घरसंपादकीयअग्रलेखआव्हाने नव्या सीडीएस समोरची

आव्हाने नव्या सीडीएस समोरची

Subscribe

जगातील सर्वोत्तम लष्करांपैकी एक असलेल्या भारतीय लष्कराच्या तिन्ही दलांच्या प्रमुखाची अर्थात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वीचे सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्या अपघाती निधनानंतर नऊ महिन्यानंतर त्यांच्या रिक्त पदावर ही नवी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार देशाचे दुसरे सीडीएफ होण्याचा मान लेफ्टनंट जनरल अनिल चौहान यांना मिळाला आहे.

जगातील सर्वोत्तम लष्करांपैकी एक असलेल्या भारतीय लष्कराच्या तिन्ही दलांच्या प्रमुखाची अर्थात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वीचे सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्या अपघाती निधनानंतर नऊ महिन्यानंतर त्यांच्या रिक्त पदावर ही नवी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार देशाचे दुसरे सीडीएफ होण्याचा मान लेफ्टनंट जनरल अनिल चौहान यांना मिळाला आहे. सीसीपीए अर्थात कॅबीनेट कमिटी फॉर सिक्युरिटी किंवा कॅबिनेट कमिटी फॉर पॉलिटिकल अफेअर (सीसीपीएच) यांनी चौहानांच्या रुपात योग्य नेतृत्वाचा शोध घेतला आहे. देशाचे पंतप्रधान, अर्थमंत्री, गृहमंत्री, संरक्षण मंत्री, परदेश मंत्री या सगळ्यांनीच हा एकत्रित निर्णय घेतला आहे. चौहानांकडे १९८१ मध्ये ११ गोरखा रायफल्सची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

नॅशनल डिफेन्स अकॅडमी, खडकवासला आणि इंडियन मिलिटरी अकॅडमी देहरादून येथून त्यांनी लष्करी प्रशिक्षण घेतले. त्यांनी मेजर जनरल पदावर असताना बारामुल्ला भागात इन्फंट्री डिव्हिजनचे नेतृत्व केले होते. पुढे लेफ्टनंट जनरल म्हणून त्यांनी ईशान्य भागात नेतृत्व केले. ईस्टर्न कमांडचे ते जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ होते. निवृत्त होईपर्यंत म्हणजेच मे २०२१ पर्यंत त्यांच्यावर ही जबाबदारी होती. यापुढे सीडीएस पदाची मोठी जबाबदारी चौहानांवर आली आहे. ही जबाबदारी काय असेल हे जाणून घेणेही गरजेचे आहे. सीडीएस हे भारतीय सशस्त्र दलांचा लष्कर प्रमुख आणि भारतीय सशस्त्र दलाच्या चीफ ऑफ स्टाफ कमिटीचे अध्यक्ष असतात. संरक्षण प्रमुख हे चार स्टार जनरल असतात. सीडीएस हे संरक्षण मंत्रालयाने तयार केलेल्या नवीन विभाग लष्करी व्यवहार विभागाचे प्रमुख आहेत. संरक्षण मंत्रालयाकडे संरक्षण विभाग, संरक्षण उत्पादन विभाग, माजी सैनिक कल्याण विभाग आणि डीआरडीओ हे आधीच चार विभाग होते.

- Advertisement -

आता पाचवा नवीन विभाग, लष्करी व्यवहार विभाग, संरक्षण कर्मचारी प्रमुख यांच्या नेतृत्वाखाली आहे. सीडीएसची मुख्य जबाबदारी म्हणजे सैन्यात जॉइंटमॅनशिपला वाढवणे ही आहे, त्यामुळे संसाधनांचा अपव्यय आणि निर्णय घेण्यास होणारा विलंब रोखला जाऊ शकेल. सीडीएसच्या निकषांत संरक्षण सिद्धता हा प्रमुख निकष आहे. भारत-चीन सीमा किंवा भारत-पाकिस्तान सीमा असेल अशा वेगवेगळ्या सीमांवर लढण्याचा अनुभव त्याला असायला हवा. त्याला दहशतवादी विरोधी अभियानात काम करण्याचा अनुभव असायला हवा. कारण दहशतवाद अजून खूप वर्षे चालणार आहे. ईशान्य भारतातील बंडखोरीविरुद्ध लढण्याचा अनुभव असायला हवा. भारतीय सैन्य प्रचंड मोठ्या प्रमाणात पसरले आहे. ते वेगवेगळ्या भूभागात आहे. ते वाळवंटात, डोंगराळ भागात, जंगलात, आयलॅण्ड टेरिटरीमध्ये आहे. म्हणजे आपल्याला प्रचंड अनुभव असलेला असा एक सेनापती पाहिजे. जनरल रावत यांचा उत्तराधिकारी अर्थात सीडीएस म्हणून लेफ्टनंट जनरल अनिल चौहान यांची झालेली नियुक्ती अतिशय योग्य आहे. त्यांच्याकडे वैविध्यपूर्ण अनुभव आहे.

सीडीएससारख्या मोठ्या पदावर काम करताना जनरल बिपीन रावत यांनी काम कसे करावे याचा वस्तुपाठ घालून दिला आहे. त्यांचे काम देदीप्यमान म्हणावे असेच होते. तब्बल ७० वर्षांनंतर भारताने हे पद तयार केले होते. बहुतेक मोठ्या देशांत, विशेषत: अमेरिका, इंग्लंडमध्ये हे पद केव्हाच निर्माण झाले आहे. भारतीय पायदळ अर्थात लष्कर, नौदल आणि हवाई दलात समन्वय साधण्यासाठी हे पद निर्माण करण्यात आले होते. त्यापूर्वी पारंपरिक पद्धतीने लढाया व्हायच्या. ही तिन्ही दले वेगवेगळ्या पद्धतीने लढायची. इंटिग्रेटेड थिएटर कमांड म्हणजे तीनही दल एकाच कमांडच्या हाती काम करतील. या तिन्ही प्रमुख दलांनी एकत्र येऊन लढाई करावी यासाठी चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ पदाची निर्मिती करण्यात आली. एकाच नेतृत्वाखाली तिन्ही दलांचे काम झाल्यास योग्य समन्वय साधला जातो. यासाठी चीनविरुद्ध एक कमांड, पाकिस्तानविरुद्ध एक कमांड, स्पेस कमांड, मॅरिटाईम कमांड, पेननस्युलर कमांड हा वेगळा बनत आहे. या सगळ्यात तिन्ही दलांचे अधिकारी एकत्र येत आहेत. त्यामुळे देशाचा खूप मोठा फायदा होत आहे. या माध्यमातून होणारा खर्च व त्याअनुषंगाने बजेटमध्ये बचत होत आहे. तिन्ही दलातील सैनिकांना एकत्रित प्रशिक्षण घेता येते.

- Advertisement -

तिन्ही दलांची शस्त्रे विकत घेणे स्वस्त होते. राहण्याच्या ठिकाणांमध्ये एकत्रितता आणता येते. नेतृत्व एकच असल्यामुळे सगळ्यांचे लक्ष्य हे एकच असते. हे तिन्ही दल जेव्हा एकत्रित येतात, त्यावेळी किती मोठा फायदा होतो ते आपल्याला १९७१ च्या लढाईतून लक्षात आले होते. त्यावेळी फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ भारतीय सैन्याचे सरसेनापती होते. त्यांनी लढाईत सर्व दलांना एकत्र केले आणि इतिहास घडवला. १९७१ च्या पूर्व पाकिस्तानातील घडामोडींनंतर भारतात मोठ्या प्रमाणावर निर्वासितांचा लोंढा येऊ लागल्याने माणेकशॉ यांचे सेनापतीपद कसाला लागले. या घडामोडींची परिणती १९७१ च्या भारत-पाक युद्धात झाली. या युद्धात भारताने माणेकशॉ यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानचा जबरदस्त पराभव केला व बांगलादेशाची निर्मिती केली. या युद्धात माणेकशॉ यांच्या प्रभावी नेतृत्वाने तसेच अतिशय सजग युद्धनीतीने अमेरिकेचा पाठिंबा असूनही भारतीय सेनेने पाकिस्तानला पराभवाचे खडे चारले. त्यांनी तिन्ही दलाला एकत्र करुन ही लढाई जिंकली होती. माणिकशॉ हे कर्तृत्ववान व्यक्तीमत्व होते. पण केवळ व्यक्तीमत्वांवर लढाया लढता येत नाहीत. त्यासाठी संस्थात्मक ताकद हवी असते.

पारंपरिक लढाईत आपण पारंगत आहोत. पण अपारंपरिक लढायांचे काय? चीन भारताविरुद्ध अनेक प्रकारच्या लढाया एकाच वेळी लढतो आहे. त्याला हायब्रिड वॉर, ग्रे झोन वॉर, अनरिस्ट्रिक्ट्रेड वॉर, मल्टी डोमेन वॉर हे शब्द वापरले जातात. त्याचा थोडक्यात अर्थ असा की चीन आपल्याशी एकाच वेळेला ३६५ दिवस वेगवेगळ्या प्रकारच्या लढाया लढत असतो. त्यामुळे तिन्ही सुरक्षा दले एकत्र आली तर एकाच वेळी चीनला चांगले प्रत्युत्तर देता येईल. हेच काम जनरल रावत करण्याचा प्रयत्न करत होते. आणखी एक महत्वाची बाब म्हणजे, ‘डिपार्टमेंट ऑफ मिलिटरी अफेअर्स’ (डीएमए) हा नवीन विभाग तयार करण्यात आला आहे. नोकरशाही आणि आपली सुरक्षा दले यांच्यात समन्वयाचा अभाव असायचा. आता डीएमएमुळे नोकरशाही आणि लष्करी नेतृत्व यांच्यात अजून जास्त एकत्रिकरण करण्यास वाव आहे. त्यामुळे देशाची सुरक्षितता नक्कीच वाढेल. या सगळ्याची जबाबदारी आता लेफ्टनंट जनरल चौहानांवर आहे. ही जबाबदारी ते चांगल्या प्रकारे पार पाडतील, अशी अपेक्षा करुया.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -