाच्या वजनाने खचते व घसरत राहते. त्यामुळे या मातीने व्याप्त प्रदेशातील घरे जमीन खचल्याने कोसळतात आणि म्हणूनच जीवित आणि वित्त हानी मोठ्या प्रमाणात होण्याचा धोका असतो. याशिवाय मानवनिर्मित कारणांमध्ये उतारी भूभागाचे शेतीसाठी सपाटीकरण करणे, तसेच रस्ते बांधणे व त्यांचे रुंदीकरण करणे यांचा प्रामुख्याने समावेश होतो. यामुळे अतिपर्जन्यमानाच्या कालावधीत उतारी प्रदेशावरून वाहून जाणारे पाणी सपाटीकरण केलेल्या भागात स्थिरावते आणि मुरण्याच्या प्रक्रियेस सुरुवात होते. यामुळे खडकांमध्ये विघटन प्रक्रिया गतिमान होते आणि भुसभुशीत प्रस्तर ढासळतात. त्यामुळे जमिनीवरील पीक रचनासुद्धा नष्ट होते अथवा जमिनीबरोबर पुढे सरकली जाते. भूस्खलनाच्या नैसर्गिक कारणांमध्ये गाव भूकंप प्रवण क्षेत्रात असल्यास कमी अधिक क्षमतेच्या भूकंपाच्या धक्क्यांंचाही समावेश होतो. या अहवालामध्ये अशा दुर्घटनामागे निसर्गनिर्मित कारणांबरोबर मानवी हस्तक्षेप जबाबदार असल्याचे स्पष्टपणे दर्शविले आहे.

- Advertisement -

माळीण दुर्घटनेनंतर भूस्खलन तज्ज्ञ डॉ. सतीश ठिगळे यांनी केलेल्या अभ्यासात लक्षात आले की, अशा दुर्घटना मुख्यत: जमिनीचे सपाटीकरण आणि त्यासाठी केलेल्या जंगलतोडीमुळे होतात. त्याचप्रमाणे अतिवृष्टी, डोंगर रांगावर वाढते अतिक्रमण, त्यावर वस्ती होण्याचे वाढते प्रमाण, अतिक्रमण, डोंगरावरील खोदाई आदी कारणांमुळेदेखील दरड कोसळण्याचा धोका वाढला आहे. डोंगरावर कमी होत असलेली वृक्षसंपदा दरड कोसळण्याचे एक प्रमुख कारण आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. आजवर झालेल्या अभ्यासांच्या निष्कर्षांनुसार अतिशय संवेदनशील भाग असलेल्या प्रदेशांमधील हस्तक्षेप तातडीने थांबवले पाहिजेत. मानवी कृत्यांबरोबरच हवामानातील बदलांचे गांभीर्य लक्षात घेऊन यापुढे काळजीपूर्वक पावले उचलावी लागणार आहेत. अशा घटनांना वाढती लोकसंख्याही कारणीभूत आहे. भारत हा जगात सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेला देश बनला आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे निवार्‍याची गरज वाढत जाते. त्यामुळे लोक तिथे जागा मिळेल तिथे दाटीवाटीने झोपडीवजा घरे बांधतात, त्यातून डोंगरही सुटत नाहीत. सपाट जागा संपली की, लोक तिकडे वळतात आणि दरडींचे बळी ठरतात.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -