घरसंपादकीयअग्रलेखगोळा बेरीज...यांची आणि त्यांची !

गोळा बेरीज…यांची आणि त्यांची !

Subscribe

देशात फोडाफोडीचे राजकारण झाल्यानंतर आता जोडाजोडीचे राजकारण सुरू झाले आहे. राजधानी दिल्ली आणि कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथे झालेल्या महाबैठका त्यासाठीच तर होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीची बैठक बुधवारी झाली. यावेळी ३६ पक्ष सहभागी झाले होते. अलीकडच्या निवडणुकांचा विचार केला तर, कर्नाटक आणि हिमाचल प्रदेश या दोन राज्यांत भाजपाला सत्ता गमवावी लागली. आता निर्विवादप्रमाणे सत्ता टिकवून ठेवण्यासाठी २०२४ च्या निवडणुकीत जास्त जोर लावण्याची आवश्यकता आहे, हे ध्यानी घेऊनच भाजपाने ही बैठक बोलावली होती. विशेष म्हणजे, गेल्या नऊ वर्षांत रालोआची ही पहिलीच बैठक होती. या बैठकीत ३३० हून अधिक जागा जिंकण्याच निर्धार करण्यात आला.

रालोआच्या या बैठकीत उपस्थित एकूण पक्षांपैकी २४ पक्ष असे आहेत की, ज्यांचा एकही खासदार नाही. इथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. भाजपाच्याच मदतीने पक्षांतर्गत बंडाचा झेंडा फडकावणारे हे दोन नेते रालोआच्या बैठकीला उपस्थित राहणे अपेक्षितच होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या रालोआतील योगदानाचा उल्लेख केला. तसा उल्लेख करणे त्यांना क्रमप्राप्त होते. मात्र, बाळासाहेब ठाकरे यांचा सच्चा अनुयायी या बैठकीला उपस्थित असल्याचा उल्लेख त्यांनी केला. मात्र, भोपाळमध्ये ज्या पक्षावर ७० हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला, त्या राष्ट्रवादी काँग्रेसला का सोबत घेतले, याचा उल्लेख मात्र पंतप्रधान मोदी यांनी केला नाही. अलीकडेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची युती भावनिक तर, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी युती राजकीय असल्याचे म्हटले आहे.

- Advertisement -

दुसरीकडे, २०१९ पासून एकतेची हाक देणारे विरोधक २०२४ च्या निवडणुकीसाठी एकत्र झाले आहेत. केंद्रातील मोदी सरकार हे हुकूमशाहीकडे झुकणारे आहे, या मुद्यावर सर्व विरोधकांचे एकमत आहे. शिवाय, केंद्रीय तपास यंत्रणांच्या होणार्‍या कथित गैरवापर होत असल्याचा आरोप सर्वच विरोधकांचा आहे. याच पार्श्वभूमीवर गेल्या महिन्यात २३ तारखेला बिहारमधील पाटणा येथे या विरोधकांची पहिली बैठक झाली. त्याला १५ पक्ष उपस्थित होते. पण अवघ्या २५ दिवसांत, मंगळवारी बंगळुरू येथे झालेल्या दुसर्‍या बैठकीत तब्बल आणखी ११ पक्ष त्यात सामील झाले. त्यामुळे ही संख्या थेट २६ वर गेली आहे. आता पु़ढची बैठक मुंबईत होणार आहे. त्यात आता विरोधकांची ही संख्या वाढते का? आणि वाढलीच तर कोणकोण सामील होणार आहेत? हे स्पष्ट होईल. पुढच्या बैठकीत या आघाडीची समन्वय समिती नेमण्यात येणार आहे. त्याची नितांत गरज असली तरी ती कितपत उपयोगी पडते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

बंगळुरूच्या बैठकीत विरोधकांच्या नव्या आघाडीला ‘इंडिया’ असे नाव देण्यात आले आहे. इंडियन नॅशनल डेव्हलपमेन्टल इन्क्लुसिव्ह अलायन्स अशी त्याची फोड आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सप्टेंबर २०२२ मध्ये ‘भारत जोडो’ अशी यात्रा काढली होती. कन्याकुमारी ते श्रीनगर अशी ही यात्रा होती. या भारत जोडो यात्रेतूनच ‘इंडिया’ची संकल्पना पुढे आली असावी. बंगळुरूच्या बैठकीत राजकीय पटलावर ‘इंडिया’चा उदय झाला आहे. आता तो मोदी सरकारच्या विरोधात त्वेषाने तळपतो की, अंतर्गत ईर्षेच्या मेघांनी झाकोळला जातो, हे येणारा काळच ठरवेल. ‘इंडिया’मधील बहुतांश सर्वच पक्षांत महत्त्वाकांक्षी नेते आहेत. पंतप्रधानपदासाठी इच्छुक किमान चार नेते तरी, या नव्या आघाडीत आहेत. त्यामुळे सध्या इंडिया चेहर्‍याच्या शोधात आहे. त्यासाठी ११ जणांची संयोजक समिती नेमण्यात आली आहे. शिवाय, खरा कस लागणार आहे, तो जागावाटपाच्या वेळेस. कारण तो नेहमीच कळची मुद्दा राहिलेला आहे.

- Advertisement -

भाजपाप्रणित रालोआचा प्रश्न नाही, कारण ते नरेंद्र मोदी यांच्या शब्दाच्या पलीकडे जात नाहीत. त्यांचा शब्द कायमच अंतिम आहे, मंगळवारच्या बैठकीसाठी नरेंद्र मोदी तिथे आल्यावर सर्वांनी भलामोठा हार घालून त्यांचे स्वागत केले. यातच सर्वकाही आले. त्यांच्यापाठोपाठ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नावाचा दरारा आहे. पण विरोधकांच्या बाबतीत तसे म्हणता येणार नाही. एक ‘इंडिया’ नुकताच उदयास आला आहे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीएची फोड करताना ‘न्यू इंडिया’चे स्वप्न दाखवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे, यात दुमत असण्याचे कारण नाही.

म्हणूनच, आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला मिळालेला मान, पाच ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था करण्याचे लक्ष्य, ‘आत्मनिर्भर भारत’ याच्याबरोबरच समान नागरी कायद्याचे मुद्दे राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून मांडले जाण्याची शक्यता आहे. आता कोणत्या नव्या ‘इंडिया’ला पुन्हा संधी मिळते, हे येत्या १० महिन्यांत स्पष्ट होईल. तूर्तास तरी सर्वसामान्यांचे प्रश्न संपलेले आहेत. सर्वकाही सुरळीत सुरू आहे. आता फक्त राहिली आहे, ती पुढील वर्षी होणारी लोकसभा निवडणूक. देशात चित्र तरी तसेच दिसत आहे. आगामी सत्तेची हंडी फोडण्यासाठी विरोधकांनी आधी २६ पक्षांचे थर लावले आहेत, तर, पुन्हा एकदा ‘अब की बार…’ म्हणत सत्ताधार्‍यांनी ३८ पक्षांचे थर लावले आहेत. प्रतीक्षा आहे ती, ‘न्यू इंडिया’ची. स्वप्न बघायला काय हरकत आहे?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -