घरसंपादकीयदिन विशेषलोकप्रिय कादंबरीकार नाथमाधव

लोकप्रिय कादंबरीकार नाथमाधव

Subscribe

द्वारकानाथ माधव पितळे उर्फ नाथमाधव हे लोकप्रिय मराठी कादंबरीकार होते. त्यांचा जन्म ३ एप्रिल १८८२ रोजी मुंबईत झाला. शालेय जीवनात एक क्रीडानिपुण विद्यार्थी म्हणून ते चमकले. तथापि पुस्तकी शिक्षणाकडे त्यांचा फारसा ओढा नसल्यामुळे मॅट्रिकच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी कुलाबा येथील ‘गन कॅरिज फॅक्टरी’ मध्ये नोकरी धरली. त्यानिमित्ताने पुष्कळ प्रवास केला. याच काळात त्यांना शिकारीचा छंद जडला.

अशाच एका शिकारीच्या प्रसंगी एका उंच कड्यावरून ते खाली कोसळले आणि त्यांच्या कमरेखालील भाग लुळा झाला (१९०५). उपचारार्थ इस्पितळात असताना त्यांना वाचनाची आवड उत्पन्न झाली आणि अनेक इंग्रजी-मराठी ग्रंथांचे त्यांनी वाचन केले. त्यातूनच लेखन करण्याची प्रेरणा त्यांना मिळाली. सुरुवातीला त्यांनी काही इंग्रजी लेख लिहिले आणि पुण्याच्या डेक्कन हेरल्ड या वृत्तपत्रातून ते प्रसिद्धही झाले.

- Advertisement -

‘प्रेमवेडा’ ही त्यांची पहिली कादंबरी १९०८ मध्ये प्रकाशित झाली. त्यानंतर सामाजिक आणि ऐतिहासिक मिळून ३० हून अधिक कादंबर्‍या त्यांनी लिहिल्या. ‘हेमचंद्र रोहिणी’ (१९०९), ‘रायक्लब अथवा सोनेरी टोळी’, ‘देशमुखवाडी’ (१९१६), ‘विमलेची ग्रहदशा’ (१९१७) अशा अन्य काही सामाजिक कादंबर्‍याही त्यांनी लिहिल्या.‘सावळ्या तांडेल’ (१९०९) ही त्यांची पहिली ऐतिहासिक कादंबरी.

‘स्वराज्याचा श्रीगणेशा’ (१९२१), ‘स्वराज्याची स्थापना’ (१९२२), ‘स्वराज्याची घटना’ (१९२५), ‘स्वराज्याचा कारभार’ (१९२३), ‘स्वराज्यावरील संकट’ (१९२३), ‘स्वराज्याचे परिवर्तन’ (१९२५) आणि ‘स्वराज्यातील दुफळी’ (१९२८) या कादंबरीमालेतून त्यांनी मराठेशाहीच्या उदयापासूनचा कालखंड चित्रित केला. अशा या लोकप्रिय कादंबरीकाराचे मुंबई येथे २१ जून १९२८ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -