घरमुंबईमेट्रो ३ मुळे राजकीय प्रदूषणही बंद

मेट्रो ३ मुळे राजकीय प्रदूषणही बंद

Subscribe

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची फटकेबाजी, कुलाबा-सिप्झ मेट्रोची यशस्वी चाचणी

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या वतीने कुलाबा-वांद्रे-सिप्झ कॉरिडोर (एक्वा लाईन) मुंबई मेट्रो ३ च्या पहिल्या भूमिगत ट्रेन चाचणीचा (ट्रायल रन) शुभारंभ मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सारीपूत नगर, आरे कॉलनी येथे झाला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता टोले लगावले. मेट्रो ३ च्या प्रकल्पात अनेकांनी अडथळे आणण्याचा प्रयत्न केला, मात्र आता विघ्नहर्त्याचे आगमन होणार आहे, त्यामुळे अडथळे दूर होतील. आता विकास थांबणार नाही. वायू प्रदूषण दूर होऊन राजकीय प्रदूषणही बंद झाले आहे, असा चिमटाही त्यांनी काढला.

मेट्रो ३ प्रकल्पाच्या आरेतील कारशेडमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत असल्याची टीका अनेकांनी केली, पण इकडे येऊन पाहिले तर या जागेच्या तिन्ही बाजूंनी रस्ते आहेत. त्यामुळे आपण जंगलात जाऊन झाडे तोडलेली नाहीत. लोकांचे व्यापक हित पाहून न्यायालयानेही मेट्रो कारशेडला परवानगी दिली आहे, असे शिंदे म्हणाले.

- Advertisement -

आम्हाला फलंदाजी करायला पूर्ण वेळ नाही. आमच्याकडे अडीच वर्षेच आहेत. त्यामुळे आम्हाला कमी चेंडूत जास्त धावा काढायच्या आहेत. तसा देवेंद्र फडणवीसांचा ५ वर्षांचा अनुभव आहे आणि मी त्यांच्यासोबत आहे. मी सभागृहातही सांगितले की, आधी एकच तुम्हाला जड जात होता, आता ‘एक से भले दो’ आहे. आम्ही कुठेही राजकारण करणार नाही, परंतु लोकांना जे पाहिजे ते आम्ही देणार आहोत, असेही शिंदे यांनी सांगितले. हे सर्वसामान्य लोकांचे सरकार आहे. हे पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रित करणारे सरकार आहे. या राज्यातील प्रत्येक घटकाला न्याय देणारे आमचे सरकार आहे. सरकारी काम आणि सहा महिने थांब असे आम्हाला काहीही करायचे नाही. त्यामुळे सर्वांना वाटते हे सरकार थोडं आधीच यायला हवं होतं, पण ठीक आहे योग जुळून येण्याच्या काही गोष्टी असतात. लोकांच्या मनातील शिवसेना-भाजप युतीचे सरकार राज्यात स्थापन झाले आहे, असेही शिंदे म्हणाले.

मेट्रो ३चा हा प्रकल्प ३३.५ किलोमीटर लांबीचा आहे. या भागात कनेक्टिव्हिटी नव्हती. १७ लाख प्रवासी या माध्यमातून ये-जा करणार आहेत. साडेसहा लाख गाड्या ज्या आता रस्त्यावरून धावणार नाहीत. लाखो लीटर इंधनाची बचत होणार आहे. पर्यावरण तसेच वेळदेखील वाचणार आहे. मुंबई लोकलचा प्रवास करताना लोकांना अतिशय त्रास होतो, मात्र हा प्रवास आरामदायी होणार आहे, अशी ग्वाही एकनाथ शिंदे यांनी दिली.

- Advertisement -

मेट्रोमुळे होणार्‍या पर्यावरणाच्या नुकसानावर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, पर्यावरणाचा समतोल राखणे आपले काम आहे. त्यावरून या प्रकल्पावर पर्यावरणाचा र्‍हास केला असा आरोप होतो, मात्र आपण इथे प्रकल्पाच्या तिन्ही बाजूने रस्ते आहेत. अगदी आपण जंगलात जाऊन झाडे तोडत आहोत किंवा वनसंपदा नष्ट करत आहोत, असा काहीच विषय नाही. या प्रकल्पाला उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली असल्याचे सांगत शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांचा दावा फोल ठरवला.

