घरसंपादकीयअग्रलेखवज्रमूठ किती काळ टिकणार!

वज्रमूठ किती काळ टिकणार!

Subscribe

भाजपने मुख्यमंत्रीपद नाकारल्यावर पेटून उठलेले शिवसेनेचे त्या वेळचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काहीही करून भाजपकडून मुख्यमंत्रीपद खेचून आणायचे असा निर्धार केला आणि भाजप नेत्यांच्या अपेक्षांच्या पलीकडचा निर्णय घेऊन प्रचंड धक्का दिला. काहीही करून शक्य असेल तिथे भाजपला धडा शिकवायचा असाच शिवसेेनेने विडा उचललेला आहे, असेच त्यांच्या भूमिकेवरून दिसते. त्यातून मग भले जे काय व्हायचे ते व्होवो, पण आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळायलाच हवे, हा शिवसेनेचा अट्टाहास होता. काही वर्षांपूर्वी राज्यात शिवसेनेमुळे भाजपचा विस्तार होण्यास मदत झाली, आपण मोठे भाऊ होतो आणि भाजप हा छोटा भाऊ होता. पण नरेंद्र मोदी यांचा राष्ट्रीय पातळीवर प्रवेश झाल्यानंतर परिस्थिती बदलली आहे, हे लक्षात घ्यायला शिवसेनेचे नेते तयार नव्हते, त्यातूनच मग भाजपशी टक्कर घेणे शक्य नसले तरी भाजपला जास्तीत जास्त त्रस्त कसे करता येईल, यासाठी शिवसेनेची पराकाष्टा सुरू झाली. महाराष्ट्रातच कशाला विविध राज्यांमध्ये विधानसभांच्या निवडणुकांमध्ये भाजपच्या विरोधात आपले स्थानिक उमेदवार उभे करून त्यांची शक्य असतील तितकी मते खाण्याचा प्रयत्न केला.

भाजप हा जरी शिवसेनेचा काही वर्षांपूर्वीचा मित्रपक्ष असला तरी आता काहीही करून भाजप आणि त्यांचे प्रमुख नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेतून हटवायचे असाच पण त्यांनी केल्याचे दिसत आहे. त्यासाठीच त्यांनी मुख्यमंत्रीपद मिळवण्यासोबत भाजप आणि मोदींना धडा शिकवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यासोबत राज्यात महाविकास आघाडीची स्थापना केली. अर्थात, या अनपेक्षित सत्तासमीकरणाचे मुख्य सूत्रधार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आहेत. सत्ता हेच राजकारणाचे मुख्य सूत्र आहे, त्याशिवाय जनतेची सेवा करता येत नाही, असा ठाम विश्वास आणि अनुभव असलेल्या शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांची मनस्थिती आणि गरज लक्षात घेऊन त्यांना आपल्यासोबत घेतले. सगळ्यात मोठे आव्हान होते, तेे काँग्रेसला सोबत आणणे, कारण नव्या समीकरणात शिवसेना असल्यामुळे काँग्रेस सहभागी होणे सोपे नव्हते. कारण त्याचा फटका त्यांना राष्ट्रीय पातळीवर बसण्याची शक्यता होती. त्यात पुन्हा या महाविकास आघाडीत सहभागी होऊन शिवसेनेसारख्या प्रादेशिक पक्षाच्या मुख्यमंत्र्यांच्या पालखीचे भोई त्यांना व्हावे लागणार होते, पण देशपातळीवर काँग्रेसची झालेली वाताहत लक्षात घेऊन शरद पवार यांनी तयार केलेल्या नव्या फॉर्म्युल्यात काँग्रेस सहभागी झाली.

- Advertisement -

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी तयार केलेल्या महाविकास आघाडीतील नेत्यांना राज्यातील सत्ता मिळाली आणि महाराष्ट्रातून भाजपच्या हातातोंडाशी आलेली सत्ता काढून घेऊन मोदींना शह देता आला. त्यासाठी त्यांनी शिवसेनेची मुख्यमंत्रीपदाची मागणी मान्य केली. पुढे जसा काळ सरकत गेला तसे शिवसेनेचे नेते, पदाधिकारी, शाखा प्रमुख यांची काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत काम करताना सगळ्याच बाजूने कोंडी होऊ लागली. कारण शिवसेना ही हिंदुत्ववादी आणि अन्य दोन पक्ष सेक्युलर असल्यामुळे शिवसेना नेत्यांना अवघड होऊ बसले. त्यातून त्यांच्यातील खदखद एकनाथ शिंदे यांच्या रूपाने बाहेर आली. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या अनेक खासदार, आमदार, नगरसेवक आणि अन्य पदाधिकार्‍यांनी बंड करून खरी शिवसेना आमची असा केवळ दावाच केला नाही, तर मान्यताही मिळवली, धनुष्यबाण हे चिन्हही मिळवले. यामुळे उद्धव ठाकरे यांना पुन्हा नव्याने सुुरुवात करावी लागणार आहे. त्यासाठीच ते राज्यात सभा घेत आहेत, पण इतक्या लोकांनी बंड करून त्यांची साथ सोडल्यामुळे त्यांना नव्या उभारणीला वेळ लागेल. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत आपली जी महाविकास आघाडी आहे, तिच्यासोबत राहणे सध्या त्यांच्या हिताचे आहे. भाजपने एकनाथ शिंदे यांच्या बंडाला गुप्तपणे खतपाणी घालून महाविकास आघाडीची सत्ता आठ महिन्यांपूर्वी घालवली होती. त्याचा राग या तीन पक्षांच्या मनात आहे. ज्या राजकीय पक्षांशी आपले पारंपरिक वैचारिक मतभेद होते, त्यांच्यासोबत हातमिळवणी करून आपण मुख्यमंत्रीपद आणि सत्ता तर मिळवली, पण लोकांच्या मनात आपला नैतिक पराभव झालेला आहे, हे उद्धव ठाकरे यांनी लक्षात घेतले नाही. कारण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे तसेच स्वत: पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कायम काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची पिसे उपटून काढलेली होती.

भाजपने आपली सत्ता घालवली, यामुळे पेटून उठलेले शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांनी यापुढे आपण भाजपच्या पाडावासाठी एकत्र राहायचे ठरवले आहे. त्यातूनच त्यांची छत्रपती संभाजी नगर येथे पहिली वज्रमूठ सभा पार पडली. काल त्यांची नागपूरमध्ये दुसरी वज्रमूठ सभा पार पडली. पहिल्या वज्रमुठीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले गैरहजर होते. त्यात पुन्हा आता अजित पवार यांच्या पक्षातील अस्वस्थतेबद्दल चर्चांनी जोर धरला आहे. काल झालेल्या वज्रमूठ सभेत तिन्ही पक्षांनी पुढील काळात एकत्र राहण्याचा आणि आपल्या वज्रमुठीचा आघात भाजपवर करण्याचा निर्धार व्यक्त केला. मुळात हे जे तीन पक्ष एकत्र आलेले आहेत ते विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर. त्यामुळे निवडणुकीपूर्वी तिकीट वाटपाच्या वेळी होणार्‍या त्रासाला त्यांना सामोरे जावे लागले नाही. जशा निवडणुका जवळ येतील तशी या तीन पक्षांच्या वज्रमुठीची कसोटी लागणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -