घरसंपादकीयदिन विशेषचतुरस्र ग्रंथकार चिंतामण वैद्य

चतुरस्र ग्रंथकार चिंतामण वैद्य

Subscribe

चिंतामण विनायक वैद्य यांचा आज स्मृतिदिन. चिंतामण वैद्य हे एक थोर ज्ञानोपासक, महाभारत-रामायणाचे संशोधक – मीमांसक व चतुरस्र ग्रंथकार होते. त्यांचा जन्म १८ ऑक्टोबर १८६१ रोजी ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथे झाला. त्यांचे शिक्षण कल्याण तसेच मुंबईच्या एल्फिन्स्टन स्कूल व एल्फिन्स्टन कॉलेजात झाले. एम. ए. (१८८२) आणि एलएल बी. (१८८४) झाल्यानंतर काही काळ कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथे मुनसफ म्हणून व नंतर ठाण्याच्या कोर्टात वकील म्हणून त्यांनी काम केले. त्यानंतर उज्जैन येथे न्यायाधीश पदावर ते रुजू झाले. पुढे ग्वाल्हेर संस्थानच्या सरन्यायाधीशपदी त्यांची नियुक्ती झाली (१८९५-१९०४).

सेवानिवृत्तीनंतर १९०५ सालापासून लोकमान्य टिळकांचे सहकारी म्हणून ते कार्य करू लागले. राष्ट्रीय शिक्षणाचे काम त्यांनी आस्थेने व निष्ठेने केले. कोलकाता, सुरत आदी काँग्रेस अधिवेशनांना ते टिळकांबरोबर गेले. टिळकांच्या पश्चात त्यांनी महात्मा गांधीजींचा मार्ग अनुसरला. वेगवेगळ्या समित्यांवर काम करणे, अहवाल लिहिणे ही कामे त्यांनी गांधींच्या मार्गदर्शनाखाली केली. त्यांनी १८८९ ते १९३४ या काळात विपुल लेखन केले. त्यांचे स्फुटलेखन केसरी, विविध ज्ञानविस्तार, इंदुप्रकाश, नेटिव्ह ओपिनियन आदी नियतकालिकांतून प्रसिद्ध झाले. त्यांनी इंग्रजी व मराठीत २९ ग्रंथ लिहिले आहेत.

- Advertisement -

‘महाभारत : ए क्रिटिसिझम’ (१९०४), ‘संक्षिप्त महाभारत’ (१९०५), ‘रिडल ऑफ रामायण’ (१९०६), ‘अबलोन्नतिलेखमाला’ (१९०६), ‘एपिक इंडिया’ (१९०७), ‘मानवधर्मसार’ (१९०९), ‘दुर्दैवी रंगू’ (१९१४), ‘श्रीकृष्ण चरित्र’ (१९१६), ‘महाभारताचा उपसंहार’ (१९१८), हे त्यांचे काही ग्रंथ प्रसिद्ध आहेत. अशा या चतुरस्त्र ग्रंथकाराचे २० एप्रिल १९३८ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -