घरसंपादकीयअग्रलेखसुबुद्धी दे रे बाप्पा...

सुबुद्धी दे रे बाप्पा…

Subscribe

परंपरा आणि प्रथेप्रमाणे आज तुझे धुमधडाक्यात आगमन झाले आहे. आमच्या अडचणी असोत-नसोत, पण तुझ्या स्वागताला आम्ही कुठे कमी पडत नसतो. तुझे आगमन आम्हाला नवचैतन्य, सळसळता उत्साह प्रदान करीत असते. तुझ्या येण्याने एरव्ही विखुरलेली कुटुंबे एकत्र येतात.

परंपरा आणि प्रथेप्रमाणे आज तुझे धुमधडाक्यात आगमन झाले आहे. आमच्या अडचणी असोत-नसोत, पण तुझ्या स्वागताला आम्ही कुठे कमी पडत नसतो. तुझे आगमन आम्हाला नवचैतन्य, सळसळता उत्साह प्रदान करीत असते. तुझ्या येण्याने एरव्ही विखुरलेली कुटुंबे एकत्र येतात. तु तुझ्या गावाला परतेपर्यंत वातावरण कसे भारावून जाते. आम्ही सर्वसामान्यजन तुझ्या आगमनाच्यावेळी नवीन संकल्पही सोडत असतो. त्यासाठीचे नियम पाळण्याचाही कसोशीने प्रयत्न करतो. पण…पण देवा तुझ्यासमोर जाहीररित्या आणाभाका घेणारी बडी धेंडं मात्र प्रत्यक्षात वेगळ्याच मस्तीत असल्याचे आम्ही पाहतो. कोणतेही नियम आम्ही पाळायचे, ह्यांनी मात्र कसेही वागायचे. असो. गणपती बाप्पा, तू सध्या पहातोयंस की महागाईने कळस गाठला आहे. आम्हा सर्वसामान्यांचे जीणे अवघड झाले आहे.

आज काय इंधन दरवाढ, तर उद्या अन्नधान्याचे भाव काय वाढतायंत. खर्चाची तोंडमिळवणी करताना दमछाक होतेय. राजकारण्यांना याची काही तमा नाही. विरोधात असले की महागाईवर बोलायचे, सत्तेत आल्यानंतर या महागाईला विसरून जायचे, हे वर्षोनुवर्षे चालले आहे. जीवघेण्या महागाईने सर्वसामान्य मेटाकुटीला आला आहे. एकीकडे अर्धे अन्न ताटात तसेच ठेवायची रूढ झालेली आधुनिक पद्धत आणि दुसरीकडे संध्याकाळची चूल कशी पेटेल याची भ्रांत असलेली जनता हे दृश्य पाहिले की जीवाची कालवाकालव होते. पण करणार काय बाप्पा? आम्ही पडलो सोशिक, पापभिरू! तोलून मापून बोलायचे, आपल्या बोलण्याने समोरचा दुखावणार तर नाही ना, याची चिंता करणारी आम्ही माणसे. त्यामुळे आज संबंधित यंत्रणांना आमचा अजिबात धाक उरलेला नाही. त्यांच्यावर तुझा वचक राहिला तर सर्वसामान्यांना जगणे सुसह्य होईल.

- Advertisement -

जनतेचा पैसा लुटण्याची या देशात अहमहमिका सुरू आहे. यातील अनेक लुटारू या दहा दिवसांत तुझ्या दर्शनाला येतील, स्वतःला मिरवून घेतील. त्यांचे सत्कारही होतील. हे पाहिलं की असं वाटतं की चुकीच्या मार्गावर जाणेच योग्य की काय?… परंतु आम्ही तत्व पाळणारे तुझे पाईक! त्यामुळे आमचे पाय वाकडे वळण घेणार नाहीत, याची खात्री आहे. बँका, सरकारी तिजोर्‍या लुटण्याचा हा राजरोस सुरू असलेला कार्यक्रम पाहिला की संताप येतो. अतिरेक झाला की या लुटारूंच्या काळ्या धंद्यांची लक्तरे वेशीवर टांगली जातात. पण देवा, त्यांना याचे काहीच वाटत नाही. निर्लज्जम् सदा सुखी या उक्तीप्रमाणे ते उजळ माथ्याने फिरत असतात. समोरची व्यक्ती अडचणीची वाटलीच तर त्याला गुपचूप विदेशात पाठविले जाते. खिशात कष्टातून मिळालेल्या पगाराची रक्कम आल्यानंतर खूश होणारे आम्ही लुटलेल्या रकमेचे आकडे पाहून अवाक् होतो. देशाला दिवसाढवळ्या लुटणार्‍या या लुटारूंना बाप्पा तूच आवरलंस तर, अन्यथा या देशाचे काही खरे नाही.

राजकारण्यांबद्दल तर काय बोलावं? बेडकांचाही अवमान होईल अशा पद्धतीने बेडुकउड्या मारल्या जात आहेत. आम्हाला खोक्यात काही तरी वस्तू भरलेल्या असतात इतकेच माहीत! पण आता एका खोक्यात एक कोटी रुपये असतात म्हणे. असे अनेक खोके दिले की स्वार्थी राजकारणी बेडकालाही लाजवतील अशा उड्या मारायला तयार होतात. महाराष्ट्रातही अलिकडे खोक्यांचे राजकारण झाले म्हणतात. अर्थात देवा तू सर्वज्ञानी असल्याने त्यातील खरे-खोटे तुलाच माहीत. बाप्पा, या राजकारण्यांचे डोके ठिकाणावर असते की नाही तेच समजेनासे झाले आहे. आज एक बोलतात, उद्या त्याच्या विरोधात बोलतात. कधीतरी आम्हाला ही करमणूक वाटायची, आता मात्र उबग आलाय. आता तर या सुसंस्कृत महाराष्ट्रात आमदारांमध्येच फ्री स्टाईल होऊ लागली आहे. गेल्या बुधवारीच दोन आमदार एकमेकांना बदडताना पाहिले तेव्हा शरमेने मान खाली गेली.

- Advertisement -

राजकारणातील नितीमूल्ये पायदळी तुडविताना आता एकमेकांना पायाखाली घेतले जाणार असेल तर देवा या राजकारणाचे काही खरे वाटत नाही. तू बुद्धीदाता आहेस असे आम्हाला शाळेत शिकत असताना गुरुजींनी मनावर बिंबवून ठेवले आहे. त्यामुळे आम्ही तुझ्याकडे कायम ‘सुबुद्धी दे’ असे मागणे मागत असतो. पण याच शिक्षण देणार्‍या क्षेत्रात करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करण्याचे धारिष्ट्य काहींना कसे होते हेच समजत नाही. तिकडे पश्चिम बंगालमध्ये शिक्षण घोटाळ्यात सापडलेल्यांकडील नोटा मोजण्यासाठी चक्क यंत्रे मागवावी लागली. शिक्षण क्षेत्रात किंबहुना सरस्वतीच्या अंगणातून मिळेल ते ओरबाडण्यास सोकावलेली टोळधाड नाहीशी करण्यासाठी गणपती बाप्पा तूच आता सर्वसामान्यांना बळ दे. शिक्षण महर्षींचे आलेले उदंड पीक शिक्षण क्षेत्राच्या मुळावरच कधीतरी येणार नाही ना, अशी शंका यायला लागली आहे.

बाप्पा, तू पाहुणा म्हणून आजपासून काही दिवसांसाठी मुक्कामाला आलायंस. कोकणात तुझ्या आगमनाप्रित्यर्थ जल्लोष सुरू आहे. तुझ्या भक्तांना गावी येताना किती त्रास झाला हे तुझ्या लक्षात आलेच असेल. खड्ड्यांतून प्रवास करून गावी पोहचेपर्यंत त्यांची दमछाक झाली. तू येणार म्हणून रस्त्यावरचे खड्डे भरण्याला सुरुवात झाली. मात्र हे तकलादू काम आहे. पाऊस पडताच रस्त्याची परिस्थिती जैसे थे होत आहे. बाप्पा, मुंबई-गोवा महामार्गाचे काम सुरू होऊन एक तप पूर्ण झाले. देशातील इतर महामार्ग विक्रमी वेळात पूर्ण होत असताना तुझ्या भक्तांच्या जाण्या-येण्याचा असलेला हा मार्ग कधी पूर्ण होणार तेच समजत नाही. ‘अनभिषिक्त सम्राट’, ‘कार्यसम्राट’, ‘कोकणचे एकमेव नेते’ अशा वेगवेगळ्या बिरूदावली लागलेल्या नेत्यांची कोकणात बिलकूल वानवा नाही. परंतु तरीही एकही ‘सम्राट’ किंवा ‘नेता’ या मार्गाचे काम लवकर पूर्ण व्हावे म्हणून सातत्यपूर्ण पाठपुरावा करतोय असे कुठे दिसले नाही.

खड्ड्यांची पाहणी करताना फोटो काढून घेण्याची हौस भागवून घेणार्‍यांना आमच्याकडे तोटा नाही. आंदोलन करून मिरवून घेणारेही कमी नाहीत. बाप्पा, तुला गार्‍हाणे घालावेसे वाटते. काहीही कर पण हा रस्ता लवकर पूर्ण होईल यासाठी संबंधित यंत्रणांना सुबुद्धी द्यायचं तेवढं बघ. पुढच्या वर्षी तू येशील तेव्हा तुझ्या स्वागताला गावाला येताना चकाचक आणि गुळगुळीत रस्त्यावरूनच आमचा प्रवास झाला पाहिजे. तुझा उत्सव साजरा केला जात असताना धागडधिंगाना करणार्‍यांनाही स्वतःला आवरण्याची बुद्धी दे! तुझ्यासमोर आचकट-विचकट नाचगाणी आता आम्हाला पहावेनाशी झाली आहेत. लोकमान्यांना अपेक्षित असलेल्या गणेशोत्सवाला छेद दिला जातोय. शेवटी कालायं तस्मै नमः हेच खरं! तू दयासागर आहेस. सर्वांना सुबुद्धी दे, सर्वांचे कल्याण कर, सर्वांना सुख-शांती दे, हीच तुझ्या चरणी मनोभावे प्रार्थना!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -