घरसंपादकीयअग्रलेखपंतप्रधानांच्या मौनाची धिंड!

पंतप्रधानांच्या मौनाची धिंड!

Subscribe

मणिपूरमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे अक्षरश: धिंडवडे निघाल्याचे चित्र बुधवारी समोर आले. मणिपूरमध्ये २ कुकी जमातीच्या आदिवासी महिलांना विवस्त्र करून त्यांची रस्त्यावरून धिंड काढण्यात आल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मौनाचीच धिंड काढली गेली आहे. या दोन्ही महिलांवर सामूहिक अत्याचार केल्याचे समजत असून माणुसकीला काळीमा फासणार्‍या या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. मणिपूरची राजधानी इंफाळपासून ३५ किमी अंतरावरील कंगपोकपी जिल्ह्यात ही घटना घडली आहे. मणिपूरमधील ही घटना ४ मे रोजी घडली असून या घटनेचे व्हिडीओ इंडिजिनस ट्रायबल लीडर फोरम (आयटीएलएफ)च्या आंदोलनादरम्यान व्हायरल करण्यात आले.

या व्हिडीओमध्ये १५ ते २० पुरुषांचा गट २ असहाय्य महिलांना निर्वस्त्र करून त्यांचा विनयभंग करत असल्याचे दिसत आहे. हे व्हिडीओ समोर आल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. भारताच्या ईशान्येकडील मणिपूर राज्यात वांशिक हिंसाचार सुरू होऊन दोन ते अडीच महिन्याहून अधिक काळ लोटला असला तरी येथील परिस्थिती अजूनही तणावपूर्ण आहे. मैतेई आणि कुकी अशा दोन समुदायांमध्ये सुरू असलेल्या या हिंसाचारात आतापर्यंत १५० हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. असंख्य लोक जखमी झाले आहेत. हिंसाचारात जाळपोळीच्या ५ हजार घटना घडल्या आहेत. ६० हजारांहून अधिक लोक बेघर झालेत.

- Advertisement -

हजारोंना निर्वासितांच्या छावणीत आश्रय घ्यावा लागत आहे. सध्या मणिपूर राज्य २ तुकड्यांमध्ये विभागले गेले आहे. त्यातील एक तुकडा मैतेई समुदायाकडे आहे, तर दुसरा तुकडा कुकी समुदायाच्या ताब्यात आहे. कधीकाळी एकमेकांसोबत गुण्यागोविंदाने राहणारे मणिपूरमधील हे दोन जातीय समुदाय एकमेकांच्या जीवावर उठलेत. मणिपूरध्ये जातीय कट्टरवादातून एवढा मोठा हिंसाचार घडल्याचा इतिहास नसल्याचे जाणकार सांगतात. कधीकाळी राजसत्तेत असलेल्या येथील मैतेई समाजाने नागा आणि कुकी समुदायांना एकत्र केले आणि त्यांना राज्यकारभारात स्थान दिले. राजसत्तेच्या खुणा नकोशा झालेला कुकी समुदाय तर आता वेगळ्या राज्याची मागणी करू लागला आहे.

स्वातंत्र्यानंतर ख्रिश्चन धर्माचे पालन करणार्‍या कुकी समाजाला राज्यात अनुसूचित जमातीचा दर्जा आहे, तर मैतेई हिंदू समाज आरक्षणाशिवाय आहे. यापैकी काही समुदाय अनुसूचित जाती, तर काही ओबीसीत मोडतात. अल्पसंख्याक असलेल्या कुकी समुदायाच्या मालमत्तांचे रक्षण करण्यासाठी कायद्यानुसार मैतेई समुदायातील लोकांना कुकी समुदाय असलेल्या भागात जमीनजुमला खरेदी करण्यास मनाई आहे. मणिपुरातील २.८ कोटी लोकसंख्येपैकी बहुसंख्य जनता मैतेई खोर्‍यात राहते, तर कुकी लोकसंख्या ४ डोंगराळ जिल्ह्यांमध्ये स्थायिक आहे. इथे आरक्षणासोबत जमिनीवरील स्वामित्वाचाही मुद्दा आहेच. मैतेई समाजाचा अनुसूचित जातीत समावेश करण्याचा निर्णय गेल्या वर्षी सत्तेत आलेल्या भाजप सरकारचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी घेतला आणि वादाला सुरुवात झाली. बिरेन सिंह स्वत:ही मैतेई समाजातील आहेत. आधी निषेध मोर्चे आणि पुढे राज्यात भीषण हिंसाचार सुरू झाला.

- Advertisement -

या हिंसाचारात मैतेई समाजाकडून कुकींना लक्ष्य केले आहे, तर कुकी समुदायाकडून मैतेईच्या ठिकाणांना लक्ष्य केले जात आहे. राज्यातील मैतेई मुस्लीम आणि नाग समुदायालाच अद्याप या हिंसाचाराची थेट झळ बसलेली नाही. २ महिन्यापासून सुरू असलेला हा हिंसाचार का थांबत नाहीय, याचे कारणही स्थानिकांना समजत नाही. रस्त्यांवर सर्वत्र केवळ नि केवळ सुरक्षा दलाचे जवान हातात बंदुका घेऊन फिरताना दिसतात, तर दुसरीकडे काही गट जाळपोळ करीत आणि बंदुका चालवून या सुरक्षा दलाच्या जवानांना आव्हान देताना नजरेस पडतात. मध्यंतरी काही महिलांनी रस्त्यावर उतरून हिंसाचार थांबवण्यासाठी काहीच प्रयत्न न करणारे मुख्यमंत्री बिरेन सिंह आणि केंद्र सरकारचा निषेध केला, परंतु या महिलांना मुख्यमंत्र्यांच्या घरापर्यंत पोहोचण्याआधीच रोखण्यात आले. या महिलांचा आक्रोश शांत होत नाही, तोच कुकी समाजातील महिलांचा विवस्त्र व्हिडीओ समोर आल्याने समस्त देशाचे मन पिळवटून गेले आहे.

या महिला अत्याचार प्रकरणात तब्बल अडीच महिन्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला मौन राग सोडला. ही घटना सुसंस्कृत समाजासाठी लज्जास्पद असल्याचे सांगत महिलांवर होणारे हिंसाचार रोखण्यासाठी सर्व मुख्यमंत्र्यांनी आपापल्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्था मजबूत करावी, असे आवाहन त्यांनी केले, परंतु मणिपूरमधील एकूणच हिंसाचार रोखण्यासाठी काय पावले उचलण्यात येतील, यावर मात्र त्यांनी सोयीस्करपणे चुप्पी साधली. पंतप्रधानांनी सभागृहाबाहेर नाही, तर संसदेत या घटनेवर निवेदन द्यावे, अशी मागणी संसदेच्या दोन्ही सभागृहातील सदस्यांकडून करण्यात येत आहे, परंतु सत्ताधार्‍यांनी ही मागणी मान्य न केल्याने दोन्ही सभागृहात गोंधळ होऊन गुरुवारी कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

सध्या केंद्रात आणि मणिपूरमध्ये भाजपचेच सरकार आहे. विकासाच्या नावाने डबल इंजिनचे सरकार असा ढोल बडवत असताना मणिपूरमधील हिंसाचार थांबवण्यासाठी ही दोन्ही सरकारं काहीच करू शकत नाहीत, असा सवाल काही दिवसांपूर्वी या महिला विचारत होत्या. शांत बसून यावर कधीच तोडगा निघणार नाही, उलट माणुसकीला काळीमा फासणार्‍या अशा घटना व्हिडीओच्या माध्यमातून जगभर पसरतील. त्यातून भारताला जागतिक महासत्ता बनवण्याची स्वप्न बघणार्‍या विश्वगुरूची प्रतिमाही मलीन होईल, याचे भान वेळीच आले तर बरे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -