प्रयोगशील साहित्यिक व्यंकटेश माडगूळकर

व्यंकटेश दिगंबर माडगूळकर हे श्रेष्ठ मराठी कथाकार आणि कादंबरीकार होते. त्यांचा जन्म 6 जुलै 1927 रोजी सांगली जिल्ह्यातील माडगूळ या ठिकाणी झाला. औपचारिक शिक्षण मॅट्रिकपर्यंतही झाले नाही. तथापि स्वप्रयत्नाने वाङ्मयाचा व्यासंग केला. इंग्रजी शिकून पाश्चात्त्य साहित्याचेही वाचन केले. विख्यात साहित्यिक ग. दि. माडगूळकर यांचे व्यंकटेश हे धाकटे बंधू. आपल्या वडील बंधूंच्या पाठोपाठ तेही साहित्यसृष्टीत आले आणि आपल्या प्रतिभेचा एक स्वतंत्र ठसा त्यांनी तेथे उमटवला. आरंभी काही काळ पत्रकारिता केल्यानंतर ते १९५० च्या सुमारास मुंबईस आले आणि मराठी चित्रसृष्टीत पटकथालेखन करू लागले. तत्पूर्वी माणदेशी माणसे (१९४९) हा त्यांचा कथासंग्रह प्रसिद्ध झाला होता. त्यातील व्यक्तिरेखांतून त्यांनी ग्रामीण माणसाचे जे अस्सल आणि जिवंत दर्शन घडविले, ते तोवरच्या मराठी साहित्याला अनोखे होते.

अद्भुतता, स्वप्नरंजन, कल्पनारम्यता यांच्या पकडीतून सुटलेल्या वास्तववादी ग्रामीण साहित्यकृतींचा आरंभ त्यांच्या या कथासंग्रहापासून झाला. त्यानंतर ‘गावाकडच्या गोष्टी’ (१९५१), ‘हस्ताचा पाऊस’ (१९५३), ‘सीताराम एकनाथ’ (१९५१), ‘काळी आई’ (१९५४), ‘जांभळाचे दिवस’ (१९५७) यांसारखे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध झाले. त्यांच्या कथांचे अनुवाद डॅनिश, जर्मन, जपानी आणि रशियन अशा विविध जागतिक भाषांत झालेले आहेत.

ग्रामीण कथेप्रमाणेच ग्रामीण कादंबरीच्या संदर्भातही त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. ‘बनगरवाडी’ (१९५५), ‘वावटळ’ (१९६४), ‘पुढचं पाऊल’ (१९५०), ‘कोवळे दिवस’ (१९७९), ‘करुणाष्टक’ (१९८२) आणि ‘सत्तांतर’ (१९८२) या त्यांच्या कादंबर्‍या उल्लेखनीय आहेत. बनगरवाडीतून व्यंकटेश माडगूळकरांची प्रयोगशीलता प्रत्ययास येते. ‘तू वेडा कुंभार’, ‘सती’, ‘पति गेले गं काठेवाडी’ ही त्यांची काही नाटके विशेष उल्लेखनीय होत. त्यांच्या अनेक पुस्तकांना महाराष्ट्र राज्य पुरस्कार लाभले. १९८३ मध्ये अंबेजोगाई येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद देऊन त्यांच्या साहित्यसेवेचा गौरव करण्यात आला. अशा या श्रेष्ठ लेखकाचे 28 ऑगस्ट 2001 रोजी निधन झाले.