मेट्रो धावण्यापासून कुणी रोखू शकत नाही : देवेंद्र फडणवीस
मेट्रोची चाचणी यशस्वी झाल्याने आणि आपण सिग्नल दिल्याने आता मेट्रो धावण्यापासून कुणी रोखू शकत नाही, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी लगावला. फडणवीस यांनी आपल्या भाषणात एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले. मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर या प्रकल्पातील अडथळे दूर केले. आता कोणत्याही अडचणी निर्माण होणार नाहीत, निर्माण झाल्या तर त्या दूर करण्याचा आमचा मानस राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मेट्रो ३ हा प्रकल्प मार्च २०२३ मध्ये पूर्ण होणार होता, मात्र स्थगितीमुळे प्रकल्प रखडला. मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला नसता तर तर अजून चार वर्षे हा मेट्रो प्रकल्प पूर्ण झाला नसता. २० हजार कोटींची गुंतवणूक वाया गेली असती. आणखी १५ ते २० हजार कोटी खर्च होऊन प्रकल्प पूर्ण केला असता तर त्याचा भार सर्वसामान्य मुंबईकरांवर पडला असता. खरेतर आरेतील कारशेडचा वाद हा पर्यावरणापेक्षा राजकीय जास्त होता, अशी टीकाही फडणवीस यांनी यावेळी केली. या मेट्रो लाईनमुळे मुंबईतील प्रवाशांना मोठा लाभ होणार असल्याने हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर आत्मीय समाधान लाभेल, असे त्यांनी सांगितले.

मुंबई मेट्रो लाईन ३ ची ठळक वैशिष्ठ्ये
#मुंबई मेट्रो लाईन ३ च्या ट्रेन्स ८ डब्यांच्या असतील. मेट्रो गाड्यांच्या धावण्याची कार्यक्षमता उत्तम राहील.
# रीनरेटिव्ह ब्रेकिंगमुळे सुमारे ३० टक्के विद्युत उर्जेची बचत होईल आणि चाकांची तसेच ब्रेक ब्लॉक्स इत्यादी उपकरणांची झीज कमी होईल.
# एका गाडीतून अंदाजे २४०० प्रवासी प्रवास करू शकतील.
# ८५ किमी प्रतितास अशा प्रत्यक्षातील प्रचालन वेगामुळे प्रवाशांचा एकूण प्रवासासाठी लागणारा वेळ कमी होईल.

कांजूरच्या जमिनीचा वाद संपुष्टात

शिंदे सरकारने सत्तेत येताच मेट्रो ३ चे कारशेड आरे कॉलनीतील जागेतच उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे मेट्रो ३ चे कारशेड उभारण्यासाठी कांजूरमार्ग येथील जमीन एमएमआरडीएच्या ताब्यात देण्याचा आदेश जिल्हाधिकार्‍यांनी मागे घेतल्याची माहिती राज्य सरकारतर्फे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी मंगळवारी उच्च न्यायालयात दिली. यामुळे या जागेवरून सुरू असलेला केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार हा वादही संपुष्टात आला आहे. तत्कालीन ठाकरे सरकारने आरेतील कारशेड रद्द करून कांजूरमार्गमध्ये कारशेड उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार जिल्हाधिकार्‍यांनी १ ऑक्टोबर २०२० रोजी जमीन हस्तांतरणाचा आदेश काढल्यानंतर ही जमीन ६ ऑक्टोबरला एमएमआरडीएच्या ताब्यात देण्यात आली. त्यानंतर एमएमआरडीएने कारशेडच्या कामासाठी ही जमीन डीएमआरसीएलच्या ताब्यात दिली, मात्र जिल्हाधिकार्‍यांनी जमिनीचे बेकायदा हस्तांतरण केल्याचे म्हणत केंद्र सरकारच्या अखत्यारीतील मीठ आयुक्त कार्यालयाने या जमिनीवर दावा केला आणि मुंबई हायकोर्टात आव्हान दिले. त्यामुळे हायकोर्टाने जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशावर स्थगिती आणली होती, तर दुसरीकडे गरोडिया ग्रुपनेही या जागेवर दावा केला होता. काही दिवसांपूर्वीच हा दावा ग्रुपकडून मागे घेण्यात आला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -