घरसंपादकीयअग्रलेखकुठे नेऊन ठेवलंय राजकारण?

कुठे नेऊन ठेवलंय राजकारण?

Subscribe

लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर पुढे जसजसे दिवस पुढे सरकतील त्या कालावधीत राजकारण कमालीचे तापत जाणार आहे. एक काळ असा होता की नेता काय बोलला हे दुसर्‍या दिवशी वृत्तपत्रामधील बातमीत कळत असे. आता जमाना डिजिटल किंवा सोशल मीडियाचा असल्याने नेत्यांची भाषणे क्षणात ऐकता येतात आणि त्यावर प्रतिक्रियाही तात्काळ उमटतात. या निवडणुकीत सोशल मीडियाचाच दबदबा राहणार हे स्पष्ट आहे. या मीडियामुळे नेत्यांमधील शाब्दिक झुंजी क्षणाक्षणाला पाहता, ऐकता येणार आहेत.

दोन दिवसांपूर्वी मुंबईत झालेल्या इंडिया आघाडीच्या जाहीर सभेत काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी वापरलेला ‘शक्ती’ हा शब्द कोणत्या बाबतीत होता हे ऐकणार्‍या सर्वांना समजलेले असताना पंतप्रधान मोदी यांनी शक्तीचे विनाशक आणि उपासक यांच्यातील हा लढा असल्याचे सांगत स्त्री हे शक्तीचे स्वरुप असल्याने या शक्तीचा आशीर्वाद कोणाला मिळतो ते निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होईल, असे सांगत शक्ती शब्दाचा निवडणूक प्रचारासाठी वापर करून घेतला. थोडक्यात प्रचाराच्या रणधुमाळीत नेत्यांना शब्दांचा जपून वापर करावा लागणार आहे.

- Advertisement -

अलीकडे राजकारणाचा स्तर खालावल्याने प्रतिस्पर्ध्यांवर खालच्या थराला जाऊन शाब्दिक कोट्या करण्यात येऊ लागल्या आहेत. अनेकदा व्यंगावरही भाष्य केले जाते, तर काहीवेळा शरीराच्या आकारावरूनही टोमणेबाजी केली जाते. मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी विरोधकांची अशा प्रकारे यथेच्छ खिल्ली उडवली असून त्यात महाराष्ट्रापुरते बोलायचे झाल्यास छगन भुजबळ, देवेंद्र फडणवीसांपासून अनेक नेत्यांची नावे घेता येतील. नेत्यांच्या बोलण्याची नक्कल करून उपस्थितांना हसवायचे हा फंडा जुना असला तरी त्याचा अलीकडे वारंवार वापर केला जात आहे. अशा प्रकारच्या भाषणबाजीने मूळ मुद्यांना बगल देऊन वेळ मारून न्यायची असते.

आपल्याकडे निवडणुकीच्या प्रचारात मुद्देसूद किंवा विकासाबाबत बोलण्याऐवजी वेगवेगळ्या विषयांवर आश्वासनबाजी करायची असे चालते. या लोकसभा निवडणुकीत यापेक्षा वेगळे काही घडणार नाही ही काळ्या दगडावरची रेघ आहे. प्रतिस्पर्ध्यांच्या भ्रष्टाचारावर तोंडसुख घेणे हा राजकारण्यांचा आवडता विषय आहे. यावेळीसुद्धा भाजपचे नेते विरोधकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करतील, पण आपल्या पक्षात भ्रष्टाचारी आल्यानंतर ते पावन कसे झाले, यामागील गुपितावरही भाजपच्या नेत्यांनी बोलले पाहिजे. लोकांना ते ऐकणे अधिक आवडेल! लोकसभेची निवडणूक पार पडेपर्यंत महाराष्ट्रासह देशात काय-काय घडेल याचा अंदाज बांधणे आहे.

- Advertisement -

निवडणुकीच्या निमित्ताने आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना मनसेचे राज ठाकरे भाजपच्या नेत्यांना दिल्लीत भेटून आल्याचे वृत्त आहे. जो नेता गेले काही वर्षे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यापासून भाजच्या अनेक बड्या नेत्यांवर व्हिडीओ लावून तोंडसुख घेत होता तोच नेता आपल्या पक्षाच्या भवितव्यासाठी भाजपच्या याच नेत्यांची मनधरणी करीत असल्याचे दृश्य महाराष्ट्रासह देशाने पाहिले. राज ठाकरे आणि अमित शहा यांची नेमकी कोणत्या मुद्यावर चर्चा झाली हे समोर आले नसले तरी विषय निवडणुकीचाच असणार हे नक्की आहे.

जो नेता लाखा-लाखाच्या सभा घेतो त्या नेत्यावर दुसर्‍या पक्षातील नेत्यांच्या घरची पायरी चढावी लागते हा काळाचा महिमा म्हणावा लागेल. कधी काळी भाजपला फटकारणारे राज ठाकरे यांना शेवटी भाजपचीच मदत घ्यावी लागणार असेल, तर ते मनसैनिकांना कितपत रुचतेय हे पहावे लागेल. राज-भाजप जवळकीचा मुद्दा विरोधक तापवतील तेव्हा पलीकडून ठाकरे गट-काँग्रेस दोस्तीवर शाब्दिक भडिमार होईल. मतदारांची यातून करमणूक होणार याउपर काही नाही. राजकारणाची पातळी इतकी खालावलेय की नेत्यांबद्दल जनतेत आदराची भावना बिलकूल राहिलेली नाही.

सत्तेसाठी काहीही, हा नवा खेळ देशाच्या राजकारणात भलताच रूळलाय! गेल्या दहा वर्षांत सत्ता हस्तगत करण्यासाठी झालेले प्रयोग जनतेने याची डोळा पाहिले आहेत. अनेकदा, नव्हे बहुतांश वेळा विरोधकांना आपल्याकडे खेचण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा वारेमाप वापर झालेला आहे. राहुल गांधींनी याच ‘शक्ती’वर बोट ठेवले आहे. लोकशाही व्यवस्थेचा दुरूपयोग करून सत्ता आपल्या ताब्यात घेण्याचा सुरू झालेला खेळ जितका घृणास्पद, तितकाच लोकशाही व्यवस्थेला नख लावणारा आहे.

जनता हे सारे निमूटपणे पाहत असल्याने जनतेची आपल्या कारनाम्यांना मूक संमती आहे असा तर समज काहींनी केला नाहीना, असा सवाल उपस्थित होऊ शकतो. निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करताना ती निर्भेळ वातावरणात पार पडावी अशी रास्त अपेक्षा व्यक्त केली आहे, परंतु अलीकडच्या काळात, निवडणुकीच्या काळात पैशाचा प्रचंड वापर होऊ लागला आहे. अलीकडे निवडणूक यंत्रणेने थोडेथोडके नव्हे, तर तब्बल ३ हजार ४०० कोटी रुपये विविध ठिकाणांहून रोख स्वरुपात हस्तगत केले आहेत.

यावरून निवडणुकीत धनशक्ती कसे काम करते याची कल्पना करता येईल. निवडणुका हायटेक होण्यापूर्वी सामान्य माणूसही सहजपणे निवडणूक रिंगणात उतरत असे. आता ते दिवस इतिहासजमा झालेत. किंबहुना हा सामान्य माणूस साध्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या वाटेलाही जाईनासा झाला आहे. त्यामुळे धनदांडग्यांसाठीच निवडणुकीचे मैदान खुले असल्याची सध्याची परिस्थिती आहे. राजकारणातून पैसा सहजपणे वसूल करता येतो हा समज पक्का झाल्याने धन की बात करणार्‍यांनाच अच्छे दिवस आले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -