घरसंपादकीयअग्रलेखअनास्थेचे बळी!

अनास्थेचे बळी!

Subscribe

गेल्या काही दिवसांत मुंबईसह कोकणात पाण्यात बुडून मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या चिंताजनक आहे. त्यात कोणी अल्पवयीन, तर कोणी तरुण आहेत. हे मृत्यू म्हणजे अनास्थेचे बळी आहेत. पाण्याचा अंदाज नसताना फाजील आत्मविश्वास दाखविल्यास अनर्थ ओढावतो. पोलीस किंवा स्थानिक प्रशासन यांच्याकडून करण्यात आलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करून पाण्यात उतरण्याचे धाडस कसे होते, असा सवाल आपसूकच निर्माण होतो. पावसाचे प्रमाण बर्‍यापैकी वाढल्याने नदी, ओढे, नाले तसेच धरणे ओसंडून वाहू लागली आहेत. या पाण्याची भुरळ तरुणाईला पडते, पण आश्चर्य याचे वाटते ते म्हणजे किशोरवयीन मुले समुद्राच्या किंवा धरणाच्या पाण्यात पोहायला उतरतात याचे! रविवारी मालाडच्या समुद्रात बुडालेली ५ मुले अवघ्या १२ ते १६ वर्षे वयोगटातील आहेत. यात तिघांचा मृत्यू झाला. गेल्या महिन्यात अल्पवयीन मुलांचा समुद्रात बडून मृत्यू झाल्याच्याही काही घटना घडल्या आहेत.

ही मुले सर्वसामान्य कुटुंबातील आहेत, ज्यांच्यावर पालकांना कायम लक्ष ठेवता येणे शक्य नाही. पालकही मुलांबाबत बेफिकीर असतात आणि त्याचाच गैरफायदा घेत ही मुले समुद्रात पोहण्याचे धाडस करतात हे दिसून आले आहे. पावसाळ्यात समुद्राचे रौद्र रूप असताना या छोट्या मुलांची पोहायला जाण्याची हिंमत कशी होते, हा चक्रावून टाकणारा प्रश्न आहे. रविवारी गटारी साजरी होत असताना पाण्यात उतरणे काहींच्या अंगलट आले. स्थानिकांच्या सूचनांकडेही पर्यटक दुर्लक्ष करतात आणि त्यातून अनर्थ ओढावतो हे अनेकदा दिसून आले आहे. पावसाळ्यात वीकेण्डला धरणावर मौजमजा करायला जाणार्‍या पर्यटकांची संख्या लक्षणीय आहे. पर्यटकांची बेपर्वाई थेट कायदा-सुव्यवस्थेलाच आव्हान देत असल्याने यावर कठोर निर्बंध तरी आणावेत किंवा पुरेशी खबरदारी घेऊन पर्यटकांना सुरक्षित स्थळे निर्माण करून त्यांना आनंद घेऊ द्यावा.

- Advertisement -

२ दिवसांत ठिकठिकाणी ८ जणांचा मृत्यू झाला आहे. पालघर जिल्ह्यातील वांद्री धरणात पत्नीसमोर पोहता न येणार्‍या पतीचा बुडून झालेला मृत्यू हृदय पिळवटून टाकणारा आहे. रविवारी रायगड जिल्ह्याच्या पेण तालुक्यात सख्ख्या भावांचा नदीत बुडून झालेला मृत्यू मती सुन्न करून टाकणारा आहे. गेल्या काही दिवसांत कोकणातील धबधबे, धरणे आदी ठिकाणी हुल्लडबाजीचे प्रमाणही वाढल्याच्या तक्रारी आहेत. कोकणात काही ठिकाणी पोलिसांनी प्रतिबंधात्मक उपाय योजूनही उत्साही पर्यटक तेथे पोहचतात कसे, असा सवाल अनेकांना पडत असतो. काही वेळेला पोलीस पर्यटकांच्या हुल्लडबाजीकडे दुर्लक्ष करतात. याला कारणही तसेच असते. हाताच्या बोटावर मोजता येतील इतके पोलीस घोळक्याने येणार्‍या पर्यटकांना आवरतील असे समजणे चुकीचे आहे. धरणांचे परिसरही मोठे असल्याने तिथपर्यंत जाण्यासाठी अनेक मार्ग असतात.

पोलिसांची नजर चुकवून धरणाच्या पाण्यात उतरणे सोपे असते. त्या ठिकाणी पाण्याच्या खोलीचा अंदाज न घेताच पोहण्यासाठी पाण्यात उतरण्याचे धाडस केले जाते. २ दिवसांपूर्वी रायगड जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यात यातूनच दुर्घटना घडून एका तरुणाचा मृत्यू झाला. नालासोपारा, जव्हार या ठिकाणीही तरुण बुडण्याच्या घटना घडल्या. या एकूणच प्रकाराने पोलीसही हतबल झाले आहेत. आवाहन करूनही पर्यटक ऐकत नसल्याने करायचे काय, असा प्रश्न पोलिसांसमोर आहे. अर्थात पर्यटकांचा उत्साह लाठीकाठीने किंवा गुन्हे दाखल करून आटोक्यात येणार नाही, परंतु जेथे कठोर वागण्याची गरज आहे तेथे कठोरच व्हावे लागेल. लहान मुले, दारू ढोसणारे तरुण पाण्याचा अंदाज न घेताच पाण्यात उतरत असतील तर त्यांना दंडुक्याचा प्रसाद द्यावाच लागेल, किंबहुना हाच एकमेव उपाय आहे. पावसाळ्यात दरवर्षी धरण, नदी अशा ठिकाणी बुडणार्‍यांची संख्या लक्षणीय आहे. या गंभीर बाबीकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. तसेच समुद्रावर फिरण्यासाठी जाणार्‍यांचे बळी जात आहेत. कारण पावसाळ्यात समुद्र खवळलेला असतो. याचा अंदाज अशा लोकांना नसतो.

- Advertisement -

जमावबंदी किंवा तत्सम कलमे लावून सरसकट पर्यटनावर बंदी हा उपाय योग्य ठरणार नाही. विविध कारणांमुळे पावसाळी पर्यटन अलीकडे बहरत असल्याचे लक्षात घ्यावे लागेल. धबधब्यांवर प्रचंड गर्दी होत असते. धरणांबाबतही तसेच म्हणता येईल. सुट्टीच्या दिवशी या ठिकाणी अक्षरशः जत्रेचे स्वरूप येत असते. पोलीस बंदोबस्त अपुरा पडणार हे गृहीत धरून स्थानिक तरुणांचे सहकार्य घेऊन आणि त्यांना आवश्यक ते प्रशिक्षण देऊन पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी तैनात करणे शक्य आहे. असे करायला हवे. त्यांचा गाईड म्हणूनही उपयोग होऊ शकेल. धोकादायक धरणे किंवा धबधब्यांच्या ठिकाणी आवश्यक तेथे तारांचे कुंपण, सायरन व्यवस्था झाली पाहिजे.

दुर्घटना घडल्यानंतर बचाव पथक तेथे पोहचते, पण त्याला खूप उशीर झालेला असतो. अशा वेळी स्थानिकच तातडीची मदत करू शकतात. त्यामुळे स्थानिकांनाही विश्वासात घेऊन त्यांच्याकडे ठरावीक भागांची जबाबदारी देता येते का, हेही पाहण्यास हरकत नाही. पर्यटकांच्या वर्दळीमुळे स्थानिकांना तात्पुरते छोटे व्यवसायही थाटता येतात, ज्यातून त्यांना दोन पैसे मिळण्याचे साधन उपलब्ध होते. ज्या ठिकाणी बंदी असते तेथे गर्दी उफाळून येते हा अनुभव येत आहे. पोलीस आणि पर्यटकांमध्ये बाचाबाचीचे प्रसंगही घडत असतात. समुद्र, धरणे, धबधबे या ठिकाणच्या सुरक्षेचा मुद्दा सध्या ऐरणीवर आला आहे. कुणाचीही अनास्था पर्यटनाच्या मुळावर येणार नाही याची काळजी घ्यावी लागेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -